समतेची शिकवण देणारा सोहळा

समतेची शिकवण देणारा सोहळा

आमच्या घरात पंढरीच्या वारीची परंपरा तब्बल सव्वाशे वर्षांपूर्वी माझी आजी तानूबाई हिने सुरू केली. पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हायचे आणि परत फिरायचे, हा तिचा नित्यनेम. त्यासाठी ती आषाढी वारीची वाट पाहात नव्हती. दर्शनाची आस लागेल तो दिवस वारीचा मानायची. 

एक दिवस आजी पंढरपूरला पायी गेली. विठ्ठल दर्शनासाठी शेवटच्या गाभाऱ्यात पोचल्यावर आमच्या गावातील एकाने तिला, ‘तुमचा मुलगा आजारी आहे,’ असे सांगितले. त्याच क्षणी तिच्यातील माउली जागी झाली. तिने पुत्रप्रेम श्रेष्ठ माणून विठ्ठलाला तेथूनच हात जोडले आणि ती मागे फिरली. पुन्हा चालत ती घरी आली. तेव्हा अंगणातच घरातील माणसांनी तिला, ‘तुमचा मुलगा आता बरा आहे,’ असे सांगितले. त्याच क्षणी तिने घरचा उंबराही न चढता पुन्हा पंढरीची वाट धरली. म्हणजे मुलाचा आजार कळाल्यानंतर त्याच क्षणी विठ्ठल दर्शनाऐवजी मातृप्रेमाला महत्त्व देण्याची भूमिका तिने स्वीकारली; परंतु घरी गेल्यानंतर घराबाहेरच मुलगा बरा आहे, हे कळाल्यावर त्याच क्षणी पुन्हा पांडुरंगाकडे चालत निघण्याची भावना तिच्या विठ्ठलावरील निष्ठेची प्रचिती करून देते. 

आजी अशिक्षित असूनही ज्ञानेश्वरी वाचायची, हे खरे वाटत नसेल ना? होय, ती ज्ञानेश्वरी समोर ठेवायची. त्यातील प्रत्येक शब्दाला ती विठ्ठल हा एकच शब्द म्हणायची. विठ्ठलनाम हेच तिचे वाचन होते. विठ्ठलालाच तिने सर्वस्व मानले होते. जेव्हा माझे वडील वकील झाले, तेव्हा घरातील सर्वजण पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो. मीही आई- वडिलांसोबत अनेक वाऱ्या केल्या. 

शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री असताना मी जिल्हाधिकारी होतो. त्या वेळी देहू, आळंदी येथे तीर्थक्षेत्र विकासासाठी त्यांनी अनेकदा निधी दिला. त्यातून आळंदीत मोठा पूल उभारला. देहूत घाटाचे काम केले. वारकऱ्यांची सेवा हाच आपला परमार्थ मी मानला. शिवनेरीवर शिवजयंतीला जिजाऊंना बाळविडा नेण्याचा मानही मला अनेक वर्षे मिळाला. यंदा देहूच्या पालखी प्रस्थान सोहळ्यातही सहभागी झालो. मी राज्यपाल झाल्यावर सर्वप्रथम पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला गेलो. आजही मी पंढरपूरमध्ये दर्शन घेताना आधी संत चोखोबांच्या समाधीचे, संत नामदेवरायांच्या पायरीचे दर्शन घेऊन विठ्ठल गाभाऱ्यातील दर्शन बारीतून दर्शनाला जातो. कारण बारीतून दर्शनाला जाण्याचा जो आत्मिक आनंद आहे, तो ‘व्हीआयपी’ दर्शनात निश्‍चित नाही. 

मी ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवणारा आहे; पण मी माणसात देव शोधण्याचा प्रयत्न करतो. देवमाणसांचा सोहळा म्हणजे पंढरीची पायी वारी आहे. जात-पात, धर्म, लिंगभेदाचा अंशही वारीत दिसत नाही. निरनिराळ्या राज्यांतील भाविक माणुसकीची शिकवण देणाऱ्या या देवाकडे भक्तिभावाने येतात. 

लौकीकात गेला वाया ।
एकमेकाच्या पडती पाया ।।
येथे लहान असो वा वृद्ध वारकरी, एकमेकांना विठ्ठल समजून पाया पडतात. हेच या संप्रदायाचे खरे वैभव आहे. हा समतेचा पंथ आहे. सर्व जाती-पातीच्या संतमांदियाळीमध्ये लाखो भाविक एका घरासारखे राहतात, हीच खरी भारतीय संस्कृती आहे. जाती-पातीच्या भिंती झुगारून वारकरी संप्रदायाने विश्वात्मक विचारांचा स्वीकार केला. हाच आध्यात्मिक वारसा पंढरीत आहे, म्हणूनच दरवर्षी साधूसंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सारे वारकरी एका विठ्ठलतत्त्वात विलीन होतात आणि स्वतःच्या जीवनाचे सार्थक झाल्याची भावना अनुभवतात.
(शब्दांकन - शंकर टेमघरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com