फळवाढीच्या टप्प्यानुसार खतांचे नियोजन

विनोद इंगोले
रविवार, 25 जून 2017

पीक - संत्रा

टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव घोडेराव यांची ९ एकर शेती आहे. त्यांच्याकडे ११५० संत्रा झाडे आहेत. पूर्वी संत्रा बागेचे पारंपरिक पद्धतीने व्यवस्थापन करीत. मात्र, अलीकडे त्यांनी आधुनिक आणि पारंपरिक खत व्यवस्थापनाचा मध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. 

पीक - संत्रा

टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव घोडेराव यांची ९ एकर शेती आहे. त्यांच्याकडे ११५० संत्रा झाडे आहेत. पूर्वी संत्रा बागेचे पारंपरिक पद्धतीने व्यवस्थापन करीत. मात्र, अलीकडे त्यांनी आधुनिक आणि पारंपरिक खत व्यवस्थापनाचा मध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. 

आंबिया बहराचे नियोजन 
अमरावती जिल्ह्याच्या वरुड, मोर्शी या भागात नागपुरी संत्र्याखालील सर्वाधिक क्षेत्र आहे. या भागातील बहुतांश शेतकरी आंबिया बहर घेतात. यामध्ये २० जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत फुलधारणा होते. या बहराची फळे नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये तोडणीस येतात. नियोजन चांगले असल्यास फळतोडणी जानेवारीत देखील शक्‍य होते. या वेळी बाजारात संत्रा आवक कमी असल्याने बाजारात दरही चांगले मिळतात. 

पहिले पाटपाणी जानेवारी व दुसरे फेब्रुवारीत दिले जाते. त्यानंतर प्रवाही पद्धतीने पाणी या पिकाला द्यावे लागते. 

हलकी जमीन असल्यास महिन्याला चार पाणी देतो, अन्यथा भारी जमिनीकरिता तीन पाण्याची गरज भासते. आठवड्यातून किमान एकदा पाण्याची गरज या पिकाला भासते. उन्हाळ्यात २५ ते ३० लिटर प्रति झाड पाण्याची गरज भासते. या कालावधीत बाष्पीभवन अधिक होत असल्याने झाडाची पाण्याची गरज वाढीस लागते.

फळ झाडावर असेपर्यंत पाणी दिले जाते. फळ तोडणी झाल्यानंतर एक महिना झाडांना विश्रांती दिली जाते. या कालावधीत झाडांना पाणी दिले जात नाही. या कालावधीत बागेतील आंतरमशागतीची कामे आटोपली जातात. आंबिया बहरातील फळांचे दर्जेदार उत्पादन मिळत असले, तरी त्याला पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची ठरते. संरक्षित सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांना आंबिया बहरातून चांगले उत्पादन मिळू शकते, असे शेषराव घोडेराव यांनी सांगितले.

खतांचे व्यवस्थापन 
आंबिया बहाराकरिता जानेवारीत प्रति झाड २५ ते ३० किलो शेणखत, १०ः२६ः२६, सूक्ष्म अन्नद्रव्ये, निंबोळी ढेप यांचे मिश्रण दीड किलो याप्रमाणे दिले जाते. खत दिल्यानंतर बागेला पाणी दिले जाते. पाणी दिल्यानंतर १० ते १५ दिवसांत नवीन नवती (पालवी) येण्यास सुरवात होते. याच काळात सिट्रस सिला या किडीचा प्रादुर्भाव होतो. ही कीड नवीन नवतीवर (पालवी) प्रादुर्भाव करते. त्याचा फूल धारणेवरही परिणाम होत असल्याने उत्पादकता घटते. या किडीच्या नियंत्रणासाठी योग्य वेळी उपाययोजना केल्याचे शेषराव घोडेराव यांनी सांगितले.  

मधमाश्यांकडून परागीकरण
झाडावर फूल धारणा झाल्यानंतर मधमाश्यांमुळे परागीकरणाची प्रक्रिया होते, त्यामुळे हंगामात मधमाश्यांना हानी पोचणार नाही, अशा प्रकारे बागेचे नियोजन करावे लागते, अन्यथा मधमाश्यांना फटका बसतो, पर्यायाने फळ उत्पादनालाही फटका बसतो.

अशी मिळते उत्पादकता 
एका झाडापासून सरासरी ५०० फळे घेण्याचे नियोजन असते, त्यातून फळांचा आकार व दर्जा चांगला मिळण्यास मदत होते. फळकाढणीनंतर शेतातच फळांची प्रतवारी केली जाते. बागेतच फळे क्रेटमध्ये भरून बाजारात पाठवली जातात.   

-शेषराव घोडेराव, ९४२२५५९९०७ 

पीक - कपाशी - संतोष मुंढे   
माझी एकूण तीस एकर शेती असून, यंदा १४ एकर क्षेत्रावर कपाशी लागवड केली आहे. पूर्वी कपाशीतील अंतर ५ x १ फूट ठेवत असे. मात्र, यंदा सहा एकर क्षेत्रात ४.५ x १ फूट तर आठ एकर क्षेत्रात ४ x १ फूट अंतरावर लागवड केली आहे. यंदा ७ ते १० जून या काळात लागवड केली आहे. सिंचनासाठी शेतात एक विहीर व ३० x ३० मीटर अाकाराची दोन शेततळी आहेत.

