खारपाणपट्ट्यात पेरू, लिलीसह बहुपीक शेती

श्रीधर ढगे
Wednesday, 24 January 2018

खारपाणपट्ट्यात प्रयोगशील शेती करणे जिकिरीचे, आव्हानात्मक असते. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील येऊलखेड येथील शशिकांत व सुवर्णा या पुंडकर दांपत्याने प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीद्वारे अशा भागात शेडनेट, कारले, काकडी, पेरू, मत्स्यशेती आदींद्वारे प्रयोगशीलतेचे दर्शन घडवले. मार्केटची मागणी लक्षात पीक पद्धती आखत आर्थिक स्रोत बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.

खारपाणपट्ट्यात प्रयोगशील शेती करणे जिकिरीचे, आव्हानात्मक असते. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील येऊलखेड येथील शशिकांत व सुवर्णा या पुंडकर दांपत्याने प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीद्वारे अशा भागात शेडनेट, कारले, काकडी, पेरू, मत्स्यशेती आदींद्वारे प्रयोगशीलतेचे दर्शन घडवले. मार्केटची मागणी लक्षात पीक पद्धती आखत आर्थिक स्रोत बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यातील काही भाग खारपाणपट्ट्यात येतो. याच पट्ट्यात येऊलखेड गाव येते. क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनीचा पोत खराब होतो. मात्र जलयुक्त शिवारांतर्गत मोठ्या प्रमाणावर या भागात शेततळी निर्माण होण्यास मदत झाली. त्यामुळे शिवार जलमय होण्यास मोठी मदत झाली. याच गावातील शशिकांत व पत्नी सुवर्णा हे पुंडकर दांपत्य एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून प्रयोगशील शेती करीत आहे. वास्वतिक खारपाणपट्ट्यात विविध पिकांचे प्रयोग करायचे म्हणजे अनेक मर्यादा. मात्र चिकाटी व जिद्द असेल तर काहीही घडवणे शक्य होते याचाच प्रत्यय पुंडकर दांपत्याने दिला आहे. 

आकांक्षा पुढती गगन ठेंगणे 
सुवर्णा यांचे शिक्षण एमए. बीएड पर्यंत झाले आहे. त्या खासगी शिक्षण संस्थेत शिक्षिका होत्या. मात्र नोकरीपेक्षा शेतीतूनच अधिक चांगले काही घडवू या मानसिकतेतून त्यांनी नोकरी सोडून पतीला साथ देण्याचे ठरवले. आकांक्षा पुढती गगन ठेंगणे या उक्तीची प्रचिती या दांपत्याचे कष्ट पाहून येते. शशिकांत यांचे वडील भास्कर देखील हाडाचे शेतकरी आहेत. तेदेखील मोठ्या उत्साहाने शेतीत राबतात. 

फूलशेती 
पीक निवडीचे उद्दीष्ट- शेगावचे देवस्थान जवळ असल्याने फुलांना मागणी
येऊलखेडपासून सुमारे सात किलोमीटरवर शेगावचे प्रसिद्ध श्री संत गजानन महाराज यांचे मंदिर आहे . साहजिकच येथे फुलांना वर्षभर मागणी असते. हीच संधी अोळखून मंदिर परिसरातील फूल व्यावसायिकांना लिलीचा पुरवठा.

लिली हे बारमाही पीक. दोन वर्षांपासून या पिकाची शेती. केवळ हिवाळ्याच्या कालावधीत उत्पादन घेतले जात नाही. या काळात छाटणी केली जाते. 

दररोजची ६० ते ७० गड्डी एवढी काढणी. प्रति गड्डी १० ते १२, १५ रुपये व उन्हाळ्यात हाच जर २० ते २२ रुपयांपर्यंत मिळतो. 

लिलीचे झाड सुमारे २५ वर्षे टिकू शकते. त्यामुळे योग्य व्यवस्थापन ठेवले तर चांगले उत्पादन व उत्पन्न मिळण्यास अडचण येणार नसल्याचे शशिकांत सांगतात. बीज म्हणून कंदांची दोन रुपये प्रति नगाने लागवडीसाठी विक्री होऊ शकते. त्यातूनही मिळकतीची संधी आहे.  

