लोकांनी, लोकांसाठी, लोकांसह उभारलेले ‘लोक जैवविविधता पार्क’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

लोक जैवविविधता पार्कचा चांगला उपयोग होत आहे. झुडपे वाचवली जात आहेत. विविध प्रकारच्या वेली, सराटा, तांदुळका, खाजकुयरी, चिगूर, फांग, माठला, तरोठा आदी रानभाज्या आणि औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहेत. शेळ्या, गायींना चारा मिळत आहे. परिसरात विविध प्रकारचे किडे, फुलपाखरे, मधाची पोळी दिसत आहेत.

लोक जैवविविधता पार्कचा चांगला उपयोग होत आहे. झुडपे वाचवली जात आहेत. विविध प्रकारच्या वेली, सराटा, तांदुळका, खाजकुयरी, चिगूर, फांग, माठला, तरोठा आदी रानभाज्या आणि औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहेत. शेळ्या, गायींना चारा मिळत आहे. परिसरात विविध प्रकारचे किडे, फुलपाखरे, मधाची पोळी दिसत आहेत.

सन २००८ साली पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी ‘महाराष्ट्र जनुक कोष (मजको)’ पूर्वाभ्यास करायची संधी ‘लोकपर्याय’ संस्थेला दिली. वैराण दिसणाऱ्या डोंगरातील मन्याड खोऱ्यातील वन परिसराच्या अभ्यासातून तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची जाणीव झाली. तोपर्यंत लोकपर्याय फक्त ‘वनहक्का’च्या दृष्टीनेच पाहत होती. या अभ्यासातून लोकपर्याय संस्थेच्या कार्यकर्त्यांना वैज्ञानिक दृष्टीने ‘जैव विविधता आणि परिसर’ याविषयीची जाणीव झाली. या काळात वैजापूर (जि. औरंगाबाद), नांदगाव तालुक्यातील (जि. नाशिक) मन्याड नदी खोरे आणि परिसरातील जंगल फिरताना काही गोष्टी लक्षात आल्या. भिल, ठाकर आदिवासी भटके-विमुक्त समूह वनजमीन कसत होते. काही कारणांनी या जमिनी कसून पोट भरायला अडथळे येत होते. त्यांचे कसण्याचे हक्क मिळाले नव्हते. वनजमिनीवरही मोजकीच तुरळक झाडे उभी होती. जंगलातील सारी वनराजी पार संपली होती. काही झुडपे मात्र दिसत होती.

सन २००६ मध्ये वन हक्क कायदा आला आणि तीन दशकांच्या अथक, अहिंसक चळवळीतून २०११-१२ साली ५७ आदिवासींना चार तालुक्यांत व्यक्तिगत वन हक्क मिळाले. यापाठोपाठ २०१३-१४ मध्ये ‘महाराष्ट्र जनुक कोष’ कार्यक्रम मंजूर झाला. त्यामुळे ‘जैवविविधता आणि परिसर पुनर्निर्माण’ करण्याची मोठी संधीच मिळाली. आदिवासी समूह आता काही प्रमाणात नव शेतकरी झाले होते. त्यामुळे या वनजमिनींवर सन्मानजन्य अर्थार्जन करीतच जैवविविधता आणि सारा परिसर पुन्हा उभा कसा करायचा, हे मोठे आव्हान होते; तेही लोकांना घेऊन. याची साऱ्या समूहाला स्पष्टता येण्यासाठी पाराळा-जुनोने या गावी ‘लोक जैवविविधता पार्क’ विकसित केले गेले.

‘लोक जैविपा’ची उपयुक्तता 
लोक जैवविविधता पार्कचा लोकांना चांगला उपयोग होत आहे. तसेच, उपयुक्त वनस्पतीचा शाश्वत उपयोग करण्याचे शहाणपणही या समूहात आहे. झाडांबरोबर आज सारी झुडपे वाचवली जात आहेत. त्यांच्या वाळलेल्या काड्या सरपण म्हणून सतत मिळतात. त्यावर विविध प्रकारच्या वेली, सराटा, तांदुळका, खाजकुयरी, चिगूर, फांग, माठला, तरोठा आदी रानभाज्या आणि औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहेत. शेळ्या, गायींना चारा मिळत आहे. गावरान कोंबड्यांनाही भरपूर खुराक मिळत आहे. विविध प्रकारचे किडे, फुलपाखरे, मधाची पोळी दिसत आहेत. या स्वरूपाचा परिसर आणि जैवविविधता शेतकऱ्यांची शेती आणि शेजारच्या वनजमिनीवर विकसित होत गेली; तर त्याचबरोबर निश्चित अशी उपजीविकेची साधनेही उभी राहतील, असेही सारी माणसे पाहत आहेत. या पार्कचे महत्त्व पटल्यामुळे मराठवाड्याच्या पाच वर्षांच्या सततच्या भीषण दुष्काळातही लोकांच्या अजोड मेहनतीने ही पार्क टिकून राहिली. या वर्षीच्या पावसात हिरवाई बहरली. त्याविषयी पुढील भागात माहिती घेत आहोत.

