कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी इंडोनेशियावर लक्ष केंद्रित

राजकुमार चौगुले 
गुरुवार, 11 जानेवारी 2018

कोल्हापूर - भारतातून कच्ची साखर इंडोनेशियात निर्यात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. वाहतुकीचे अंतर कमी असल्याने या देशाशी निर्यातीचा करार करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या देशाशी प्राथमिक बोलणी झाली असून, इंडोनेशियाने भारतातून साखर आयातीचा निर्णय घेतल्यास साखर उद्योगाला फायदा होऊ शकतो. कच्ची साखर निर्यातीसाठी इंडोनेशिया, चीन तर पक्‍क्‍या साखरेच्या निर्यातीसाठी श्रीलंका, बांगलादेश या देशांच्या धोरणांचा नजीकच्या काळात अभ्यास करून, सकारात्मक बोलणी अपेक्षित आहेत. 

कोल्हापूर - भारतातून कच्ची साखर इंडोनेशियात निर्यात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. वाहतुकीचे अंतर कमी असल्याने या देशाशी निर्यातीचा करार करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या देशाशी प्राथमिक बोलणी झाली असून, इंडोनेशियाने भारतातून साखर आयातीचा निर्णय घेतल्यास साखर उद्योगाला फायदा होऊ शकतो. कच्ची साखर निर्यातीसाठी इंडोनेशिया, चीन तर पक्‍क्‍या साखरेच्या निर्यातीसाठी श्रीलंका, बांगलादेश या देशांच्या धोरणांचा नजीकच्या काळात अभ्यास करून, सकारात्मक बोलणी अपेक्षित आहेत. 

इंडोनेशियाशी प्राथमिक बोलणी 
जागतिक पातळीवर ब्राझील व थायलंडमध्ये सर्वाधिक कच्ची साखर तयार होते. इंडोनेशियामध्ये गरजेच्या पूर्ततेइतके साखर उत्पादन नसल्याने कच्ची साखर आयात केली जाते. थायलंडने निर्यातीसंदर्भात इंडोनेशियाशी करार करताना आयात शुल्क अन्य देशांच्या तुलनेत कमी करून घेतले. फक्त आवश्यकतेच्या वेळी साखर उपलब्ध करून देण्याचा सामंजस्य करार या दोन देशांत आहे. यामुळे दोन्ही देशांनाही त्याचा फायदा झाला आहे. असाच करार भारताच्या वतीनेही करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू झाले आहेत. इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाशी प्राथमिक बोलणीही झाली आहे. 

पक्क्या साखरेपेक्षा अन्य पदार्थांकडे कल आवश्‍यक
सध्याच्या साखर उद्योगाकडे पाहिल्यास पक्‍क्‍या साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मागणी अत्यंत कमी असते. भारतात अतिरिक्त पक्की साखर तयार झाल्यास तिला अन्य देशांमध्ये विक्रीयोग्य संधी कमी आहेत. बहुतांश वेळा सरकारी धोरणे व आंतराष्ट्रीय मागणी याचा विचार केल्यास पक्की साखर निर्यात करण्याचा व्यवसाय हा आतबट्ट्याचा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. यापेक्षा कच्ची साखर व मोलॅसिस, इथेनॉलची निर्मिती फायदेशीर ठरू शकते, असा साखर उद्योगाचा सूर आहे. कच्च्या साखरेच्या निर्यातीला चालना मिळाल्यास कारखान्यांवरील मोठा ताणही हलका होऊ शकतो. यामुळे कच्ची साखरच निर्यात करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

पुण्यात विचारमंथन शक्‍य
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत इंडोनेशियाचा मार्ग त्यांना संयुक्तिक वाटला. मंत्री महोदयांनी तातडीने हालचाली करीत या उद्योगातील अधिकारी, तज्ज्ञ यांना सूचना दिल्या. साखर निर्यातीबाबत नेमकेपणा आणण्याच्या दृष्टीने सर्व संबंधितांची बैठक घेण्याचे आदेश दिले. येत्या काही दिवसांत ही बैठक पुण्यात होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत साखर तज्ज्ञांबरोबर केंद्र शासनाचे प्रतिनिधी, अधिकारीही सहभागी होणार असून, विविध देशांच्या पर्यायावर विचारमंथन होण्याची दाट शक्‍यता आहे.

महासंघाचे पदाधिकारी भविष्यात साखर निर्यातीबाबत शेजारील देशांचा दौरा करून परिस्थितीचा अंदाज घेणार आहेत. यानुसार निर्यातीसाठी सकारात्मक वातावरण तयार करण्याचे काम हे पदाधिकारी करतील. यानुसार केंद्र शासन त्यांच्या पातळीवरचे करार करेल. महासंघ व केंद्र शासन यांच्या समन्वयाने अन्य देशांमध्ये निर्यातीसाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी तज्ज्ञांबरोबर विचार मंथनासह या संभाव्य देशांतील परिस्थिती जाणून घेण्याबाबतचा प्रस्ताव महासंघाने मंत्री महोदयांना दिला असून, त्यांनी तो मान्य केला आहे. 
- प्रकाश नाईकनवरे (व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ)

Web Title: agro news Focusing on Indonesia for export of raw sugar