लागवडीपूर्वी जमिनीची सुपिकता टिकवून राहण्यासाठी जास्तीत जास्त शेणखताचा वापर करतो. कपाशीला प्रतिएकरी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत १० किलो आणि १०:२६:२६  हे खत १०० किलो असा बेसल डाेस दिला आहे. सध्या निंदणी चालू असून त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने वखरणीच्या तीन पाळ्या देणार आहे. 

पीकवाढीच्या गरजेनुसार दर दोन दिवसांच्या अंतराने अर्धा तास ठिबक सिंचनाने पाणी देण्याचे नियोजन आहे. योग्य पाणी नियोजनामुळे मुळांच्या कक्षेत हवा व पाणी यांचे संतुलन राहते. पांढऱ्या मुळीची चांगली वाढ होते. पिकास दिलेल्या खतमात्रेची चांगली उचल होते. वखरणीच्या तीन पाळ्या पूर्ण झाल्यानंतर प्रतिएकरी १२:३२:१६ हे खत १०० किलो देणार आहे. जर सतत पाऊस राहिला तर जमिनीतून खतमात्रा देता येणार नाही, अशावेळी ठिबकमधून प्रतिएकरी १० किलो १९:१९:१९ हे विद्राव्य खत पंधरा दिवसांच्या अंतराने दोन वेळा देणार आहे. पिकाला फुलपात्या लागायला लागल्यावर सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत ८० मि.लि. अधिक ०:५२:३४  हे खत ६० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करतो. योग्य खत, पाणी तसेच वेळेवर कीड रोग नियंत्रणामुळे कपाशीचे मला सरासरी एकरी १३ ते १५ क्विंटल उत्पादन मिळते. 

- सोमनाथ नागवे ९८८१६३७१७९

पीक - डाळिंब - अभिजित डाके
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात डाळिंब हे प्रमुख पीक म्हणून पाहिले जाते. याच तालुक्यातील शेतकरी आता युरोपला डाळिंबाची निर्यात करू लागले आहेत. तालुक्यातील तडवळे येथील विजय मरगळे यांनी गेल्या दोन वर्षांपासून युरोपला डाळिंबाची निर्यात सुरू केली आहे. निर्यातक्षम उत्पादन घ्यायचे तर त्याचे व्यवस्थापनदेखील तसेच ठेवावे लागते. मरगळे त्याच पद्धतीने आपले पीकनियोजन ठेवतात. सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा समतोल राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपल्या मातीत कोणते अन्नघटक किती प्रमाणात आहेत हे जाणूनच खते दिली जातात. त्यासाठी दर तीन वर्षांतून माती परीक्षण केले जाते. एकात्मिक खत व्यवस्थापनावर त्यांचा भर राहतो. 

डाळिंबाचे क्षेत्र- १० एकर
वाण- भगवा
लागवड अंतर- १० बाय १२ फूट

मरगळे यांचा मृग हंगाम घेण्यावर भर असतो. हंगाम संपल्यानंतर आणि सुरू होण्याअाधी तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बोर्डो मिश्रणाची फवारणी ते घेतात. 

बोर्डोची पेस्टही लावतात. हंगाम धरतेवेळी निंबोळी पेंड १ किलो, गांडूळ खत १ किलो, जिवाणू खत १ किलो, डीएपी ५०० ग्रॅम, एमओपी २५० ग्रॅम, दुय्यम अन्नद्रव्ये २०० ग्रॅम, सूक्ष्म अन्नद्रव्ये १०० ग्रॅम यांचा डोस प्रति झाड दिला जातो. सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. मुळांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. कळी स्टेजला १२- ६१- ० हे खत एकरी ३ किलो प्रमाणे चार दिवसांतून एकदा दिले जाते. योग्य अवस्थेत कॅल्शिअम नायट्रेट एकरी ५ किलो १० ते १२ दिवसांतून एकदा दिले जाते. याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये मॅग्नेशिअम सल्फेटचा वापर होतो.  

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी महिन्यातून एकदा जिवाणू स्लरी दिली जाते. थ्रिप्सचा (फुलकिडे) प्रादुर्भाव होऊ नये यासाठी निंबोळी अर्काचा वापर होतो. एकूण वापरात सेंद्रिय खतांचे प्रमाण ४० टक्के, तर रासायनिक खतांचे प्रमाण ४० टक्के असते. जैविक खतांचेही सुमारे २० टक्के प्रमाण वापरले जाते. एकरी उत्पादन १० ते १२ टन घेतले जाते. 