शेडनेट शेती
पीकनिवड उद्दीष्ट - नवे तंत्रज्ञान व त्यातून उत्पन्नवाढ 
पुंडकर दांपत्याने १० गुंठे शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, कारले, कोथिंबीर व काकडी अशी विविध पिके घेण्याचे कसब दाखवले आहे. काही वेळा एक दोन पिकांतून फारसे काही हाती लागलेही नाही. एका वर्षात तीन पिके घेण्याचाही त्यांचा प्रयत्न राहिला. काकडी, कारल्यातून ३५ हजार ते ७० हजार रुपयांपर्यंत उत्पन्नही त्यांनी घेतले. 

सीताफळ 
पीकनिवड उद्दीष्ट - खारपाणपट्ट्यासाठी कमी पाण्यात अनुकूल फळपीक दोन वाणांची मिळून सुमारे ४०० झाडे आहेत. अद्याप उत्पादन सुरू व्हायचे आहे. 

पुरस्कारांनी दखल 
शशिकांत यांना जिल्हा परिषदेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ तर पत्नी सौ. सुवर्णा यांना उत्कृष्ट शेडनेट शेतीसाठी रोटरी कृषी दीपस्तंभ व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा स्त्री शक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अकोला येथे झालेल्या कार्यक्रमात पुंडकर यांच्या पेरू प्रयोगाचे विशेष कौतुक झाले. प्रयोगाचेही सादरीकरण झाले. शिवाय मान्यवरांना पॅकिंगमधून पेरू भेट देण्यात आले

खारपाणपट्ट्यातील शेतीचे व्यवस्थापन 
१० गुंठे शेडनेट -
एक एकर लिली फूलशेती
एक एकर पेरू 
सीताफळ सुमारे ४०० झाडे

शेततळ्यात मत्स्यशेती 
पाण्याची शाश्वत सोय म्हणून ३० बाय ३० बाय तीन मीटर आकाराचे शेततळे घेतले आहे. 
त्यात प्रथमच कटला व सायप्रिनस जातीच्या माशांचे उत्पादन ११ क्विंटलपर्यंत घेतले आहे.
जागेवरच त्याला शंभर रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. 
कुशलपणे बसवलेली पीक पद्धती 
आमच्या खारपाणपट्ट्यात पेरूचा मी केलेला पहिलाच प्रयोग असावा असे शशिकांत म्हणतात. अगदी आंब्याचे झाडसुद्धा या भागात पाहण्यास मिळत नाही. पूर्वी दोन एकरांत कपाशी घेतली. त्यातून केवळ १६ क्विंटल उत्पादन मिळाले. म्हणावे तसे उत्पन्नही हाती आले नाही. पेरूने मात्र पहिल्याच प्रयत्नात सुमारे सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. हा पीकबदल निश्चित सुखद आहे. विशेष म्हणजे अधिकाधिक व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीनेच केले आहे. दोन देशी गायी आहेत. शेणखत घरचे आहे. सीताफळाच्या नव्या बागेत सध्या कलिंगड मल्चिंगवर घेतले आहे. प्रायोगिक वृत्तीच शेतीत पुढे नेण्यासाठी कारणीभूत ठरते असेच पुंडकर दांपत्याच्या प्रयत्नांतून दिसून येते. 

पेरू
पीक निवडीचे उद्दिष्ट - खारपाणपट्ट्यात हे पीक चांगले येऊ शकेल असा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचा सल्ला 
बारा बाय दहा फूट अंतरावर एका एकरामध्ये २०१४ च्या सुमारास ४०० पेरूच्या झाडांची लागवड.
मागील ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पहिला विक्री हंगाम घेतला. प्लॉट पूर्ण संपला असून, एकरी २६ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. 
व्यापाऱ्यांनी किलोला २५ रुपये दर दिला होता. मात्र वडील व स्वतः शशिकांत यांनी आठवडी बाजारात स्वतः हातविक्री केली. त्यातून किलोला ४० रुपये दर मिळवणे शक्य झाले. 

- शशिकांत पुंडकर,  ९१५८६१५७८९


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news