शेतकऱ्यांचा सन्मान करणारी छोटी राष्ट्रे

शेतकऱ्यांचा सन्मान करणारी छोटी राष्ट्रे

फेब्रुवारी, मार्चमध्ये जेव्हा कोरोना महामारीचा अंदाज आला तेव्हा व्हिएतनाम शासनाने सर्वप्रथम शेतकऱ्यांना सुरक्षित केले. शेतकऱ्यांना सर्व अवजारे, खते, बी-बियाणे शेतावरच उपलब्ध करून देऊन शासनाने त्यांना भात शेतीबरोबरच मोठ्या प्रमाणात फळे व भाज्यांचे उत्पादन घेण्यास सांगितले. अनेक शेतकऱ्यांनी त्यांची कुटुंबेसुद्धा शेतावरच स्थलांतरित केली ती सुद्धा शासनाच्या मदतीनेच!

जगामध्ये चिमुकल्या राष्ट्रांची संख्या फार मोठी असूनही मोठी राष्ट्रे त्यांना नगण्य समजतात. वास्तविक या लहान राष्ट्रांकडूनच त्यांना कितीतरी चांगल्या गोष्टी शिकून त्या प्रत्यक्षात राबविता सुद्धा येतात. परंतु दुर्दैवाने तसे घडत नाही. भूतान हे असेच एक हिमालयाच्या कुशीमधील चिमुकले राष्ट्र. देशातील शेतकरी आनंदी तरच राष्ट्र आनंदी होऊ शकते, हे भूतानने प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून दाखविले आहे. आपला दुसरा शेजारी श्रीलंका या देशाने पश्‍चिम घाटाची श्रीमंती कायम ठेवून शेतकऱ्यांना चहाचे मळे, मसाल्याची शेती, औषधी वनस्पती यांच्या लागवडीस प्रोत्साहन देत पर्यटकांची श्रीमंती वाढवली आहे. आम्ही आमच्या पश्‍चिम घाटामध्ये मॉन्सूनचा प्रिय मित्र असलेला नागकेशर कुठे शिल्लक ठेवला नाही आणि श्रीलंकेने मात्र नागकेशराची जंगले तयार केली आहेत. मुसळधार पावसात सुद्धा आजही श्रीलंका सुरक्षित राहते आणि आमचे कोकण मात्र वाहून जाते. 

व्हिएतनाम हा असाच एक छोटा देश मला मनापासून आवडतो, तो तेथील कष्टाळू शेतकऱ्यांमुळे. तब्बल ९ कोटी ७० लाख लोकसंख्या असलेल्या या देशाच्या सीमेवर उत्तरेला विस्तारवादी चीन तर पश्चिमेला अशांत लाओस आणि कंबोडिया हे देश असले तरी व्हिएतनाम शांत आहे. वेगाने वाढणारे राष्ट्रीय उत्पादन, अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीचा कलंक नसलेले हे राष्ट्र भ्रष्टाचार, प्रदूषण आणि गरिबी यांना आपले प्रमुख शत्रू मानते. काजू उत्पादन, काळी मिरी, कॉफी, चहा, रबर, भात, साबुकंद, मका आणि रताळी येथील मुख्य पिके आहेत. अनेक लहान मोठी शहरे असलेला हा देश मुख्यतः प्रसिद्ध आहे तो शहरांना वेढलेल्या शेतीमुळे. शहरांमधील अनेक नागरिक सकाळीच त्यांच्या गाड्या घेऊन शहराबाहेर असलेल्या शेतावर जातात. तेथून ताज्या भाज्या, फळे खरेदी करतात. 

व्हिएतनाम या चिमुकल्या राष्ट्राबद्दल मुद्दाम लिहिण्याचे कारण म्हणजे तेथील शासनाने कोरोना महामारीवर केलेले उत्कृष्ठ नियंत्रण. कोरोना विषाणूचा फेब्रुवारीमध्ये अंदाज येताच प्रथम त्यांनी चीनची सीमा बंद केली. त्याचबरोबर इतर देशांशी पर्यटनसुद्धा थांबविले. लोकांना स्वच्छता, मुखपट्टी (मास्क) वापरण्याचे, तसेच सामाजिक अंतर राखण्याचे शिक्षण तर दिलेच, पण जो उल्लंघन करेल त्याला दंडापेक्षा कैदेची कठोर शिक्षा अंमलात आणली. राष्ट्रीय आपत्ती आणि नागरिकांसाठी देशाचे कर्तव्य म्हणून प्रत्येकाची चाचणी करून गरजूंना सुसज्ज रुग्णालये सुरुवातीपासूनच उपलब्ध करून दिली. याचा परिणाम अतिशय योग्य ठरला. ज्या वेळी जगामधील अनेक विकसित राष्ट्रात मार्चपासून लोक कोरोनामुळे किड्यामुंगीसारखे मृत्यू पावत होते, तेव्हा ३१ जुलैपर्यंत व्हिएतनाममध्ये कोरोनाचा एकही बळी नव्हता. आज जेव्हा बलाढ्य अमेरिकेत २ लाख ३७ हजार लोकांनी आणि आपल्या देशात १ लाख २५ हजार लोकांनी कोरोनामुळे प्राण सोडले, तेथे व्हिएतनाममध्ये फक्त ३५ मृत्यू झालेले आहेत. हे आश्‍चर्य नव्हे काय? 

