यशाचे अनुकरण केल्यास गाव बदलेल : नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नागपूर- सरपंच हे मानाचे, राजकीय पद नाही, तर तो गावाच्या विकासाच्या इंजिनाचा चालक आहे. चांगल्या सरपंचांमुळे गाव आदर्श होईल. याबाबतची प्रेरणा अॅग्रोवनच्या या सरपंच महापरिषदेतून मिळेल, असे नमूद करीत केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, ‘‘गावातील प्रत्येकाशी उत्तम संबंध असेल तर ग्रामविकासाचे इंजिन पुढे नेणे शक्‍य होईल. कृषी व ग्रामीण भागातील संशोधन लोकांपर्यंत पोचविण्याचे काम ‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून होत असून, ग्रामीण भागात कौशल्य कमी नसल्याचे अहमदाबाद येथील इंडिया इनोव्हेशन फाउंडेशनमधील २० हजार संशोधकांनी दाखवून दिले आहे.’’

येथे ग्रामस्थ संशोधन करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. एखाद्या यशाचे अनुकरण करणे चुकीचे नाही. यशस्वितेचे अनुकरण केल्यास गाव बदलेल. गावातील नाल्यांचे खोलीकरण करून त्यावर बंधारे बांधल्यास गावातील शेतीत चांगले परिणाम येतील. पाण्याशिवाय शेती शक्‍य नसून गावातील जलसाठा वाढविण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

खोलीकरण केल्यास पाण्याची क्षमता पाच पटीने वाढणार असल्याचे ते म्हणाले. उन्हाळ्यात शेतीतील काहीही जाळणार नाही, अशी शपथच शेतकऱ्यांनी घेऊन यातून खतनिर्मिती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ठिबक सिंचनावर भर द्यावा, असा सल्लाही सरपंच, शेतकऱ्यांना दिला. गावात जेवढी माणसे तेवढी झाडे व पशू असले पाहिजेत. गावे समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, केवळ सरकार व परमेश्‍वरावर अवलंबून राहू नका, असा कानमंत्रही त्यांनी दिला.

Web Title: follow success, villages will change- gadkari