वाढवा म्हशीची उत्पादकता

गाभण काळात म्हशीला सकस आहार मिळाल्यामुळे गर्भाची वाढ चांगली होते.
गाभण काळात म्हशीला सकस आहार मिळाल्यामुळे गर्भाची वाढ चांगली होते.

म्हशीपासून अधिक दूध मिळवण्यासाठी जास्त वेत होणे महत्त्वाचे आहे. दर १५ महिन्यास एक मिळून आयुष्यात १० ते १२ वेतांची अपेक्षा करताना पारडी लवकर वयात येतील, दोन वेतातील अंतर कमी होईल आणि योग्य आहार व्यवस्थापन याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे म्हशीपासून अधिक दूध मिळेल.
 

जनावरांत जास्त दूध मिळणे ही संकल्पना त्यांच्या वेताशी निगडित आहे. म्हशीकडून आयुष्यात १० ते १२ वेतांची अपेक्षा असते. प्रत्यक्षात मात्र सरासरी ७ ते ८ वेतच मिळतात. वयात लवकर न येणे, माज ओळखता न येणे अाणि दोन वेतातील अंतर जास्त असणे या प्रमुख बाबी कमी अपेक्षीत वेत न मिळण्यासाठी कारणीभूत ठरतात. 

पारडी साधारणपणे ३२ ते ३६ महिन्यांत माजावर येतात. बऱ्याच ठिकाणी पारडी ४-५ वर्षांच्या झाल्या तरीही माज दाखवत नाहीत. जनावर माजावर येणे ही बाब वय अाणि शारीरिक वाढीवर अवलंबून असते. पारडीची शारीरिक वाढ झपाट्याने होण्यासाठी जन्मापासून त्यांच्या आहाराची काळजी घेणे अावश्यक असते. शारीरिक वाढीचा वेग जन्मासमयीच्या वजनाशी निगडित असतो. म्हणून गाभण काळात म्हशीला सकस व भरपूर आहार दिल्यास वासरू सुदृढ होईल व दुधही भरपूर मिळेल. शारीरिक वाढ झपाट्याने होईल.

म्हशीचा माज काळ -
म्हशीचा माज ओळखता येणे ही एक महत्त्वाची बाब आहे. कारण म्हशीमध्ये माजाची लक्षणे स्पष्ट दिसत नसल्याने माज ओळखणे थोडे कठीण आहे.

बहुतांश म्हशी सायंकाळनंतर माजावर येतात. म्हशी मुख्यत्वे ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात माजावर येतात. शक्यतो उन्हाळ्यात म्हशी माजावर येत नाहीत. उष्ण तापमानाचा त्रास म्हैस सहन करू शकत नसल्याने उन्हाळ्यात म्हशी माज दाखवत नाहीत. म्हणून म्हशींना उन्हाळ्यामध्ये थंड सावलीच्या जागी ठेवल्यास व दररोज दुपारी थंड पाण्याने अंघोळ घातल्यास उन्हाळ्यातही म्हशी माजावर येतील.

माजाची लक्षणे व भरवण्याची वेळ -
म्हैस माजावर असल्याची प्रमुख लक्षणे म्हणजे म्हैस थोडी-थोडी वारंवार लघवी करू लागते. सतत ओरडते, निरण सुजल्यासारखे वाटते, अशी लक्षणे ओळखून म्हैस माजावर आल्याचे लक्षात आल्यास तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून योग्यवेळी भरवून घ्यावी. 

सकाळी माजावर आलेल्या म्हशी त्याच दिवशी सायंकाळी व सायंकाळी माजावर आलेल्या म्हशी दुसऱ्या दिवशी सकाळी भरवाव्यात. म्हणजे फलन होण्याची शक्यता वाढते आणि म्हैस गाभण राहते.

म्हैस ही सिद्ध वळूचे कृत्रिम रेतन वापरून भरावी म्हणजे अधिक दूध देणाऱ्या रेड्या/ पारड्या मिळू शकतील.

हवेशीर गोठा -
म्हशींना शक्य तितका वेळ सावलीत ठेवावे. झाडांची तसेच गवताच्या छताची सावली अधिक चांगली असते. तीव्र उन्हाच्या वेळी छतावर पाणी शिंपडून थंड करावे. जेणेकरून गोठ्यातील तापमान ४-५ अंशांनी कमी होईल. 
गोठ्याच्या परिसरात सावलीसाठी आंबा, कडुलिंब अशी झाडे लावावीत. गोठा नेहमी स्वच्छ व कोरडा ठेवावा.

दोन वेतातील अंतर -
म्हशी विल्यानंतर तीन महिन्यांची लैंगिक विश्रांती देणे आवश्यक असते. म्हणजे या काळात म्हैस माजावर आल्यास भरवू नये. 
म्हैस विण्यापूर्वी, विताना आणि नंतर त्यांच्या आहाराकडे लक्ष दिल्यास व योग्य निगा राखल्यास म्हशी विल्यानंतर लवकर माजावर येतात व म्हशीकडून साधारणपणे १५ महिन्यांस एका वेताची अपेक्षा करता येईल.
 

गाभण काळात म्हशीची काळजी
म्हशीला सकस व भरपूर आहार मिळाल्यामुळे गर्भाची वाढ चांगली होते. प्रसूती सुलभ होते, वासरू सुदृढ जन्मते आणि दुधही भरपूर मिळते. म्हशीच्या विताच्या वेळी तिची सतत काळजी घेणे आवश्यक असते. 

म्हशीच्या प्रजननातील एक महत्त्वाचा अडथळा म्हणजे जनननेंद्रियांचा दाह गायीपेक्षा म्हशींमध्ये जननेंद्रियाच्या दाहाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे कधी कधी म्हैस पूर्णपणे वांझ होण्याची शक्यता असते. 

म्हैस विल्यानंतर ८-१० दिवस गर्भाशय मुख उघडे असते. अशावेळी म्हैस घाण पाण्यात डुंबल्यास रोगजंतूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. घाण पाण्यामुळे कासदाह अाजार होण्याची शक्यता असते. गाभण, विलेली व दुधात असलेली म्हैस साचलेल्या घाण पाण्यात डुंबणार नाही याकडे लक्ष द्यावे.

दुभत्या म्हशीचे आहार व्यवस्थापन
विल्यानंतर म्हशीला शारीरिक व  जननेंद्रियाची झीज भरून काढण्यासाठी एक ते दीड महिना लागतो. या कालावधीमध्ये म्हशींना पुरेसा व सकस आहार देणे गरजेचे असते. शक्यतो प्रथिनयुक्त चारा म्हशींना द्यावा. 
चाराटंचाईमुळे जनावरांना हिरवा चारा न देता आल्यास वाळलेला चारा उदा. गवत, ज्वारी कडबा, उसाचे वाढे, या वरती १ टक्का युरिया प्रक्रिया करून द्यावा. प्रति म्हैस ५० ग्रॅम प्रति दिन इतके खनिज मिश्रण द्यावे. 
उन्हाळ्यात म्हशीची पाण्याची गरज ३० टक्क्यांनी वाढते. म्हणून म्हशींना मुबलक थंड आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.

- डाॅ. डी. के. देवकर, ९४२३००३३६४ (गोसंवर्धन विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com