नामा म्हणे येथे  दुजा नको भाव।

नामा म्हणे येथे दुजा नको भाव।

श्री नामदेवरायांनी माउली ज्ञानोबारायांसह अखिल भारतभर तीर्थयात्रा केली आणि या तीर्थयात्रेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रचार केला... 
 

या रे या रे लहान थोर। 
याती भलते नारी नर। 
करावा विचार। 
न लगे चिंता कोणासी।। 

वारकरी संप्रदाय हे भागवत धर्माचे व्यापक आणि परमविकसित झालेले स्वरूप आहे. या संप्रदायात सर्व लहान- थोरांचा, सर्व जातींचा, सर्व वर्णाश्रमांचा, स्री- पुरुषांचा अधिकार आहे. या नामभक्तीच्या पंथामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारचा विचार, चिंता करण्याचे कारण नाही. या पंथामध्ये वाट्टेल त्याने खुशाल यावे. 
या संप्रदायाच्या विस्ताराचे कार्य भक्तशिरोमणी श्री नामदेवरायांनी केले आहे. 
नामा तयाचा किंकर। तेणे रचिले आवार। 
श्री नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान समाजातील सर्व घटकांपर्यंत नेण्याचे कार्य केले आहे. यासाठी तीर्थयात्रा या व्रताचा अंगीकार केला. श्री नामदेवरायांनी माउली ज्ञानोबारायांसह अखिल भारतभर तीर्थयात्रा केली आणि या तीर्थयात्रेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रचार केला. याचे वर्णन श्री नामदेवरायांच्या तीर्थावळी प्रकरणामध्ये आले आहे. 
तसेच, हरिनाम संकीर्तनद्वारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत हे वैदिक तत्त्वज्ञान पोचविण्याचे महनीय कार्य भक्तशिरोमणी नामदेवरायांनी केले आहे. त्यांच्याच शब्दांत सांगावयाचे झाले तर - 

नाचु कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी। 
सर्व सांडोनी माझाई। वाचे विठ्ठल रखुमाई। 
परेहूनी परते घर। तेथे राहू निरंतर। 
सर्वांचे जे अधिष्ठान। तेची माझे रूप पूर्ण 
अवघी सत्ता आली हाता। नामयाचा खेचर दाता। 


कीर्तनरंगात नाचत असता जगामध्ये आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित करू. अहंममतेचा परित्याग करून परावाणीसही विषय न होणारे चितस्वरूप तेथे स्थिर होऊ. ते चित्त तत्त्व आणि मी यात अभेद आहे, असे ज्ञान भक्तशिरोमणी नामदेवरायांना त्यांचे सद्‌गुरू श्री विसोबा खेचर यांच्याकडून प्राप्त झाले आणि कीर्तनाच्या द्वारा हे अभेद ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचविले. 

तत्कालीन समाजामध्ये शैव आणि वैष्णव या रूपाने दुही होती, ती दुही कमी करण्याचे कार्य श्री नामदेवरायांनी केले. 

केली जैसी भक्ती शैव का वैष्णव। पाहता तो देव दुजा नाही।। 
शिव विष्णू दोघे एकचि अवतार। वेदांनी निर्धार हाचि केला।। 
नामा म्हणे येथे दुजा नको भाव। विष्णू तोचि शिव, शिव विष्णू।। 

या प्रकाराने भक्तशिरोमणी नामदेवरायांनी सामाजिक ऐक्‍य निर्माण करण्याचे प्रयत्न केले. सर्वं खलु इदं ब्रह्म ही साम्यावस्था वारकरी संप्रदायाचे अंतिम प्राप्तव्य स्थान आहे. ही अवस्था समाजातील सर्व घटकांना प्राप्त होण्यासाठी तत्त्वज्ञानाच्या समाजाभिसरणाचे अलौकिक कार्य भक्तशिरोमणी नामदेवरायांनी केले आहे. 

