भारतीय मसाल्यांची कीर्ती जगभरात

गणेश हिंगमिरे
शुक्रवार, 28 जुलै 2017

जगभरात मसाल्यांसाठी भारताची वेगळी ओळख आहे. खरं तर इतिहास असं सांगतो, की अनेक व्यापारी आणि खलाशी भारतीय मसाल्यांच्या जगद्ख्यातीमुळे भारत देशाचा शोध घेण्यास निघाले. त्याला वास्को दी गामा आणि कोलंबसही अपवाद नाही. अमेरिकेचा शोध लावणारा कोलंबस हा खलाशी भारतीय मसाल्यांच्या ख्यातीमुळेच प्रवासाला बाहेर पडला होता.

जगभरात मसाल्यांसाठी भारताची वेगळी ओळख आहे. खरं तर इतिहास असं सांगतो, की अनेक व्यापारी आणि खलाशी भारतीय मसाल्यांच्या जगद्ख्यातीमुळे भारत देशाचा शोध घेण्यास निघाले. त्याला वास्को दी गामा आणि कोलंबसही अपवाद नाही. अमेरिकेचा शोध लावणारा कोलंबस हा खलाशी भारतीय मसाल्यांच्या ख्यातीमुळेच प्रवासाला बाहेर पडला होता.

भारतात यायच्या ऐवजी तो अमेरिकेत पोचला. म्हणूनच काही इतिहासकारांनी अमेरिकेतील ज्या समूहाला कोलंबस प्रथम भेटला त्यांना रेड इंडियन्स असे संबोधले आहे. असा हा आपला मसालेजन्य देश पूर्वीपासून जगाचे आकर्षण ठरला आहे. येथे विविध पदार्थांचे मसाले वेगवेगळ्या भागात पिकतात. दक्षिण भारतात वेलदोड्यासारखे मसाले तर इशान्य भारत मिरची आणि तत्सम मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. या मसाल्यांपैकी काही मसाल्यांनी “जी आय” घेतले आहे. जगही पादाक्रांत केले आहे. अश्या “जीआय”धारक मसाल्यांची माहिती आपण घेत राहूयात. 

मसाल्यांनी मिळवले जीआय 
भारत सरकारने काही वैशिष्ट्यपूर्ण भारतीय पदार्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी महामंडळे (बोर्ड) स्थापन केली आहेत. उदाहरणार्थ टी बोर्ड (भारतीय चहाच्या प्रसिद्धी आणि प्रसारासाठी ), कॉफी बोर्ड. मसाल्यांचे वर्गीकरण, प्रसिद्धी, प्रसार, संशोधन आणि व्यापारीकरण अशा घटकांना धरून ‘स्पाइस बोर्ड ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यात आली आहे. नुकत्याच प्रसिद्ध जाहीरनाम्यात या संस्थेने एक सूचना मांडली. भारतातून निर्यात होणाऱ्या मसाले उत्पादनांवर “जीआय” नोंदणीचा उल्लेख असावा, ही ती सूचना आहे.

मिरची सर्वांत वरच्या क्रमांकावर 
भारतात नोंद झालेल्या अनेक मसाल्यांतील “जीआय” पैकी मिरचीचा क्रमांक वरचा आहे. भारताच्या उत्तर भागातून नागा (भूत जोलोकिया) व तर दक्षिणेतून ब्याडगी मिरचीची “जीआय” म्हणून नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातून भिवापुरी मिरचीला जीआय मिळाले आहे. प्रत्येक मिरचीचे वेगळे वैशिष्ट्य आहे. त्यात काही मिरच्या अधिक तिखट आहेत, तर काही रंगाने लाल म्हणून तर काहींनी आकाराचा फायदा घेत जीआयची नोंद केली आहे. 

तिखटातील राणी मिरची 
मिरचीमध्ये कॅप्सीसिन रसायन जितक्या अधिक प्रमाणात असते तितक्या अधिक प्रमाणात तिचा तिखटपणा असतो. हे रसायन मिरचीच्या अन्य वाणांपेक्षा नागा या आसामच्या मिरचीमध्ये अधिक अाहे. त्यामुळे तिची तिखटातील राणी मिरची अशी ओळख झाली आहे. त्या मिरचीच्या “जीआय”ची यशोगाथा आपण पाहूया. इशान्येकडील प्रदेश हा देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अनेक बाबतींत वेगळा आहे. येथील वैशिष्ट्यांच्या अनेक रहस्यांपैकी एक म्हणजे येथील पदार्थांत वापरले जाणारे विशेष प्रकारचे मसाले. ईशान्येकडे मसाल्यांची अतिशय अनन्यसाधारण श्रेणी आहे. जिची चव अतिशय वेगळी असल्याने देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही या मसाल्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ईशान्य भारतातील आदिवासी आणि स्थानिक जमाती नैसर्गिक पद्धतीने मिरचीची शेती करतात. शिवाय या भागातील जमीन अतिशय सुपीक असल्याने सुगंधी मसाल्यांचे उत्पादन घेण्यासाठी अतिशय अनुकूल आहे.

भारत हा जगातील सर्वांत मोठा मिरचीचा उत्पादक आणि निर्यातदार आहे. भारतीय मिरचीला जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. युरोपातील पिझ्झा असो की चीनमधील नूडल्स या सर्व पदार्थांना अनोखी चव देण्यासाठी भारतातील विविध प्रकारच्या मिरच्यांचा खूप मोठा वाटा आहे. अशाच भारतातील काही मिरच्यांची माहितीही आपण घेणार आहोत. 

नागा मिरची
नागा मिरचीच्या इतिहासाची कथा समजवून घेण्यासाठी अधिकृत कागदपत्रांचा पुरावा नसला, तरीही त्याच्या उत्पादनाच्या इतिहासाची ग्वाही देणाऱ्या अनेक कथा आणि गाणी आहेत. नागालॅंडमधील अनेक नागा जमातींमध्ये या मिरचीचे उत्पादन आणि त्यावरच्या कथा आणि गाण्यांचा उल्लेख पिढ्यानपिढ्यापासून होत आला आहे. अशी ही मिरची फक्त अन्नपदार्थ म्हणूनच लोकप्रिय नसून तिच्या औषधी गुणधर्मांसाठीही तितकीच प्रसिद्ध आहे. यातील विष प्रतिकारकशक्ती तसेच अन्य अनेक गुणधर्म या मिरचीला वेगळेपण देतात. एवढेच नव्हे तर या मिरचीचा उपयोग स्थानिक उत्सवातील स्पर्धामध्ये तसेच युद्धामध्ये शस्त्र म्हणूनही केला आहे. तेथील अंगामी बोलीभाषेत या मिरचीचा तिखटांचा राजा असाही उल्लेख आहे. तर चैबे बोलीभाषेत या मिरचीला प्रतिष्ठित प्रतिमा तसेच उच्च दर्जा असलेला एखादा नेता अशा प्रतिमेने ओळखले जाते. या मिरचीबाबत अजून काही माहिती पुढील भागात पाहू.

- गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ 
(लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

Web Title: agro news Indian spices famous in world