सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचा प्रादुर्भाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

अकोला - जून महिन्यात लागवड झालेल्या सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचे आक्रमण वाढले आहे. पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात पेरणी झालेले सोयाबीन पीक बहुतांश भागात वाढीच्या अवस्थेत असून, आत्ता झालेला पाऊस त्यासाठी पोषक ठरला आहे. वऱ्हाडात आतापर्यंत सुमारे साडेसहा लाख हेक्टरपर्यंत सोयाबीनची लागवड झाली आहे. यापैकी किमान १५ ते २० टक्के क्षेत्रावर या अळीचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता सूत्रांनी बोलून दाखवली.  

अकोला - जून महिन्यात लागवड झालेल्या सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचे आक्रमण वाढले आहे. पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात पेरणी झालेले सोयाबीन पीक बहुतांश भागात वाढीच्या अवस्थेत असून, आत्ता झालेला पाऊस त्यासाठी पोषक ठरला आहे. वऱ्हाडात आतापर्यंत सुमारे साडेसहा लाख हेक्टरपर्यंत सोयाबीनची लागवड झाली आहे. यापैकी किमान १५ ते २० टक्के क्षेत्रावर या अळीचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता सूत्रांनी बोलून दाखवली.  

अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांमध्ये सोयाबीन हे प्रमुख पीक असून, दरवर्षी सात ते आठ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होते. या वर्षी अनियमित पावसामुळे सोयाबीनची पेरणी प्रभावीत झालेली आहे. काही भागात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात झालेली पेरणी साधली तर काही ठिकाणी पावसाच्या खंडामुळे पेरणी मोडावी लागली. जे पीक वाचले ते सध्या बहारावर आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी पिकाला झाला असून, लवकरच फुलोरावस्थेत हे पीक येणार आहे. अशा महत्त्वाच्या काळात सोयाबीनवर अळीची प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यातच गेल्या तीन ते चार दिवसांत ढगाळ वातावरण राहत असल्याने या अळीला पोषक परिस्थिती मिळत आहे. 

अशी आहे हिरवी उंट अळी
ही अळी हिरव्या रंगाची असून, ती उंटासारखा बाक काढून चालते. पानांचा हिरवा भाग फस्त करते. मोठ्या अळ्या पानाचा सर्व भागही खातात. प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक शेतांमध्ये सोयाबीनच्या झाडांवरील पानांची चाळणी झालेली दिसून येते. शिराच शिल्लक दिसत आहेत. काही भागात सोयाबीन लवकरच फुलोरावस्थेत पीक येणार आहे. अशा स्थितीत ही अळी पिकाला मारक ठरण्याची भीती आहे.

नियंत्रण उपाय 
शेतकऱ्यांनी पिकाचे सर्वेक्षण करावे. आर्थिक नुकसानीची पातळी पाहताना ४ लहान अळ्या प्रतिमिटर ओळीत आढळल्यास शिफारसीत कीटकनाशकांचा वापर करावा. प्रोफेनोफॉस (५० इसी) २० मिली किंवा क्लोरॲट्रानिलीप्रोल (१८.५ इसी) ३ मिली किंवा इन्डोक्साकार्ब ६.६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून नॅसपॅक पंपाने फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

क्रॉपसॅपला मुहूर्त कधी !
सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याचे क्षेत्र किती आहे, याची जिल्हा यंत्रणांकडे कुठलीच माहिती उपलब्ध नाही. या विभागात अद्याप क्रॉपसॅप प्रकल्पाचे काम सुरू झालेले नसल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे. राज्यात २००९-१० पासून राष्ट्रीय कृषी विभाग योजनेखाली क्रॉपसॅप हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला जातो. पिकांवरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला देण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून किडरोगांच्या सद्यःस्थितीवर आधारित शास्त्रोक्त सल्ले शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे देण्यात येतात. सध्या प्रकल्पाचे काम संथगतीने होत असून, नेमणूक स्तरावरच रखडलेले आहे. अर्धा जुलै झाला तरी प्रत्यक्षातील काम बंद असल्याने जिल्हा यंत्रणांकडे वस्तुनिष्ठ माहिती येण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकल्पात काम करणाऱ्या ‘स्काउट’ची नेमणूक प्रक्रियाच राबवली गेलेली नाही. याबाबत तातडीने हालचाली अपेक्षित आहेत.

Web Title: agro news Infusion of green camel larva on soybeans