सामाजिक जाणिवांचे अभंगातून सखोल चिंतन 

संत निळोबारायांनी कर्मठ रुढी, अंधश्रद्धा, जुनाट परंपरा, अपप्रवृत्ती, अवडंबर, भ्रष्ट व्यवहार, अनैतिकता यावर प्रच्छन्नपणे भाष्य केले. संत तुकोबारायांचा विचार पुढे नेऊन विस्तारीत केला...
- डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर

वारकरी संप्रदायाने समाजाला नैतिक अधिष्ठान देऊन, निकोप समाजनिर्मितीचा प्रयत्न केला आहे. एकात्मतेच्या विचाराबरोबर, अनेक शतके मराठी माणसाच्या मनात, जीवनादर्श रुजविला. उदात्त मानसिकता निर्माण करण्यात हा संप्रदाय यशस्वी झाला. जगद्‌गुरू तुकोबारायांनंतर संत निळोबाराय पिंपळनेरकर यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. 

संत निळोबारायांनी आपल्या अभंग मांडणीच्या पूर्वी, समाजव्यवस्थेचा सूक्ष्म आणि डोळसपणे अभ्यास केला होता. समाजचिंतकाची भूमिका घेऊन हजारो बाजूंनी समाजजीवनाचे निरीक्षण आणि अवलोकन त्यांनी केले. समाजपुरुषाच्या भूमिकेतून समाजातील इष्ट-अनिष्ट प्रवृत्तीचे त्यांनी मूल्यमापन केले. समाजमन जागृत केले. संत तुकोबारायांना, सद्‌गुरू मानून आणि जगद्‌गुरू बिरुदावली देऊन, प्रस्थापित वर्णधर्म व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्षच केला. संत निळोबारायांनी समाजातील कर्मठ रुढी, अंधश्रद्धा, जुनाट परंपरा, अपप्रवृत्ती, अवडंबर, भ्रष्ट व्यवहार, अनैतिकता यावर प्रच्छन्नपणे भाष्य करून, संत तुकोबारायांचा विचार पुढे नेऊन विस्तारीत केला. जनजागृतीचे नवे आत्मभान आपल्या अभंगातून त्यांनी मांडले. समाज विकासाआड येणाऱ्या अडसरांना मोठ्या धैर्याने बाजूला केले.

संत निळोबारायांनी समाजातील विविध स्तरांतील माणसांचे चित्रण केले आहे. मराठी साहित्यामध्ये संत निळोबारायांचे अभंग श्रेष्ठ दर्जाचे आहेत. मराठी मातीमध्ये ती अभंगसंहिता रुजलेली आहे. आपल्या जीवनातील उच्च आदर्श नैतिकतेचा वस्तुपाठ समोर ठेवून, समाजाला आदर्श जगण्याची मूल्ये देतात.

वेदातील अद्वैत तत्त्वज्ञान निळोबारायांनी सहज-सोप्या भाषेमध्ये, वर्णन करून सांगितले आहे. जनास उपदेश, मुमुक्षुस उपदेश, भक्तीचे स्तोम करणाऱ्याचे पाखांड खंडन, संत चरित्रे इत्यादी अनेक रूपक अलंकारांनी आणि कूट अभंगांनी अलंकृत करून अभंग संहिता अभिव्यक्त केली आहे. संत निळोबारायांनी, आत्मव्याकूळ मनःस्थिती आत्माविष्काराला उत्कंट आणि भावस्थितीचे रूप दिले आहे.

वर्ण, वर्गभेदाला नाकारत केले सोशल इंजिनिअरिंग

उच्च-नीचतेच्या भिंती तोडून स्त्री, शूद्र, अंत्यज, जातिहीन आदी समजल्या जाणाऱ्यांनाही त्रैवर्णिकांच्या पंक्तित बसविण्याचे महान कार्य संत एकनाथ यांनी केले. 
- योगिराज महाराज पैठणकर

जया म्हणती नीच वर्ण। स्त्री शूद्रादी हीन जन।।
सर्वांभूती देव वसे। नीचाठायी काय नसे?।।

