वारी म्हणजे जीवनाला मार्ग दाखवणारा पथ

वारी म्हणजे जीवनाला मार्ग दाखवणारा पथ

वारी सोहळा म्हणजे श्रमदान... वारी म्हणजे स्वयंशिस्तीचं आगार... वारी म्हणजे नियमांचे उगमस्थान अशा अनेक नजरेतून वारीचा अभ्यास करतोय. चार वर्षांपासून वारीत पडेल ती जबाबदारी स्वीकारून काम करत आहे. त्याचा वैयक्तिक जीवनात उपयोग होतो, त्यामुळे वारी सोहळा म्हणजे जीवनाला आदर्श मार्ग दाखविणारा पदपथ आहे. त्याचा प्रत्येकाने अभ्यास करण्याची गरज आहे.

उंडवडीच्या माळावर शुक्रवारचा मुक्काम होता. रात्री पालखीतळावर कीर्तन ऐकले. त्यानंतर आमच्या डोर्लेवाडीच्या दिंडीत येऊन आराम केला. रोटी घाट सहज पार केल्याने ताण नव्हता. शुक्रवारच्या वाटचालीत पखवाज वादनाचा आनंद घेता आल्याचे समाधान शनिवारी पालखी निघतानाही होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात पालखी तळावरून पुढे मार्गस्थ झाली.

उंडवडी पठारावर अनेक वारकऱ्यांची पुढील प्रवासाच्या तयारीची लगबग सुरू होती. राहुट्या काढून वाहने पुढे जात होती. त्यातही शिस्त दिसून आली. वारकरी एका बाजूने, तर वाहने दुसऱ्या बाजूने पुढे जात होती. वारकऱ्यांच्या मुखातून बाहेर येणारे अभंग मनाला प्रसन्न करत होते.

अवघ्या आठ किलोमीटरच्या टप्प्यावर दुपारचा विसावा बुऱ्हाणपुरात होता. सव्वा ते साडेअकराच्या सुमारास सोहळा प्रत्यक्ष बुऱ्हाणपुरात पोचला. तेथील भैरवनाथ मंदिरात पादुका ठेवण्यात आल्या होत्या. तेथे गावकऱ्यांकडून पादुकांचे पूजन झाले. त्या पूजेसह आरतीला उपस्थित राहिलो. बुऱ्हाणपूरसह पंचक्रोशीतील लोक पालखी दर्शनाला आले होते. 

येथील पठारावरील प्रत्येक राहुटीत जेवणाची लगबग सुरू होती. चालत येणाऱ्या वारकऱ्यांना त्वरित जेवण मिळावे; म्हणून प्रत्येक दिंडीतील महिला वारकरी झटत होत्या. त्यांची ही लगबग प्रत्यक्ष विठ्ठल भक्तीच्या सेवेची प्रचिती देऊन गेली. गडबड होती. मात्र, त्यातही शिस्त होती. प्रत्येक वारीतून काहीतरी नवीन शिकतोय. यंदाही अनेक गोष्टी शिकता आल्या. मला पखवाज वादनाचा छंद आहे. दिंडीच्या भजनावेळी माझ्याकडे ती जबाबदारी असते. ती मी नियमित पार पाडतो. 

सोहळ्यात आज 
पालखी सोहळा बारामतीहून सणसरकडे मार्गस्थ होणार 
काटेवाडीत धोतराच्या पायघड्या घालून होणार स्वागत 
दुपारचा विसावा काटेवाडीत 
विसाव्यानंतर काटेवाडीत पालखीला मेंढ्यांचे रिंगण 
सायंकाळी सोहळा सणसरला मुक्कामी विसावणार

(शब्दांकन - सचिन शिंदे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com