- विजय मरगळे, ९९६०५२८६०८

मरगळे यांनी सांगितल्या ठळक बाबी 
खतांचा संतुलित वापर केल्याने झाडाची किडी-रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
मधमाश्‍यांचे प्रमाण बागेत वाढण्यासाठी कीटकनाशकांचा वापर समंजसपणे केला जातो. 
डाळिंबाची गोडी, चकाकी वाढण्यासाठी पालाशचा वापर योग्य केला जातो. 
झाडाच्या विश्रांती काळात अन्नद्रव्यांचे नियोजन महत्त्वाचे असते. त्यामुळेच काडी पक्व होते. चांगली गर्भधारणा होण्यास मदत होते.
कीडनाशकांचे ‘पीएचआय’ (काढणीपूर्व प्रतीक्षा काळ) पाहून वापर केल्याने डाळिंब रासायनिक अवशेष मुक्त करण्यास मदत होते.

पीक - टोमॅटो - ज्ञानेश उगले

पीकवाढीनुसारच विद्राव्य खतांचा वापर

मी दरवर्षी चार एकर क्षेत्रावर खरीप हंगामात टोमॅटोची लागवड करतो. पाच जुलै रोजी मी रोपवाटिका करतो. त्यानंतर २५ दिवसांनी म्हणजे ३० जुलैला रोपांची शेतामध्ये लागवड करतो. यादरम्यान मशागत करून लागवड क्षेत्राची तयारी पूर्ण करतो. तीन फुटांचा गादीवाफा करून त्यावर दोन ओळीत टोमॅटोची रोपे लावतो. टोमॅटोसाठी मातीपरीक्षणानुसार खतमात्रा देण्यावर माझा भर आहे. यामध्ये प्रामुख्याने एकरी चार ट्रॅक्‍टर ट्रॉली शेणखत, सुपर फॉस्फेट १०० किलो, निंबोळी पेंड १०० किलो,१०ः२६ः२६ खत १०० किलो, सल्फर ५ किलो, बोरॉन १ किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो वाफ्यातील मातीमध्ये मिसळून देतो. त्यानंतर इनलाइन लॅटरल अंथरुण घेतो. पाणीबचत आणि तण नियंत्रणासाठी प्लॅस्टिक आच्छादन पेपरचा मी वापर करतो. 

लागवडीनंतर सुरवातीचे आठ दिवस कोणतेही खत देत नाही. त्यानंतर सर्व विद्राव्य खतांच्या मात्रा पीकवाढीच्या टप्यानुसार ठिबकद्वारे दिल्या जातात. या खतमात्रा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार देतो. लागवड झाल्यानंतर आठ दिवसांनी विद्राव्य खतांच्या मात्रा देण्यास सुरवात करतो. यामध्ये १९ः१९ः१९, १२ः६१ः००, १३ः४०ः१३, ००ः५२ः३४ या खतमात्रा पीकवाढीच्या गरजेनुसार दिल्या जातात. विद्राव्य खतांची मात्रा दर पाचव्या दिवशी एकरी चार किलो या प्रमाणात दिली जाते. मला टोमॅटोसाठी एकरी १९ः१९ः१९ हे खत २५ किलो,१२ः६१ः०० हे ५० किलो,१३ः४०ः१३ हे खत ५० किलो,००ः५२ः३४ हे खत ५० किलो, मॅग्नेशियम सल्फेट ३० किलो, कॅल्शियम ३० किलो अशी खतमात्रा लागते. या विद्राव्य खतांसोबतच फुलोरा व वाढीच्या अवस्थेत मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट ही खते दिली जातात. त्यामुळे फळांची चांगली वाढ मिळते.

काही वेळा पानांवर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. ही कमतरता तज्ज्ञांकडून तपासून घेतो. त्यानंतर गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर महिन्यातून एकदा करतो. खत व्यवस्थापनात आवश्‍यक तो बदल करतो. मुळांजवळील मातीमध्ये कायम वाफसा असणे महत्त्वाचे असते. वातावरण आणि पीकवाढीच्या टप्प्यानुसार खत व्यवस्थापनात बदल केला जातो. सशक्त पीक असेल तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो असा माझा अनुभव आहे. 

शिफारशीनुसारच खतांचा वापर केल्याने फळांचे वजन, चमक, गुणवत्ता, टिकवणक्षमता वाढते. विद्राव्य खतांमुळे पिकाला आवश्‍यक असलेली अन्नद्रव्ये मुळांच्या कक्षेतच उपलब्ध होतात. त्यामुळे अन्य रासायनिक वरखतांचा अनावश्‍यक वापर वाचतो. टोमॅटोचे पीक साडेतीन महिन्यांनंतर सुरू होते. खतांसाठीच्या खर्चात दर वर्षी १० ते ३० टक्‍क्‍यांनी वाढ होते. टोमॅटोसाठी लागणाऱ्या खर्चाच्या किमान ४० ते ५० टक्के खर्च एकट्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाला लागतो, त्यामुळे एकात्मिक खत व्यवस्थापनावर माझा भर आहे.
- प्रकाश काकड, ८६९८०३३९३६

Web Title: agro news fertilizer management for fruit increase