सुमारे चारशे वर्षांपूर्वी असा प्रश्‍न धर्माच्या तत्कालीन ठेकेदारांना विचारला तो संत श्री एकनाथ महाराज यांनी! उच्च-नीचतेच्या भिंती तोडून स्त्री, शूद्र, अंत्यज, जातिहीन आदी समजल्या जाणाऱ्यांनाही त्रैवर्णिकांच्या पंक्तित बसविण्याचे महान कार्य संत एकनाथ यांनी केले. सद्यःस्थितीत काही दुष्ट शक्तींकडून संतांनाही जातीपातीच्या बंधनात अडकविण्याचा केविलवाणा; परंतु निष्फळ प्रयत्न होताना दिसत आहे; परंतु वारकरी संप्रदायातच खरे सोशल इंजिनिअरिंग आहे, असे म्हणावे लागेल. ‘येथ जाती अप्रमाण’ असल्याने संत एकनाथ महाराजांनी ज्या श्रद्धेने श्री ज्ञानेश्‍वरादी भावंडांचे वर्णन केले, त्याच श्रद्धेने श्री नामदेवराय, श्री चोखोबाराय, श्री गोरोबाकाका आणि श्री सावता महाराज यांचे चरित्र लिहिले आहे. आजच्या सामाजिक समरसतेचे मूळ, जे की पंढरीच्या वारीत विशेषत्वाने प्रदर्शित होते, त्याचे मूळ हे संत एकनाथांच्या वाङ्‌मयात आणि त्यांच्या चरित्रामध्ये पदोपदी पाहायला मिळू शकते. नाथवाड्यात होणाऱ्या कीर्तन, प्रवचनादी कार्यक्रमांस सर्वांना मुक्त प्रवेश होता. वर्णाश्रमधर्म जाती, कूळ, गोत्र हे आत्मतत्त्वाच्या ठिकाणी एकच असून, तोच परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले.
कैचि क्रिया कैचे कर्म। कैचा वर्णाश्रम धर्म। 
एका जनार्दनी यातिकुळ। अवघा बापक विठ्ठल।।

ही संत एकनाथ यांची व्यापक दृष्टी होती. या सोशल इंजिनिअरिंगकडे पाहून श्री तुकोबारायही आकर्षित न होतील तरच नवल! ते म्हणतात -
ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला। तेणे जन खेळकर केला रे। 
अशा प्रकारचे सोशल इंजिनिअरिंग हा वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. वारी हे त्याचे प्रात्यक्षिकच म्हणावे लागेल! जेथील आनंदात तारीख आणि वाराचे भान राहत नाही, तेथे जातीपातीचे भान राहील, अशी शक्‍यताच नाही. भजनानंदात पंढरीश परमात्माचा टकळा लागणं, हेच वारीचं खरं फलित म्हणावं लागेल!

कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी।।

प्रपंचात राहूनही उत्तम परमार्थ करता येतो, याची शिकवणच संत सावता महाराज यांनी दिली. जीवनातील कर्मयोगालाच भक्तियोगाचे स्थान प्राप्त करून देता येते, हे त्यांच्या अभंगातून प्रगट होते...
- ॲड. जयवंत महाराज बोधले

महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये सर्व जातीधर्मामध्ये अनेक संतांचे अवतार झाले आहे. असे जरी असले तरी संतांना जातीचे, वयाचे, काळाचे बंधन नसते. सर्व संतांचा अधिकार हा समानच आहे. परंतु वारकरी संप्रदायामध्ये आजही काही विशेष परंपरा म्हणून काही संतांची चरित्रे सतत गायिली जातात. त्यामध्ये श्री क्षेत्र पंढरपूरहून श्री क्षेत्र अरण या गावी पांडुरंग स्वतःहून संत सावता माळी महाराज यांना भेटायला आले, हे चरित्र प्रसिद्ध आहे. श्री संत नामदेव महाराज म्हणतात -
धन्य ते अरण रत्नाची खाण। जन्मला निधान सावता तो।।१।।
सावता सागर प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्याघरी।।२।।

