शेतीसाठी ‘ई-संजीवनी’!

सलील उरुणकर 
शनिवार, 7 जानेवारी 2017

शेतकरी मोठ्या प्रमाणावर व्हॉट्‌सॲप आणि फेसबुक या सोशल मीडियाद्वारे पिकांविषयी आणि शाश्‍वत शेतीपद्धतीची माहिती घेत आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान टळून चांगला भाव मिळणे आणि खर्च कमी करणे शेतकऱ्यांना शक्‍य होत आहे. ‘फार्ममेट’ या कृषी क्षेत्रातील स्टार्ट अपने राज्यातील १२ हजार गावांमध्ये ही सेवा सुरू केली असून, चाळीस हजार गावांमध्ये पुढील काळात ती पोचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

गावागावांमध्ये असलेले हवामान आणि तेथील शेतीची पद्धत ही बदलत जाते. नगर, नाशिक किंवा सातारा, कोल्हापूर किंवा पुणे जिल्ह्यांमध्ये याबाबत मोठा फरक पडतो. ‘एकीकडे खर्च वाढत आहे आणि दुसरीकडे भाव कमी मिळत आहे,’ अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. खर्च कमी करून, आरोग्याला पूरक असे उत्पादन घेणे आणि त्याला चांगला भाव मिळणे अशा प्रकारच्या शाश्‍वत शेती पद्धतीच्या शोधात प्रत्येक शेतकरी असतो. कंपन्यांकडून होणारी अनावश्‍यक आणि जादा औषधविक्री आणि अन्य प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी योग्य, अचूक, शास्त्रीय आणि विश्‍लेषणात्मक माहिती त्यांच्यापर्यंत पोचणे आवश्‍यक असते. ही माहिती हजारो गावांतील गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे उद्दिष्ट ठेवून गेल्या तीन वर्षांपासून ‘फार्ममेट ॲग्रोनॉमी सोल्यूशन्स’चे व्यवस्थापकीय संचालक मयूरेश गायकवाड आणि त्यांची टीम काम करत आहे. 

गायकवाड म्हणाले, ‘‘शेतकरी वर्षभरात करीत असलेल्या कामांचा अभ्यास आम्ही केला. त्या व्यतिरिक्त प्रत्येक गावामध्ये गेल्या दोन ते तीन दशकांतील शेती व पीक घेण्याच्या पद्धतीत झालेले बदल, तब्बल पाच हजार औषधांचा अभ्यास, मातीचे प्रकार असा विविधांगी अभ्यासाची जोड त्याला दिला. त्यामुळे राज्यातील कोणत्या भागात कोणते पीक घ्यावे, कोणत्या व किती प्रमाणात औषधांची फवारणी करावी आणि हवामानानुसार पडणाऱ्या रोगांची माहिती आम्ही शेतकऱ्यांना देतो. विशेषतः रासायनिक व जैविक औषधांचा योग्य पद्धतीने वापर करून शेतकऱ्यांचा फायदा करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. कृषी क्षेत्रात अन्यही काही स्टार्ट अप व कंपन्या काम करत आहेत, मात्र त्या प्रामुख्याने ई-कॉमर्स पद्धतीने काम करतात. ‘फार्ममेट’ शेतकऱ्यांना नुकसान होण्यापूर्वीच सावध करते आणि अडचणींवर उपायही सुचविते.’’

‘‘डॉ. रामचंद्र साबळे आणि आबासाहेब साळुंखे हे सल्लागार संचालक म्हणून, तर प्राजक्ता पाटील या कार्यकारी संचालक म्हणून ‘फार्ममेट’चे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यासह एकूण ४० जणांची टीम सध्या राज्यभरात काम करत आहे. राज्यातील बारा हजार गावांमध्ये आम्ही सेवा देत आहोत आणि येत्या काही महिन्यांमध्ये नवीन ३० हजार गावांमध्ये ती सुरू करण्याचा आमचा मानस आहे,’’ असेही गायकवाड यांनी सांगितले.

     ‘फार्ममेट’ म्हणजे ॲग्रिकल्चरल इंटिग्रेटेड मोबाईल सिस्टिम. 
     पीक आणि मातीच्या ‘आरोग्याचे’, पाण्याचे व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शन. 
     अचूक हवामान अंदाज पुरवला जातो. 
     रोग किंवा कीड पडण्याची आगाऊ सूचना शेतकऱ्यांना दिली जाते. 

शेतकरी ‘सोशल मीडिया सॅव्ही’ 
राज्यातील बारा हजार गावांमधील शेतकऱ्यांना व्हॉट्सॲप आणि फेसबुकद्वारे पीक, कीड, औषध फवारणी आदींची माहिती पोचविण्यात येते. शेतकऱ्यांची नवी पिढी मोबाईलद्वारे माहिती मिळविण्यास इच्छुक आहे. सुमारे ८० टक्के शेतकरी सोशल मीडिया वापरतात आणि त्यातील सुमारे ५० टक्के ‘ॲक्‍टिव्ह’ असल्याचा अनुभव मयूरेश गायकवाड यांनी सांगितला. शेतकऱ्यांनी स्वतःहून गायकवाड यांना १५०हून अधिक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतले आहे.

Web Title: Agriculture e-sanjeevani