आळंदीत रुग्णालये सज्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

महावितरणची कामे पूर्ण; २४ तास शासकीय यंत्रणा
आळंदी - आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी शासकीय यंत्रणांची तयारी पूर्ण झाली आहे. ग्रामीण रुग्णालय आणि महावितरण कार्यालय २४ तास सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. 

माउलींच्या पालखीचे आळंदीतून १७ जूनला प्रस्थान होणार आहे. दरम्यान, आजपासून वारकऱ्यांचे आगमन आळंदीत होऊ लागले आहे. वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी पालिका, देवस्थानबरोबर शासकीय यंत्रणांचीही लगबग सुरू झाली. यामध्ये वीज मंडळाने रोहित्र आणि जनित्रांची दुरुस्ती केली आहे. 

महावितरणचे कनिष्ठ अभियंता सुभाष डापसे म्हणाले, ‘‘वारी काळात शहरातील लोकसंख्येचा ताण अतिरिक्त असतो. यासाठी वीज पुरविण्याची क्षमताही वाढविली जाते. यासाठी शहरातील सात ट्रान्सफॉर्मची दुरुस्ती झाली आहे. त्याची क्षमता दुपटीने म्हणजे दोनशे केव्हीपर्यंत वाढविण्यात आली आहे. रस्त्यावर लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती, वीजवाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या. याशिवाय तात्पुरते मीटर देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वारी काळात २४ तास अखंड वीजसेवा देण्यात येणार आहे. वारीसाठी जादाचे कर्मचारी नेमण्यात आले. यामध्ये मरकळ उपकेंद्रातून वीजपुरवठा खंडित झाला, तर गैरसोय टाळण्यासाठी भोसरी उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जाणार आहे. देवस्थान, पालिका आणि पालिकेच्या पाणीपुरवठा केंद्रामध्ये आपत्कालीन व्यवस्थेसाठी प्रत्येकी दोन वीज कर्मचारी २४ तास कार्यरत राहतील.’’ 

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी भाऊसाहेब तांदळे, ‘‘वारी काळात वारकऱ्यांना रुग्णसेवा देण्यासाठी शहरातील चौकण चौक, वडगाव चौक, दर्शनमंडप, माउली मंदिर, इंद्रायणी घाट या भागात बाह्यरुग्ण सेवा देण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामीण रुग्णालयाच्या सुसज्ज इमारतीत यात्रेकरूंसाठी चोवीस तास आंतररुग्ण सेवा कार्यरत राहील. ग्रामीण रुग्णालयात सध्या ३० खाटांची सोय आहे. त्यामध्ये आणखी गरजेनुसार क्षमता वाढविण्यात येईल. एक वैद्यकीय अधीक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी सध्या कार्यरत असून, जादाचे पंधरा वैद्यकीय अधिकारी, सोळा परिचारिका आणि पंधरा जादाचे कर्मचारी वारी काळात नेमण्यात येतील. वैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळा सज्ज असून, त्या ठिकाणी चार तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. वारीसाठी अतिरिक्त औषधसाठा खरेदी केला आहे. रुग्णवाहिका तैनात आहेत.’’