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्‍यातील अत्यंत पवित्र अशा अरण या गावी संत सावता महाराज यांनी अवतार घेतला. संतांचा अवतार असतो. यथायोग्य प्रकारे प्रपंच करीत असतानाच पूर्वपरंपरागत घरात पंढरीची वारी असल्यामुळे त्यांना परमार्थाची गोडी लागली. प्रपंचात राहूनही उत्तम परमार्थ करता येतो, याची शिकवणच संत सावता महाराजांनी समाजाला दिली. आपल्या जीवनातील कर्मयोगालाच भक्तियोगाचे स्थान प्राप्त करून देता येते, हे त्यांच्या एका अभंगातून प्रगट होते.
‘‘कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी।।’’
संत सावता महाराजांनी आपल्या मळ्यात येऊन काम करीत करीत भगवंताच्या नामस्मरणाने तल्लीन व्हावे आणि यामध्येच संत नामदेव महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्यासहित भगवान श्री पांडुरंगाने संत सावता महाराजांच्या मळ्यात यावे आणि स्वतः संत सावता महाराजांच्या हृदयात सगुणरूपाने बसावे.
‘साठविला हरी। जिही हृदय मंदिरी।’
आपल्या हृदयात हरी साठवावा पण त्याकरिता आत आलेले विकार जाणे गरजेचे आहे. ते विकार घालविण्याकरिताच ‘पंढरीची वारी’ करायची आहे.

व्यक्ती हीच श्रेष्ठ, संत हा प्रकाश

संत नामदेवराय देवदर्शन घेण्यासाठी देवळात जाऊ लागले, पण संत जनाबाईंना भेटायला देव वीट सोडून घरी येऊ लागले. त्यांना दिलेल्या संतत्वामुळे अधिकार प्राप्त झाला...
- भगवतीताई सातारकर

संत जनाबाईंचा संसार हरवला होता. मूळ अस्तित्वाकडे त्यांची वाटचाल सुरू होती. त्या अस्तित्वाचा दुसरा भाग नाम होते. गंगाखेडहून आलेली ज्ञानगंगा आपली जाणीव विसरून पंढरीत आली. स्वतःमध्ये देव बघितला ते ऋषी झाले. पण नाम घेतले ते संत झाले. संत नामदेवराय देवदर्शन घेण्यासाठी देवळात जाऊ लागले, पण संत जनाबाईंना भेटायला देव वीट सोडून घरी येऊ लागले. त्यांना दिलेल्या संतत्वामुळे अधिकार प्राप्त झाला. त्या अभंग करू लागल्या. सध्याच्या काळात खरा संत कोण हे सांगणे अवघड झाले. अभ्यासक श्रेष्ठ झाला. संत ज्ञानेश्‍वर महाराज नाव कमविण्यासाठी कधीच जगले नाहीत. लोककल्याण हा एकमेव हेतू त्यांनी जीवनात बाळगला. संत आपले कार्य करून जातात. सध्याच्या काळात सर्व क्षेत्राप्रमाणे वारकरी संप्रदायातही राजकारण येऊ लागले आहे. संतांच्या विचारांवर आपण विचार करतो. ते त्यांना पाहिजे ते करून गेले आहेत. जसे आई मुलाला जन्म देते. त्यानंतर मुलाने आईबद्दल काय भावना ठेवावी. तसे ज्ञानाबाई आपले काम करून गेली. त्यातून मांदियाळी निर्माण झाली. सध्याच्या काळात नेटवर्किंग निर्माण झाले. 