लोकसहभागातून जैवविविधता पार्कचा आराखडा
आदिवासी शेतकऱ्यांना वनजमिनीचे हक्क मिळाळेत आणि ‘मजको’ कार्यक्रम सुरू झाला तेव्हा ‘लोकपर्याय’ संस्थेने चळवळीच्या ३५ वर्षांत लोकांसोबतच्या चर्चांमधून ठरलेल्या बाबींची आठवण करून दिली. मिळालेल्या वनजमिनीवर शेती करतानाच शेती व आसपासची झाडे तोडायची नाहीत. जमल्यास नवी झाडे लावायची. झुडपांचे राखण करायचे. शेताच्या बांधावर त्यांना हवी ती झाडे लावायची व ती राखायची, असे नियोजन ठरले. 

पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ सरांच्या मार्गदर्शनाखाली २००८ मध्ये महाराष्ट्र जनुक कोष (मजको) पूर्वाभ्यास पाराळा व जुनोने गावांतून करण्यात आला होता. यातूनच आजपर्यंत नष्ट झालेल्या व लोकांनीच सांगितलेल्या वनस्पती प्रजातींची यादी तयार झाली. नष्ट झालेल्या जैवविविधतेची माहिती संकलित झाली होती. त्याखेरीज शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीतज्ज्ञ डॉ. एस. आर. यादव हे भेटीस आले असता त्यांनी येथे १२५ वनस्पती-चारा प्रजातींची ओळख पटवली. या जैवविविधतेबद्दल माहिती मिळाल्यावर लोकांचा उत्साह वाढला आणि अशा जीविधेचे जतन करण्याचा त्यांनी संकल्प केला. त्यातून ‘लोक जैवविविधता पार्क’ (लोक जैविपा) ही संकल्पना समोर आली. त्यासाठी पाराळा येथे १.२ हेक्टर जागा निश्चित केली गेली. 

प्रारंभी पाराळा-जुनोने परिसरात केवळ मेडसिंग, वड आणि पळस या तीन वनस्पती होत्या. आज १.२ हेक्टर मधील ‘लोक जैविपा’मध्ये कडुनिंब, करंज, चिंच, पेरू, सीताफळ, आवळा, आंबा, शेवगा, खिरणी, रामफळ, कवठ, जांभूळ, बेहडा, चारोळी, लोकंडी, पळस, रिठा, सागरगोटा, भस्म्या वावर, बिब्बा, लिंबू, चिचोला, पिंपळ, हादगा, खैर, हिरडा, मोह, शतावरी, करवंद, टेंभुर्णी आदी सुमारे ४६ हून अधिक वनस्पती प्रजाती लावल्या व राखल्या आहेत. यात शेती अवजारे, चारा, औषधी वनस्पतींबरोबरच आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या वनस्पती, गवत, वेली, झुडपेही आहेत. 

आज ‘लोक जैविपा’ हे शालेय विद्यार्थ्यांपासून आदिवासी समूह ते शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत साऱ्यांचे ‘पर्यावरण शिक्षण केंद्र’ बनले आहे. येथे निरंतर प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन होत असते. आजूबाजूच्या गावांतील लोकही जाता येता-येथे येतात आणि आणि ‘लोक जैविपा’ विकसित करण्याच्या कामात अनौपचारिक सहभाग घेत असतात.

पार्क विकसित करताना लोकसहभाग महत्त्वाचा ठरला. संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त स्त्री-पुरुष पार्कमध्ये येतात. तेव्हा ते सहजपणे तेथील रोपांना आळे करणे; रोप लागवड करतात. त्याचप्रमाणे कांतिलालभाऊ मोरे, छबूभाऊ, विठाबाई, बाबूराव, हिराबाई, सुमनताई, ज्ञानेश्वर, अशी अदिवासी जनसमुदायातील प्रमुख मंडळी, वैदू येथील गवत, वनस्पती, रोपे, वेली ओळखण्यास मदत करतात. यातून त्यांची आपुलकी दिसते. मागील ४१ वर्षे लोकपर्यायने या समूहांसोबत ज्या प्रकारचे जैविक नाते प्रस्थापित केले आहे; त्याचाही मोठा भाग यामागे आहे. ते नाते यानिमित्ताने वृद्धिंगत होण्यास मदत झाली.

 शांताराम पंदेरे, ९४२१६६१८५७.
 lokparyay२०१४@gmail.com
(लेखक औरंगाबाद येथील लोकपर्याय संस्थेत कार्यरत आहेत.) 
(माहिती संकलन : कचरू त्रिभुवन, एकनाथ बागूल, लोकपर्याय कार्यकर्ते)
लेखमाला संपादन - ओजस सु. वि.
 ojas.sv@students.iiserpune.ac.in 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agro Biodiversity Park