कर्जमाफीची आजपासून अंमलबजावणी - फुंडकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

बुलडाणा - राज्य सरकारने शेतकऱ्यांना एेतिहासिक अशी कर्जमाफी दिली अाहे. या कर्जमाफीची अंमलबजावणी बुधवारपासून (ता.२८) होणार आहे, अशी माहिती कृषी, फलोत्पादनमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. शहरात मंगळवारी (ता. २७) विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात अाला. या वेळी त्यांनी अनौपचारिक चर्चेमध्ये ही माहिती दिली; तसेच तूर खरेदीच्या मुद्यावर शासन गंभीर असल्याचे सांगत तुरीची जी नोंदणी झाली त्या तुरीची खरेदी केली जाणार असल्याचे कृषिमंत्र्यानी स्पष्ट केले. 

बुलडाणा - राज्य सरकारने शेतकऱ्यांना एेतिहासिक अशी कर्जमाफी दिली अाहे. या कर्जमाफीची अंमलबजावणी बुधवारपासून (ता.२८) होणार आहे, अशी माहिती कृषी, फलोत्पादनमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. शहरात मंगळवारी (ता. २७) विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात अाला. या वेळी त्यांनी अनौपचारिक चर्चेमध्ये ही माहिती दिली; तसेच तूर खरेदीच्या मुद्यावर शासन गंभीर असल्याचे सांगत तुरीची जी नोंदणी झाली त्या तुरीची खरेदी केली जाणार असल्याचे कृषिमंत्र्यानी स्पष्ट केले. 

कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर कृषिमंत्री फुंडकर यांचे पहिल्यांदाच मंगळवारी (ता.२७) बुलडाणा शहरात आगमन झाले. त्या निमित्ताने जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने त्यांचा सत्कार कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर जि. प. अध्यक्षा उमाताई तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस आदी उपस्थित होते. 

कृषिमंत्री म्हणाले, की शासनाने ऐतिहासिक असा निर्णय घेत शेतकऱ्यांची ३० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे. या कर्जमाफीमुळे शेतकरी आनंदीत झाला असून येणाऱ्या खरीप हंगामात मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. या निर्णयाचे अनेक फायदे होणार आहेत. त्यापैकी राज्यातील जवळपास ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. कर्जमाफीचा निर्णय हा सहजासहजी झाला नसल्याचे सांगत कृषिमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफी या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन उच्चस्तरीय मंत्रिगटाची स्थापना केली. या मंत्रिगटाने आंदोलनकर्त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी, सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरसकट दीड लाख रुपयापर्यंतच्या पीककर्जाला माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातला कर्जामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी सुखावला आहे. शासनाने सर्व तांत्रिक कारणे निकाली लावून सर्वंकष असा हा निर्णय घेतला आहे. कुठल्याही प्रकारच्या जमिनीची अट शासनाने यामध्ये ठेवली नाही. सरसकट दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली आहे; तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देत २५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याआधीच्या कर्जमाफी निर्णयांमध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार करण्यात आलेला नव्हता. या निर्णयात मात्र नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रकर्षाने विचार करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी तातडीने दहा हजार रुपये मदत देण्यात येत आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. या वेळी जि.प. अध्यक्षा उमाताई तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी; तर अाभार संजय वडतकर यांनी मानले. 

Web Title: agro news Implementation of debt waiver from today