संत जनाबाईंसाठी देव विटेवरून खाली येत होता. तिला दळू लागत होता. त्या लहान असताना आई-वडिलांचे प्रेम म्हणून तिला कुशीत घेऊन झोपत होता. सध्याच्या काळात या लहानग्या बालिकांवर अत्याचार होतो. संत हा प्रकाश आहे. त्यांना सर्व समान असतात. ईश्‍वरी शक्ती ज्याच्यातून व्यक्त होते ती व्यक्ती. व्यक्ती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यामुळे पुरुषांनी स्वतःला मिरवून घेण्याची चूक करू नये. तोही एक व्यक्ती आहे. आम्ही संत जनाबाई, मुक्ताबाई यांचे वारस आहोत. संत जनाबाई नामाच्या जाणिवेचा वीणा खांद्यावर घेऊन गात होत्या. दळत होत्या. दळताना त्यांचा हात भरून यावा आणि त्यांना पांडुरंगाने हात द्यावा. त्या पिठामधून तयार पदार्थांवर ही सारी संतमंडळी जेवत होती. संत नामदेवराय हे नाम होते. पण नामाची परिपूर्ण जाणीव संत जनाबाई यांना होती. एवढेच मागणे आहे. वारकरी संप्रदायातील प्रत्येकात संत जनाबाईंमधील जाणीव जागृत होवो. त्यातच जीवनाचे कल्याण आहे.

सामाजिक जाणिवांना आणली अधिक प्रगल्भता

धार्मिक, आध्यात्मिक, वैचारिक भेद न ठेवता गोरोबाकाकांनी समाज घडविण्याचे मोठे काम केले. परीक्षक म्हणून कार्य करताना त्यांनी जाणिवेला अधिक प्रगल्भता प्राप्त करून दिली...
- पंडित महाराज क्षीरसागर

आपल्या महाराष्ट्रात एकेकाळी संतांची मांदियाळी होती. सर्व संतांनी सामाजिक बांधिलकी न सोडता समाजप्रबोधन केलेले आहे. ब्रह्मबोध, आत्मबोध संपन्न असताना सगुण साकार परमात्म्याची भक्ती करून समाजाला सामाजिक, धार्मिक, नैतिकतेची दिशा देणारी व्यक्ती म्हणजे संत. महाराष्ट्रात ‘नि’ ते ‘नि’ ही संतमालिका मानली जाते. अर्थात श्री संत निवृत्तीनाथ ते श्री संत निळोबाराय; यात श्री संत शिरोमणी गोरोबाकाका हे एककुलाल वंशात जन्माला आले. त्यांना गोरक्षनाथ हे गुरू म्हणून लाभले.

ज्ञानवंश ज्यांचा नाथपंथीय आहे. सांप्रदायिक पताका घेऊन त्यांनी समाजप्रबोधनाचे काम केले. श्री संत गोरोबाकाकांनी भक्ती करीत करीत स्वव्यवसाय म्हणजेच कुंभारकाम केले. बलुतेदारी भक्तीत आडवी येऊ दिली नाही. इतकेच नाही, तर सामाजिक बांधिलकी टिकविण्यासाठी त्यांना देवानेही सहकार्य केले. भक्तीच्या साधनेत तल्लीन झाल्याने चिखल तुडविताना मूल कधी पायाखाली आले, हे त्यांना कळालेच नाही. त्या वेळी विठुरायानेच धाव घेतली. अतूट भक्तीचा वस्तुपाठच या घटनेतून गोरोबाकाकांनी घालून दिला. 

संत मांदियाळीने कधीच जातपातीला थारा दिला नाही. म्हणून तर गोरोबाकाकांना तत्कालीन संतांनी परीक्षक म्हणून पदवी प्रदान केली होती. संत नामदेव महाराज यांना आलेला उणेपणा विठुरायाने गोरोबाकाकांकडून निवृत्त केला. धार्मिक, आध्यात्मिक, वैचारिक भेद न ठेवता गोरोबाकाकांनी समाज घडविण्याचे मोठे काम केले. हाताने मडके-गाडगे घडविताना त्याला लागणारा कोमलपणा जीवन जगताना आचरणात कसा आणावा, याचे लोकशिक्षण त्यांनी समाजाला दिले. 