फेब्रुवारी, मार्चमध्ये जेव्हा या महामारीचा अंदाज आला, तेव्हा व्हिएतनाम शासनाने सर्वप्रथम शेतकऱ्यांना सुरक्षित केले. कारण या देशाच्या आर्थिक नियोजनामध्ये कृषीचा फार मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांना सर्व अवजारे, खते, बी-बियाणे शेतावरच उपलब्ध करून देऊन शासनाने त्यांना भात शेतीबरोबरच मोठ्या प्रमाणात फळे व भाज्यांचे उत्पादन घेण्यास सांगितले. अनेक शेतकऱ्यांनी त्यांची कुटुंबेसुद्धा शेतावरच स्थलांतरित केली, ती सुद्धा शासनाच्या मदतीनेच! शेतकऱ्यांचा माल शेतावरच उपलब्ध व्हावा म्हणून शासनातर्फे फिरते विक्री स्टॉल उभे करण्यात आले. सामाजिक अंतरास यामध्ये फार महत्त्व दिले गेले. लोकांच्या आहारात ताजे मासे आणि फळे-भाजीपाला समाविष्ट होऊन प्रत्येकाची शारीरिक प्रतिकारशक्ती वाढावी हा यामागचा उद्देश होता आणि तो पूर्ण सफल झाला. 

हनोई, हो ची मिन्ह सारख्या मोठ्या शहरांमधील उद्योगधंदे कोरोनामुळे थांबवले गेले, पण तेथील कर्मचाऱ्यांना कृषी उद्योगाशी कसे जोडता येईल याचाही शासनाने स्तुत्य प्रयत्न केला. कुठेही स्थलांतरित लोकांचे लोंढे आढळले नाहीत. आज या राष्ट्रात सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू आहेत. लोक योग्य आहाराबरोबरच सामाजिक अंतर पाळतात, मुखपट्टी वापरतात, सर्वत्र स्वच्छता आढळते. कुठेही विनाकारण गर्दी आढळत नाही, सर्व जण नियमाचे पालन करतात. म्हणूनच लोकांना खात्री आहे की कोरोना आपल्याजवळ फिरकणारच नाही. आणि तो आला तरी खात्रीचा औषधोपचार लगेच उपलब्ध असतो. यालाच म्हणतात आत्मविश्‍वास! कोरोनाविरोधात सर्व राष्ट्र येथे उभे आहे. मात्र तेथे शेतकरी हा खरा कोरोनायोद्धा ठरला आहे. 

आपल्या देशात सुद्धा डॉक्टर, परिचारिका त्यांचे मदतनीस, सुरक्षा कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी या सर्वांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल कोरोनायोद्धे ठरविले, हा अतिशय स्तुत्य उपक्रम होता, पण तेवढाच सन्मान शेतकऱ्यांना सुद्धा होणे अपेक्षित होते. मुंबई-पुणे या महानगरांमधील गृहसंकुलात कडक लॉकडाउनमध्ये भल्या पहाटे अनेक अडी-अडचणींचा सामना करत शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याच्या गाड्या हजर होत, लोक शिस्तीने सर्व खरेदी करत तेही त्यांच्याकडून एक पैसा जास्त न घेता. दुधाचे वाटपही लॉकडाउनच्या पहिल्या दिवसापासूनच योग्य सुरू होते. शहरांमधील या लोकांच्या आरोग्याचा रक्षक शेतकरीच होता म्हणून हा सुद्धा एक कोरोना योद्धाच आहे. छोटी राष्ट्रे शेतकऱ्यांचा सन्मान करतात ते भूतान, श्रीलंका, व्हिएतनाम या ठिकाणची शेती पाहिल्यावर स्पष्ट होते. आम्ही मात्र स्वतःला विकसनशील समजून विकासाच्या गुढ्या उभारतो ते सुद्धा शेतकऱ्यांना गृहीत धरूनच नव्हे काय?

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com