पाऊस लांबल्याने मूग, उडदाची पेरणी करू नये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

अकोला - पावसाळा सुरू होऊन दीड महिना पूर्ण झाला तरी वऱ्हाडासह संपूर्ण विदर्भातच पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे पेरण्यांची कामे खोळंबली अाहेत. पावसाचा खंड लांबत असल्याने पेरण्यांचे नियोजनसुद्धा अाता बदलण्याची वेळ येऊ शकते. ही संभाव्य परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अापत्कालीन पीक नियोजन तयार केले अाहे. यामध्ये अागामी काळात पेरणी करताना खबरदारी घेतानाच काही पिके न घेण्याबाबत सांगितले अाहे. पाऊस लांबत गेल्यास मूग, उडदाची पेरणी करू नये, असे सूचविण्यात अाले अाहे.  

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये ९० टक्के भाग हा कोरडवाहू स्वरूपाचा अाहे. पावसाच्या पाण्यावरच ही शेती अाधारीत अाहे. तशीच पीकपद्धती येथे अाहे. पाऊस वेळेत अाला तर सर्वकाही सुरळीत होत असते. नेमका यावर्षी पावसाच्या खंडाचा कालावधी लांबत चालला अाहे. १५ जुलै झाली तरी विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये लाखो हेक्टर क्षेत्र पेरणीशिवाय पडलेले अाहे. पेरणीसाठी पुरेशा पावसाची प्रतीक्षा केली जात अाहे. अधून-मधून पडणारा पाऊस हा अनियमित असल्याचा फटका खरीप पेरण्यांवर झालेला अाहे. मृगातील पावसाच्या भरवशावर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यापैकी बहुतांश जणांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागलेले अाहे. अद्यापही संकट टळलेले नाही. या सर्व बाबींचा विचार करून कृषी विद्यापीठाने आता आपत्कालीन नियोजन सुचविले अाहे.  
पाऊस हा १६ ते २२ जुलैपर्यंत उशिरा सुरू झाला तर पेरणी करताना शेतकऱ्यांनी लागवड करताना २० ते २५ टक्के बियाणे अधिक प्रमाणात वापरावे. रासायनिक खतांच्या वापरात किमान २५ टक्के कपात करावी, संकरीत वाणांखालील क्षेत्र कमी करून सरळ, सुधारीत वाणांचा अधिक प्रमाणात वापर करावा, मूग-उडीद पिकांची पेरणी अजिबात करू नये. 

पावसाळा हा २३ ते २९ जुलै दरम्यान सुरू झाला तर कपाशीची पेरणी शक्यतो करू नये, असे सांगण्यात अाले अाहे. काही क्षेत्रावर कपाशीची पेरणी करायची असेल तर देशी कपाशीचे सरळ, सुधारीत वाण वापरावेत. यावेळी बियाणे २५ ते ३० टक्के अधिक वापरावे, कपाशीच्या अोळींची संख्या नेहमीपेक्षा कमी करून एक किंवा दोन अोळी तरीच्या घ्याव्यात, ज्वारीची पेरणी करू नये. केल्यास बियाणे ३० टक्के जास्त वापरावे. खोडमाशीचा प्रादुर्भाव गृहीत धरून उपाययोजना करावी, ज्वारीमध्ये तीन किवा सहा अोळीनंतर तुरीचे अांतरपीक घेतल्यास जोखीम कमी होईल, सोयाबीनची पेरणी २५ जुलैपर्यंतच करावी, यासाठी स्वतः जवळचे बियाणे वापरावे. सोयाबीनमध्ये तुरीचे अांतरपीक घ्यावे, सोयाबीनच्या अोळींची संख्या कमी करावी, मूग व उडदाची पेरणी करू नये, अशी माहिती विद्यापीठातर्फे देण्यात अाली. 

बीबीएफ लागवड पद्धती फायद्याची

रुंद-वरंबा-सरी पद्धतीने लागवड केल्यास पावसाच्या पाण्याचे जलसंधारण होऊन पिकांना पावसामध्ये खंड पडल्यास जमिनीत मुरलेल्या पाण्याचा फायदा होतो. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या रुंद-वरंबा-सरी टोकण व अांतरमशागत यंत्राच्या साहायाने मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, मका, भुईमूग, कपाशी व ४५ सेंटिमीटर तासांमधील अंतर असलेली सर्व पिकांची पेरणी करणे शक्य होते.

Web Title: agro news cultivation late for rain late