नैतिक मूल्यांची अभंगातून बीजपेरणी

आंधळा, पांगळा, बहिरा, मुका, वासुदेव या रचनांमधून लोकशिक्षण देणारा संतांसारखा दुसरा उत्तम लोकशिक्षक नसावा. समतेचा महामंत्र देणारे संत थोर समाजसुधारकच होत... 
- प्रमोद महाराज जगताप

महाराष्ट्राच्या सर्वांगीण जडणघडणीत वारकरी संतांचे बहुमोल आणि अपूर्व योगदान लाभले आहे. आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक यापैकी कोणतेही क्षेत्र असो, त्यावर संतविचारांचा प्रभाव निश्‍चित पाहावयास मिळतो. त्यांनी आध्यात्मिक प्रांतात श्रीविठ्ठलभक्तीची ध्वजा फडकावली. आपल्या अभंगातून नैतिक मूल्यांची बीजे पेरून सांस्कृतिक बैठक भक्कम केली. आंधळा, पांगळा, बहिरा, मुका, वासुदेव या रचनांमधून लोकशिक्षण देणारा संतांसारखा दुसरा उत्तम लोकशिक्षक नसावा. सामाजिक जीवनात समतेचा महामंत्र देणारे संत थोर समाजसुधारकच होत. 
या रे या रे लहानथोर। याति भलते नारी नर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी।।

या एकाच संतवचनात जातिभेद आणि स्त्री- पुरुष भेद संपवलेला दिसतो. मात्र प्राचिन काळापासून आध्यात्मिक प्रांतात पंथभेद हा एक जटिल प्रश्‍न उभा आहे. त्यातल्या त्यात शैव आणि वैष्णव वाद खूप मोठा आहे. आजही दक्षिण भारतात या वादाचे कर्मठपण जाणवते. वारकरी संत प्रभावळीतील संत नरहरी महाराज सोनार हे कट्टर शिवभक्त होते. श्री क्षेत्र पंढरीत राहून श्री पांडुरंगाच्या दर्शनाला जात नव्हते. एका प्रसंगात त्यांना हरी-हर ऐक्‍याचा साक्षात्कार झाला. तेव्हापासून संत नरहरी महाराजांनी शिव आणि विष्णू एकच असल्याचा उपदेश करून शैव पंथीयांना वारकरी पंथात समाविष्ट करण्याचा अभूतपूर्व प्रयोग करून पंथभेद संपविला. 
नरहरि सोनार हरिचा दास। भजन करी रात्रंदिवस।।
शैव असूनही स्वतःस हरिदास म्हणवून श्री संत नरहरी महाराज यांनी शैव- वैष्णव पंथांतील मतप्रवाहांचा संगम घडविला.

शरण जा उदारा पांडुरंगा...

परमात्मा ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष, अज्ञानी आहे की ज्ञानी, लहान आहे की वृद्ध हे पाहत नाही. अपार करुणामयी असणारा श्रीहरी निस्सीम निर्व्याज प्रेम करतो. 
- माधवदास राठी

मुळात निर्गुणोपासक असणारी नाथ संप्रदायाची विचारसरणी पुढे सगुणोपासनेकडे वळली. श्रीकृष्णभक्तीचा, सगुणोपासनेचा आश्रय करीत श्रीगुरू गहिनीनाथांपासून अधिक व्यापक बनली. संतांनी याच विचारांचा कुठल्याही वर्ण, आश्रमाचा भेदाभेद न ठेवता अधिकारानुरूप भक्तिसाधनेचा समाजातील निम्न स्तरापर्यंत जाऊन प्रचार, प्रसार केला.

