तरडगाव पालखी तळावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

तरडगाव - श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा येथे रविवारी (ता. २५) मुक्कामासाठी येत असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

तरडगाव - श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा येथे रविवारी (ता. २५) मुक्कामासाठी येत असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

पालखी सोहळ्यासाठी तरडगाव ग्रामपंचायत व शासकीय यंत्रणेकडून जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती सरपंच रेश्‍मा गायकवाड, उपसरपंच अमोल गायकवाड व ग्रामविकास अधिकारी दादासाहेब धायगुडे यांनी दिली. पालखी तळावर असलेली काटेरी झुडपांची सफाई करण्यात आली आहे. तळाशेजारी असणाऱ्या रस्त्यांचे मुरमीकरण केले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने तळावर मदत केंद्र उभे केले आहे.  दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. तळावर विजेचे टॉवर उभे केले असून फ्लड जोडलेले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी मनोरे उभे केले आहेत. पालखी काळात लागणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत नियोजन झाले आहे. निर्मल वारीअंतर्गत ७०० स्वच्छतागृहे ठेवण्यात आली आहेत. नऊ ठिकाणी त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी तळाशेजारी स्नानगृहे उभारली आहे. 

गावात जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली आहे. गटारे व सार्वजनिक शौचालयांच्या परिसरात फॉलिडॉल पावडर टाकणात येत आहे. तळाशेजारी वारकऱ्यांच्या सोयीसाठी आरोग्य पथके सज्ज केली आहेत, असे डॉ. अनिल कदम यांनी सांगितले. वीज मंडळाने पालखी मार्गावरील व तळावर वीज पुरवठ्यासाठी योग्य प्रकारे कामे केली आहेत. कर्मचारी पालखी तळावर कार्यालय सुरू केले आहे, अशी माहिती वीज मंडळाचे श्री. सुतार यांनी दिली.