विठुरायाचे भक्त वारीत एकसमान... 

(शब्दांकन - सचिन शिंदे)
गुरुवार, 22 जून 2017

सोहळ्यात आज 
पालखी सोहळा यवतहून वरवंड मुक्कामी मार्गस्थ होणार 
भांडगाव येथे दुपारची विश्रांती 
सायंकाळी सोहळा वरंवडच्या भैरवनाथ मंदिरात मुक्कामी पोचणार 

मालन पमाजी हरगुडे, 
(सणसवाडी, जि. पुणे)

वारीत ना कुणी मोठा, ना कुणी श्रीमंत... सारेच एकसमान... विठुरायाचे भक्त... हीच भावना आषाढी एकादशी जवळ येईल, तशी दृढ होत जाते. 

‘ज्ञानबा- तुकाराम...’ हा जगण्याचा मंत्र आहे. सात्त्विकतेचा गंध आहे. अभंग जसे साऱ्याच सुरात मिसळतात, तसे वारीत सारेच पांडुरंगाच्या भक्तीत एक होऊन जातात. पुणे जिल्ह्यातील सणसवाडी येथील भैरवनाथ प्रासादिक दिंडीत आम्ही चालतो. प्रस्थानापासून विठुरायाची ओढ लागते.  लोणी काळभोरमधून निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे अनेक ठिकाणी स्वागत झाले. वारकऱ्यांची काळजी घेणाऱ्यांची संख्या वाढतेय, ही गोष्ट चांगली वाटते. सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर सगळ्याच गोष्टीचा विसर पडतो. तुम्ही कोणत्या दिंडीत आहात, यापेक्षा पांडुरंगाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांसोबत आहात, हीच भावना मनाला मोहवून टाकते. अवघा पालखी सोहळाच या समान विचाराच्या धाग्याने जोडल्याची आमची भावना आहे.

पालखी सोहळ्यात सारेच समान आहेत. गावात एरवी प्रत्येकाचे काम वेगळे असले तरी दिंडीत कामाची, जबाबदारीची समान वाटणी असते. गावात शेतीची कामे करतो. शेतमजुरीही करावी लागते. त्या भूमिकेतही प्रामाणिकपणा जपण्याची शिकवण येथे मिळते. लोणी काळभोर ते यवत हा या सोहळ्यातील सर्वांत मोठा सुमारे तीस किलोमीटरचा टप्पा आहे. दिवसाची सुरवात भजनाने झाली. वाटेत चालताना हरिनामाचा गजर मनाला सुखावून गेला. अनेक वारकरी शेतकरी आहेत, त्यांना जशी विठ्ठलाची आस, तशीच शेतीचीही काळजी आहे. देहूपासून इथपर्यंत वाटेत कुठेच पाऊस आला नाही. पावसासाठी विठ्ठलाला आमचे साकडे आहे. गेली दोन दशके वारी करत आहे. 

संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात सांगतात... 
ते माझे सोयरे सज्जन सांगती, 
पाय आठविती विठोबाचे
तुका म्हणे जैसे मानती हरिदास, 
तैशी नाही आस आणिकांची...

पालखी सोहळ्याच्या मार्गातील प्रत्येक विसाव्यासह मुक्कामाच्या ठिकाणी त्याचीच प्रचिती येते.