‘भालीया’ गहू पोचला जागतिक बाजारपेठेत

गणेश हिंगमिरे
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

भौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेला गुजरातमधील भालीया गहू इतर राज्यांत उत्पादित होणाऱ्या गव्हापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा भारतामध्ये भौगोलिक मानांकन मिळालेला एकमेव गहू आहे. भालीया हा गहू इतर राज्यांत उत्पादित होणाऱ्या गव्हापेक्षा कसा? आणि का? वैशिष्ट्यपूर्ण आहे हे आजच्या भागात जाणून घेऊया.
 

भौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेला गुजरातमधील भालीया गहू इतर राज्यांत उत्पादित होणाऱ्या गव्हापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा भारतामध्ये भौगोलिक मानांकन मिळालेला एकमेव गहू आहे. भालीया हा गहू इतर राज्यांत उत्पादित होणाऱ्या गव्हापेक्षा कसा? आणि का? वैशिष्ट्यपूर्ण आहे हे आजच्या भागात जाणून घेऊया.
 

जगातील सर्व प्रमुख राष्ट्रामध्ये गव्हाचे पीक घेतले जाते. युरोप हा गव्हाच्या उत्पादनात क्रमांक एकवर तर चीन क्रमांक दोनवर आहे. भारताचा जागतिक क्रमवारीत गव्हाच्या उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो. भारतात कुठेही हॉटेलमध्ये जाणाऱ्या माणसांना पंजाबी खाद्य जेवणासाठी आणि दक्षिणी खाद्य हे न्याहारीसाठी हवे असते असा निष्कर्ष काही सर्वेक्षण करणाऱ्या संस्थानी मांडला आहे. 

ग्राहकांकडून प्रामुख्याने गव्हाच्या  रोटीला मागणी असते. गहू हे रब्बी हंगामामध्ये घेतले जाणारे महत्त्वपूर्ण तृणधान्य वर्गातील पीक आहे. भारतामध्ये गव्हाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक जाती आहेत. भारतामध्ये गव्हाचे पीक उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश या राज्यांत प्रामुख्याने घेतले जाते.  

जीअायमुळे वाढली मागणी 
    सध्या भारतामध्ये गव्हापासून वेगवेगळे पदार्थ बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांना चांगल्या प्रतीच्या गव्हाची आवश्यकता असते. अशातच भालीया गव्हाला जीआय मानांकन मिळाल्यामुळे या गव्हाची मागणी वाढली आहे. महाराष्ट्रातसुद्धा या गव्हाची मागणी वाढली आहे. 
    महाराष्ट्रातही काही भागांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीने गव्हाचे पीक घेतले जाते. महाराष्ट्रात पिकणाऱ्या गव्हाला गुजरातच्या भालीया गव्हाप्रमाणे जीआय मानांकन मिळू शकते. त्यामुळे त्यालाही जागतिक बाजारपेठ मिळू शकते.  
    आनंद कृषी विद्यापीठाने या भालीया गव्हाच्या जीआय मानांकन मिळण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. या संस्थेने १७ डिसेंबर २००९ मध्ये जीआय रजिस्ट्रीकडे मानांकनासाठी अर्ज सादर केला होता. 
    साधारणपणे दीड वर्षानंतर १४ फेब्रुवारी २०११ मध्ये त्यांना जीआय मानांकन मिळाले आहे. 
    जीआय मिळाल्यामुळे गुजरातमधील भालीया हा गहू जागतिक बाजारपेठांमध्ये पोचला आहे. यामुळे येथील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भागात गव्हावर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

पूरक वातावरण
    गुजरातमध्ये गहू या पिकाची भाल प्रदेशात (भाल हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ माथा असा होतो.) जास्त प्रमाणात पेरणी केली जाते.
    या प्रदेशात गव्हाच्या पिकाची योग्य वाढ होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक आणि वातावरण आहे. 
    भावनगर, अहमदाबाद आणि आनंद या जिल्ह्यांत असणाऱ्या समतोल तसेच दगड व गारगोटी नसणाऱ्या प्रदेशाला भाल प्रदेश असे म्हणतात. 
    या तीन जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या नद्या वाहतात, त्यामुळे या प्रदेशातील हवा, पाणी, माती आणि तापमान यामुळे येथे पिकणारा गहू इतर गव्हापेक्षा अद्वितीय आहे. 
    भाल प्रदेशामध्ये भालीया गव्हाचे उत्पादन स्वतंत्रपूर्व काळापासून घेतले जाते.  
    गव्हामध्ये प्रोटिन, कॅरोटीन हे घटक अधिक प्रमाणात आहेत. तसेच ग्लूटीनचे प्रमाण मर्यादित आहे. आकार एकसारखा अाणि रंग करडा पिवळा आहे. या गव्हाला जास्त पाण्याची गरज नसते. 

गव्हाचा उपयोग
    या गव्हाचा उपयोग पिझ्झा, नूडल्स, बटर तसेच येथील स्थानिक पोळी बनविण्यासाठी   करतात.
    या गव्हाची पोळी इतर गव्हाच्या पोळीपेक्षा स्वादिष्ट आणि पौष्टिक असते. असे अर्जदारांनी सिद्ध केले आहे.
    या गव्हापासून शिरा, चुरमा असे अनेक गोड पदार्थ बनविले जातात.  
    गुजरातमध्ये प्रचलित असलेले थूली (जदारीयू) हे देशी उत्पादन बनविले जाते.  
    GW-1 हे वाण गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे.  
 

- गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ 
(लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news bhalia wheat in global market