वारकऱ्यांच्या उत्साहापुढे उन्हाचा दाह कमीच 

(शब्दाकंन - सचिन शिंदे)
शुक्रवार, 30 जून 2017

सोहळ्यात आज 
सोहळा सकाळी अकलूजहून बोरगावला मार्गस्थ होणार 
सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण, दुपारचा विसावा माळीनगरात
सोहळ्याचा दुसरा विसावा पायरीचा पूल, तर तिसरा श्रीपूर कारखाना येथे आहे. 
सायंकाळी सोहळा बोरगावला विसावणार 

बाळू जाधव, लातूर 
पुंडलिका हरी वरदा..... असा गजर झाला की, माझे हृदय धडधडू लागते अन्‌ रिंगण सोहळा संपला की, ती धडधड थांबते. तीन वर्षांपासून पालखी सोहळ्यात मानाच्या अश्वावर बसण्याचा मान मला मिळतो आहे. आजही अकलूज गोल रिंगण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. काहीशा ढगाळ वातवरणानंतर उन्हाचा कडाका रिंगणात जाणवला; मात्र वारकऱ्यांच्या उत्साहापुढे उन्हाचा दाह कमीच वाटला. 

संत तुकोबारायांचा पालखी सोहळा सराटीतून सोलापूर जिल्ह्यात सकाळी प्रवेशला. माझे गाव मूळचे लातूर; मात्र अकलूजला धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे नोकरीस आहे. वारीत तीन वर्षांपासून मानाचा अश्व मोहिते-पाटील यांचा आहे. त्याच्या देखभालाची जबाबदारी माझ्याकडे असते. त्या अश्वामुळे मी वारीत सहभागी झालो. तीन वर्षांपासून वारीत सहभागी होत असल्याने मला भक्तिमार्ग सापडल्याची जाणीव होते आहे. आज पादुकांना नीरा स्नान होते. सकाळी सोहळाप्रमुख पालखीतील पादुका डोक्‍यावर घेऊन नीरा नदीकडे गेले. पादुकांना स्नान घालताना ज्ञानोबा-तुकारामाच्या गजराने परिसर दणाणून गेला. नीरा स्नानानंतर सोहळा अकलूजकडे निघाला. सोलापूरच्या हद्दीवर प्रशासनाकडून स्वागत झाले. सोहळ्याच्या मार्गात यंदापासून बदल करण्यात आला होता. रिंगणानंतर नगरप्रदक्षिणा असायची, आता ती रिंगणापूर्वीच करण्यात येणार आहे. 

सोहळ्यातील तिसरा रिंगण सोहळा माने विद्यालयात होणार होता. तेथेच आजचा पालखीचा मुक्काम होता. नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर सोहळा रिंगणाच्या मैदानात आला.  नगारखाना, पालखीचे आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. झेंडेकरी, पखवाज वादक, तुळस डोक्‍यावर घेतलेल्या महिला धावल्या अन्‌ आता उत्सुकता लागून राहिलेल्या अश्वांची धावण्याची वेळ आली. प्रथम प्रदक्षिणा घालून अश्वाला मार्ग दाखवला. त्यानंतर सोहळाप्रमुखांनी इशारा करताच अश्व वाऱ्याच्या वेगाने धावले. सोबत माऊलींचे अश्‍वही होते. अश्वाला मार्ग दाखवत नेण्यात आले. अत्यंत चपळाई ठेवत मार्गक्रमण करणाऱ्या अश्वांचे रिंगण पूर्ण झाले अन्‌ रिंगण सोहळा पूर्ण झाल्याने कृतार्थ ठरल्याची भावना मनात तरळून गेली. त्यानंतर पादुकांना अभिवादन करण्यासाठी गर्दीतूनच अश्व मुख्य मंडपाकडे नेले. तेथेही अश्वाने अभिवादन केले. त्या वेळी टाळ, मृदंगाचा गजर झाला.