भगवान श्री विठ्ठल हे एकमात्र समन्वयवादी दैवत कलियुगामध्ये राहील आणि नामसंकीर्तन भक्ती हे सर्वसमावेशक साधन असेल, असा विचारांती निर्णय सनकादिक भक्तांनी एकांतात बसून घेतला, असे स्पष्ट केले आहे. या जाणिवेतूनच हे विचारधन गीतेचे तत्त्वज्ञान सर्वांपर्यंत पोचवावे, ही आपल्या श्री गुरू गहिनीनाथांची संकल्पना श्री ज्ञानदेवांना प्रेरणा देत ज्ञानेश्‍वरीच्या निर्मितीतून संत निवृत्तिनाथांनी धर्मकीर्तनाच्या स्वरूपात प्रत्यक्षात आणली. बोलीभाषेतून, लोकभाषेतून गहन गुप्त असे ज्ञान प्रकट करीत खूप मोठा उपकार केला. गहिनीनाथांनी आपली कुलपरंपराच श्रीकृष्ण नामसाधनेने आणि विठ्ठलभक्तीच्या माध्यमातून पावन केली, असे ३२५ अभंगांच्या गाथेतून श्री संत निवृत्तिनाथांनी वारकरी संप्रदायाच्या विविध प्रतिपाद्य विषयांना स्पर्श केला आहे. पंढरी माहात्म्य, नामपर, सद्गुरूकृपानुभूती, उपदेशपर, विठ्ठलस्वरूप वर्णनपर अशा अनेकविध अभंगांतून भाव व्यक्त करताना संत निवृत्तिनाथ महाराज यांची जनोद्धाराची तळमळ व्यक्त होताना जाणवते. श्री विठ्ठल तेथे आहे. त्या समर्थाचे घरी काही उणे नाही, फक्त हवे ते मिळविण्यासाठी कृष्णनामी अखंड प्रेम असू द्यावे. मग परमात्मा ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष, अज्ञानी आहे की ज्ञानी, लहान आहे की वृद्ध हे पाहत नाही. अपार करुणामयी असणारा श्री हरी निस्सीम निर्व्याज प्रेम करतो. त्या उदाराला शरण जाणे एवढे मात्र आपणास करावे लागेल. शरण जा उदारा पांडुरंगा...

खट-नट यावे शुद्ध होऊनि जावे।

विश्वातील प्रत्येक जीव जर तुझीच संतान असेल, तर सामाजिक यातना आम्हीच का भोगायच्या, असा थेट देवालाच सवाल संत चोखामेळा यांनीच केला...
- समाधान महाराज शर्मा

हीन मज म्हणती देवा। कैसी घडो मज तुमची सेवा।।
श्री संत ज्ञानोबारायांच्या प्रभावळीतील संत चोखामेळा यांचे असामान्य व्यक्तिमत्त्व सामान्यपणे जनमानसात वावरत राहिले. भौतिक उदरनिर्वाहासाठी संत चोखामेळा मोलमजुरी करायचे. मात्र, विठ्ठलनामाचा ध्यास त्यांनी कधी सोडला नाही. लौकिक जगात स्थिरता नाही, याचे पूर्ण ज्ञान त्यांना होते, त्यामुळे ते संसारात रमलेच नाहीत. देवळाबाहेरून दर्शन घेत असले, तरी आत्मानुभवाने ते चराचरात देव बघत होते. देवाला डोळे भरून पाहता आले नाही, तरी देवाच्या अस्तित्वाच्या संवेदना त्यांच्या रोमारोमात होत्या. त्याच्या नामात एकरूप होऊन आत्मानुभूतीचा आनंद घ्यायचे संत चोखामेळा यांनी कधी सोडले नाही. विठ्ठल न बघताही त्याचे अभंगातून गुणगान गाणारे संत म्हणून चोखामेळा यांची अठवण येते. देव या संकल्पनेचे मूळ स्वरूप त्यांनी समाजाला समजावून सांगितले.  

संत चोखामेळा यांनी वारकरी संप्रदायातील अभेद अध्यात्म निष्ठेची ताकद उपेक्षितांपर्यंत पोचावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. ‘खट-नट यावे शुद्ध होऊनि जावे। दवनडी पिठी व्हावे चोखामेळा।’ असे संत चोखामेळा अभंगातून सांगतात. संप्रदायात कोणतीही जातपात नसते.

सर्वधर्मसमभावाचा प्रचार संत चोखामेळा यांनी आयुष्यभर केला. विश्वातील प्रत्येक जीव जर तुझीच संतान असेल, तर सामाजिक यातना केवळ आम्हीच का भोगायच्या, असा थेट देवाला सवाल करणारे केवळ संत चोखामेळाच होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com