पडीक जमिनी किंवा वनक्षेत्रामध्ये करा बीज गोळ्यांचा वापर

seed-ball
seed-ball
Updated on

पडीक जमिनी किंवा वन क्षेत्रामध्ये झाडांची लागवड करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. त्या अंतर्गत स्थानिक जातींच्या बियांचे मातीमध्ये गोळे बनवून वापरल्यास अधिक फायदेशीर ठरते. 

पडीक जमिनी किंवा जंगलामध्ये बिया केवळ उधळून दिल्यास त्यापासून झाडे वाढण्याचे प्रमाण कमी असते. कारण अनेक बिया कीटक, मुंग्या, पक्षी आणि जनावरांकडून खाल्ल्या जातात. त्यावर बुरशींची वाढ होऊन त्या नष्ट होतात. तसेच अनेक बिया दगडांवर पडतात, तिथे थोडीही माती नसल्याने बिया उगवण्यात अडचणी येतात. वाहत्या पाण्यासोबत एकाच जागेवर जमा होतात. वृक्षारोपणामध्ये येणाऱ्या अशा अडचणींवर मात करण्यासाठी बीज गोळे किंवा सीड बॉल ही संकल्पना राबवली जाते. हे गोळे माती आणि बियांपासून तयार केले जातात. त्याला ‘सीड कॅप्सूल’  म्हणूनही ओळखले जाते. यात बिया सुरक्षित राहतात. 

बीज गोळे तयार करण्याची पद्धती 
स्थानिक माती किंवा सेंद्रिय खताचा वापर करून तयार केलेल्या चिखलाचे गोळे तयार केली जातात. त्यात ज्यांचे रोपण करावयाचे आहे, त्या बिया आत भरल्या जातात. या बिया स्थानिक पातळीवरील वनक्षेत्रातून किंवा आजूबाजूच्या क्षेत्रातून गोळा केल्यास त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते. 

बीज गोळे तयार करण्याकरिता तीन भाग सुपीक माती, एक भाग गांडूळ खत किंवा सेंद्रिय खत एकत्रित केले जाते. या मातीमध्ये थोडा भुस्सा किंवा कोंडा मिसळला जातो. प्रति किलो मातीमध्ये १० ते २० ग्रॅम निबोंळी पेंडीचा वापर करावा. यामुळे कीटक व अन्य घटक या गोळ्यांपासून दूर राहतात.  

काळी माती बीज गोळे बांधण्यात व त्याच्यात ओलसरपणा बनवून ठेवण्यात मदत होते. तसेच सेंद्रिय  खते बीज अंकुरणानंतर नवीन रोपांना आवश्यक पोषक तत्त्व मिळवून देते. 

गोळे बनवण्यापूर्वी बियांना ट्रायकोडर्मा १० ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी. सुरुवातीच्या काही कालावधीपर्यंत रोगकारक बुरशीचा प्रादूर्भाव रोखला जातो. 

याच प्रमाणे बीजगोळे तयार करण्यापूर्वी जिवामृताचीही प्रक्रिया करता येते. जिवामृत तयार करण्यासाठी शेण, गोमूत्र, थोड्या प्रमाणात डाळीचे पीठ, गूळ आणि माती काही चांगल्या प्रकारे कुजवून घ्यावे. याद्वारे प्रक्रिया केलेल्या बियांचे अंकुरण आणि नवीन रोपांच्या वाढीला सहायक होते. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

बीज गोळे बियांच्या प्रकारानुसार, वेगवेगळ्या प्रजातीचे वेगवेगळे बनवावेत. काही वेळा २ ते ३ एकमेकांना पूरक प्रजातीचे बीज एकत्र मिसळूनही बीज गोळे तयार केले जातात. 

बीज गोळ्यांमध्ये बियांचा वापर करण्याआधी नैसर्गिक पद्धतीने त्याची अपक्षरण (वेदरिंग) प्रक्रिया आणि अंकुरण कालावधीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

बीज गोळे हाताने किंवा यंत्रानेही तयार केले जातात. त्याचा आकार बियांच्या आकारावर अवलंबून असतो. सामान्यत: १.२ सें.मी. ते २.५ सें.मी. व्यासाचे बीज गोळे तयार केले पाहिजेत. ते सावलीत ३ ते ४ दिवस वाळवावेत. 

बीज गोळे तयार करताना मातीमध्ये फक्त थोडासा ओलसरपणा असावा. अधिक ओलावा असल्याने बियांचे अंकुरण आधीच होण्यास सुरुवात होते. 

गवत, बांबू, हल्दू यासारख्या फार लहान बियांसाठी १.१२ सें. मी. व्यासाचे गोळे बनवावेत. मोठ्या आकाराच्या बिया उदा. आवळा, शिरीष, शिवण, सागवान, बिजा, तिन्सा, हिरडा, बेहडा, निंब, जांभूळ, मोह इ. २.५ ते ३ सें.मी. व्यासाचे गोळे बनवावेत.  काही वेळा चपट्या आकाराचे गोळे बनवता येतात. 

बियांची सुप्तावस्था, अंकुरण टक्केवारी, बियांचा आकार, स्वभाव इ. गोष्टीची माहिती घेऊन त्यानुसार गोळ्याचा आकार व प्रकार ठरवला पाहिजे. 

बीज गोळ्यांची निर्मिती करताना
शक्यतो स्थानिक बियांचा वापर करावा. उदा. हिरडा, बेहडा, कुसुम, करंज, जांभूळ, कडुनिंब, चिंच, लेंडिया, चिरोल, बीजा, मोह, सीताफळ, तिन्सा, खैर, बाभूळ, पळस, आवळा, टेंभूर्ण, उपचारिक सागवान, बांबू आणि इतर स्थानिक गवत बिया इ. 

२.५ सें.मी. व्यासाच्या गोळ्यामध्ये ३ ते ४ बिया पुरेशा आहेत. मात्र वेगवेगळ्या प्रजातीच्या बियांच्या आकारानुसार बियांची संख्या कमीअधिक करता येते. 

‘हिराई’ने आणली हिरवाई...;भाजीपाला उत्पादन ते विक्रीत महत्वाचा दुवा

दोन बीज गोळ्यांतील अंतर हे रोपांच्या प्रजातीनुसार ठेवावे. उदा. गवत प्रजातीमध्ये एक फुटाचे, तर काही वृक्ष प्रजातीकरिता त्यांच्या कॅनोपीनुसार (किमान १ मीटर व त्यापेक्षा अधिक) अंतर ठेवावे. 

रोपवनांची निर्मिती करताना किमान २ ते ५ हेक्टर क्षेत्रामध्ये बीज गोळे टाकावेत. 

वन क्षेत्रात झाडांझुडपाखालीही बीज गोळे टाकता येतात. यातून नवीन रोपांना चराईपासून सुरक्षाही मिळू शकते. 

डॉ. पी. बी. मेश्राम,   ०६२६३-५८८२९२ (सेवानिवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ, ट्रॉपिकल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, जबलपूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com