आधुनिक गुऱ्हाळाद्वारे सेंद्रिय गूळनिर्मिती 

राजकुमार चौगुले
Wednesday, 20 January 2021

पहिल्या काहिलीत सुमारे पंधरा टक्क्यापर्यंत तर दुसऱ्या काहिलीत सुमारे ३० टक्क्यापर्यंत रस तापविला जातो. गेट व्हॉल्व्हच्या साह्याने तो पहिल्या काहिलीतून दुसऱ्या व तिसऱ्या काहिलीत पाठविला जातो. 

कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी मठाच्या कृषी विज्ञान केंद्राने केवळ सहा मजुरांचा वापर होणारे यांत्रिकी पद्धतीचे आधुनिक गुऱ्हाळघर उभारले आहे. त्यातून पारंपरिक गुऱ्हाळासाठी जिथे पाऊण ते एक एकरापर्यंत जागा लागते, तिथे केवळ चार गुंठ्यांत सेंद्रिय पद्धतीने गूळनिर्मिती शक्य केली आहे.   

कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवर प्रसिद्ध कणेरी मठ आहे. मठाचे कृषी विज्ञान केंद्रही (केव्हीके) आहे. कोल्हापूर हा ऊस व दर्जेदार गुळासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. साहजिकच कृषी विज्ञान केंद्रानेही हे महत्त्व व ग्राहकांची मागणी ओळखून गूळनिर्मिती सुरू केली आहे. त्यासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून आधुनिक गुऱ्हाळघर उभारले आहे. पारंपारिक गुऱ्हाळासाठी चिपाड वाळविण्यासह साठवणुकीसाठी किमान पाऊण एकर ते एक एकरपर्यंत जागा तर १५ पर्यंत मजुरांची गरज भासते. मठाने विविध ठिकाणाहून यंत्रांचा ‘सेटअप’ उभारत ६० बाय १८ फुटांत गुऱ्हाळ उभारले आहे. यात ‘क्रशिंग’साठी अतिरिक्त दोन गुंठे जागा लागते. म्हणजेच सुमारे चार चे पाच गुंठ्यात केवळ सहा मजुरांची मदत घेऊन गूळनिर्मिती शक्य केली आहे. 

प्रक्रियानिर्मिती 
 रस गाळल्यानंतर ओले चिपाड तातडीने वाळविण्यासाठी सुमारे ४० फूट लांबीचा लोखंडी ड्रायर बसविण्यात आला आहे. तो चुलवाणातील उष्णता ओढून घेऊन २० ते ३० मिनिटांत चिपाड वाळवितो. तेच जळण पुन्हा वापरले जाते.   घाणा (क्रशर) ते ड्रायर अशा चढतीच्या टप्प्याने ‘सेटअप’ बसविला आहे. ड्रायरला समांतर तीन काहिली बसविल्या आहेत. घाण्यात ऊस गाळल्यानंतर रस व चिपाड वेगळे होतात.   तयार होणारा रस एक एचपी क्षमतेच्या इलेक्र्टिक मीटरच्या साहाय्याने उचलून पहिल्या कढईत नेला जातो. तर चिपाड बाजूला न काढता कन्व्हेअर बेल्टच्या साह्याने ड्रायरकडे नेले जाते. 

पहिल्या काहिलीत सुमारे पंधरा टक्क्यापर्यंत तर दुसऱ्या काहिलीत सुमारे ३० टक्क्यापर्यंत रस तापविला जातो. गेट व्हॉल्व्हच्या साह्याने तो पहिल्या काहिलीतून दुसऱ्या व तिसऱ्या काहिलीत पाठविला जातो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आधुनिक गुऱ्हाळाचे फायदे 
ऊस गाळल्यानंतर चिपाड गोळा करणे, ते वाळविण्यासाठी लांबवर नेऊन टाकणे, वाळलेले चिपाड पुन्हा पाटीतून चुलवाणाजवळ टाकणे, त्यात ते घालणे यासाठी प्रचलित गुऱ्हाळात मजुरांची संख्या पंधरापर्यंत लागते. परंतु आधुनिक गुऱ्हाळघरात प्रामुख्याने यंत्रांचा वापर केल्याने सहा मजुरांमध्ये काम होते. 

साधारणतः: एका आधणासाठी तीन तासांपर्यंत वेळ लागतो. मात्र तीन काहिलींचा वापर केल्यास प्रक्रिया सुटसुटीत होऊन वेळेत बचत होते. प्रति काहीलीत १२५ ते १५० किलो गूळ तयार होऊ शकतो. एका दिवसात सहा ते आठ काहिली रस तयार करून गूळ तयार करता येतो.

Success story: शेळीपालनाने दिली आर्थिक प्रगतीची दिशा...

पारंपारिक गुऱ्हाळात पाऊण ते एक एकरपर्यंत जागा लागते. आधुनिक पद्धतीत ६० बाय १८ फूट जागेत तसेच क्रशिंगसाठी दोन गुंठे अशी चार ते पाच गुंठे जागा पुरेशी होते. 

पारंपरिक पद्धतीत चिमणीतून ज्वाला वाया जाते. हीच ज्वाला नव्या पद्धतीत ड्रायरसाठी वापरली जाते.

जुन्या पद्धतीत चिपाड त्वरित इंधन म्हणून वापरता येत नाही. नव्या पद्धतीत ड्रायरच्या साहाय्याने  वाळवून त्वरित उपयोगात आणले जाते.

हेही वाचा : फुलांच्या शेतीला हवा ‘एकी’चा दरवळ

गुंतवणूक 
गुऱ्हाळ उभारणीसाठी सुमारे ३५ लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. यंत्र साम्रुग्रीसाठी अठरा लाखांपर्यंत भांडवल लागले. उर्वरित खर्च बांधकामासाठी झाला. गुऱ्हाळाच्या रचनेत बदल करण्यासाठी खासगी व्यावसायिकाकडून यंत्रे तयार करून घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agriculture news Organic jaggery production by modern

Tags
टॉपिकस
Topic Tags: