राज्यात ७६ हजारांवर विहिरींची कामे अर्धवट

हरी तुगावकर
सोमवार, 9 एप्रिल 2018

कामे पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम
या मोहिमेत पहिल्यांदा ७५ टक्के काम झालेल्या विहिरींचे काम पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर ५० टक्के व त्यानंतर २५ टक्के अशा क्रमाने विहिरी पूर्ण करण्याचे काम केले जाणार आहे. राज्यात ७५ टक्क्यांपपेक्षा जास्त काम झालेल्या विहिरींची संख्या १३ हजार ६९४ आहे. ५० ते ७५ टक्क्यांपर्यंतचे काम झालेल्या विहिरी १८ हजार ७४२ आहेत. २५ ते ५० टक्क्यांपर्यंत काम झालेल्या विहिरी १८ हजार ७२३ आहेत. तर केवळ २५ टक्क्यांपर्यंत झालेल्या विहिरींची संख्या २५ हजार २०५ आहे. अशा प्रकारे राज्यात ७६ हजार ३६४ विहिरीचे काम रखडलेले आहे. ही कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना रोजगार हमी योजनेचे सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या आहेत.

लातूर - समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरी कार्यक्रमांतर्गत ४१ हजार ६६१ विहिरींचे कामे पूर्ण झाली आहेत. सध्या राज्यात ७६ हजार ६८९ विहिरींची कामे रखडली आहेत. या `समृद्ध महाराष्ट्र` योजनेत मराठवाडा फारच मागे आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत २९ हजार ७१९ विहिरींची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे शासनाने आता पावसाळ्याच्या आधी ही कामे पूर्ण व्हावीत, याकरिता मुदतवाढ दिली असून एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत सिंचन विहिरीचे कामे पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

 राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना सुरू केली. याअंतर्गत गावागावांत सिंचन विहिरी व्हाव्यात याकरीरिता अहिल्यादेवी सिंचन विहिरी कार्यक्रम शासनाने सुरू केला आहे. या विहिरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय व्हावी हा या मागचा उद्देश होता; पण या कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या विहिरींच्या कामांना मार्चअखेरपर्यंतची मुदत होती. पण पैसा उपलब्ध असूनही ही कामे झाले नसल्याचे चित्र सध्या दिसत आहेत. यातूनच राज्यात ७६ हजार ६८९ विहिरींचे कामे अद्यापही रखडलेली आहेत. या समृद्ध महाराष्ट्र योजनेत मराठवाडा तर फारच मागे आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत २९ हजार ७१९ विहिरींची कामे रखडलेली आहेत. यात साडेनऊ हजार विहिरींचे काम; तर केवळ २५ टक्केपर्यंतच झाले आहे. त्यामुळे अधिकारी याकडे किती गांभिर्याने पाहत आहेत हेच लक्षात येत आहे.

या योजनेच्या कामात अडचणी असल्याच्या लाभार्थी व लोकप्रतिनिधींनीही शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे विहिरी अपूर्ण असण्याची कारणे शोधून त्यावर तात्काळ उपाय योजना करणे गरजेचे आहे. लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणी समजावून घेऊन या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आता एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत विशेष मोहीम शासनाने हाती घेतली आहे.

मराठवाड्यात जिल्हानिहाय अर्धवट अवस्थेत असलेल्या विहिरींची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
जिल्हा---२५ टक्के झालेले काम---२५ ते ५० टक्के झालेले काम--५० ते ७५ टक्के झालेले काम-७५टक्के झालेले काम

औरंगाबाद--१४८५--------९००--------६५१----------८४४
बीड--------२५५६------१९८०---------१९७६------१६६३
हिंगोली----६७७---------२०५---------९३---------७३
जालना-----१२२२--------८१९---------८०९---------५९२
लातूर-----५५९---------७२१---------१५४१---------५७१
नांदेड------१२९२--------११७२--------८१६---------३८५
उस्मानाबाद---४२०--------२८९---------२९३--------२३१
परभणी------१४०१--------११२६---------११३४--------१२१८
एकूण-----९६१२---------७२१२------------७३१३--------५५८२


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news 76000 well work uncomplated