निसर्गानं अन् सरकारनं केली चौफेर घेराबंदी

विनोद इंगोले
रविवार, 10 सप्टेंबर 2017

कपाशीची वाढ खुंटली. सोयाबीनवर कीड-रोग अन् संत्र्याची फळगळ अशी संकटं. या पिकांवरच आमचा हंगाम रायते. ही तीनही पीकं हातची गेल्यावर आता उरलच काय? मग देनेदाराच देण, कुटुंबाच्या गरजा भागवाव्या तरी कशा? त्यातच कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या त्रासाचा फेरा आजही कायम आहे. सरकारनं अन् निसर्गानं अशी चौफेर घेराबंदी केली, तर मग कोणाकडे न्याय मागावा, असा प्रश्‍न चांदूर बाजार तालुक्‍यातील वणी बेलखेडा येथील संदीप माकोडे यांनी उपस्थित केला. 

कपाशीची वाढ खुंटली. सोयाबीनवर कीड-रोग अन् संत्र्याची फळगळ अशी संकटं. या पिकांवरच आमचा हंगाम रायते. ही तीनही पीकं हातची गेल्यावर आता उरलच काय? मग देनेदाराच देण, कुटुंबाच्या गरजा भागवाव्या तरी कशा? त्यातच कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या त्रासाचा फेरा आजही कायम आहे. सरकारनं अन् निसर्गानं अशी चौफेर घेराबंदी केली, तर मग कोणाकडे न्याय मागावा, असा प्रश्‍न चांदूर बाजार तालुक्‍यातील वणी बेलखेडा येथील संदीप माकोडे यांनी उपस्थित केला. 

मार्च महिन्यात उन्हाच्या झळा अधिक बसल्या. त्यामुळे संत्रा बागेतील आंबीया बहाराच्या बारीक फळांची ७० टक्‍के गळ झाली. त्यानंतर पावसाने खंड दिला आणि पुन्हा ऊन तापू लागले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात दहा टक्‍के मोठ्या फळांची गळ झाली. आता बाजारात केवळ १५ ते २० टक्‍के संत्राच पोचणार आहे. परिणामी संत्रा या वर्षी सामान्य ग्राहकांच्या आवाक्‍याबाहेर राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. काही मॉलमध्ये १३६ रुपये किलो दराने काही संत्रा विकल्या गेला. केरळमधून या भागातील संत्र्याला मागणी वाढती राहते. त्या भागातून रोखीने मोठे सौदे होतात, असा अनुभव आहे. त्याच कारणामुळे या भागातील व्यापाऱ्यांनी सध्या ज्या भागात काही प्रमाणात फळधारणा आहे, त्या शेतकऱ्यांशी सौदे निश्‍चीत करून त्यांना इसार (टोकन) रक्‍कमदेखील दिली आहे. ४० ते ४५ हजार रुपये टन असा उच्चांकी दर संत्र्याला दिला जात आहे, असे एका शेतकऱ्याने सांगितले. 

बागेतील फळांच्या उत्पादकतेचा काहीच अंदाज येत नसताना व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांची इसार रक्‍कम देत या वेळी जुगारच खेळला, असे म्हणावे लागेल, असे चांदूर बाजार तालुक्‍यातील व्यापारी शेख जावेद यांनी सांगितले. पूर्वी काही हजार रुपये इसार म्हणून दिले जात होते; आता लाखो रुपये इसार म्हणून दिले जातात. त्यामुळे फायदा-नुकसान याचा विचार न करता किंवा बाजारातील दरात होणारे चढउतार न पाहता बागेतील फळांची तोड करावीच लागते. पूर्वी सौदा पटत नसल्यास व्यापारी काही हजार रुपयांवर पाणी सोडत होते; आता मात्र तशी परिस्थिती राहिली नाही, असेही शेख जावेद यांनी सांगितले. 

फळांच्या आकारमानावरही परिणाम

भूगर्भातील पाणीसाठा खालावला, सिंचन प्रकल्प, शेतातील संरक्षित पर्यायही कोरडे पडले, त्याचा परिणाम संत्र्याच्या आकारावर होण्याची भीती महाराष्ट्र राज्य संत्रा उत्पादक संघाचे रमेश जिचकार यांनी वर्तविली. २८ मे रोजी या भागात अवकाळी पाऊस झाला. त्या वेळी फळांचा आकार काहीसा वाढीस लागला. त्या वेळी काही भागात पाऊस न झाल्याने उर्वरित संत्रा बागायतदाराच्या बागेतील फळांचा आकार मात्र वाढलाच नाही. परिणामी संत्रा बागायतदार या वेळी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. 

आमदार कडू यांनी केली पाहणी

आमदार बच्चू कडू यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चांदूर बाजार तालुक्‍यातील काही गावांचा दौरा करत संत्रा बागांची पाहणी केली. ‘‘या भागात संत्रा ५० टक्के गळला; पण अजून पंचनाम्याचे आदेश नाहीत.

याबाबत आम्ही आग्रह धरणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले नाहीत, तर आम्ही जिल्हा कचेरीत संत्रा नेऊन टाकू,’’ असा इशारा बच्चू कडू यांनी चार दिवसांपूर्वी दिला. दीड महिन्यापासून ही फळगळ होत असताना एकाही कृषिसेवकाने तालुका कृषी अधिकाऱ्यांना माहिती दिलेली नाही, त्यामुळे त्यांना शो कॉज देण्यात याव्या, तसेच आम्ही राष्ट्रीय संत्रा संशोधन केंद्राला मॅसेज केला असता त्यावर त्यांचे उत्तर आलेले नाही. एकही टीम या ठिकाणी आलेली नाही. ती जर लवकर आली नाही, तर आम्ही त्यांच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही आमदार कडू यांनी दिला होता. माधान, जसापूर, चांदूरबाजार, तळेगाव मोहना, चमक आदी गावात संत्रा फळगळ होत आहे. 

कृषी सहायकाला नोटीस

संत्राफळाच्या गळतीबाबत मार्गदर्शन व माहिती न पुरविणाऱ्या कृषी सहायकाला नोटीस बजावण्याचे आदेश तालुका कृषी अधिकाऱ्यांना आमदार कडू यांनी दिले.

या वर्षी दोन एकरावर सोयाबीन लावले. त्यावर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच पाण्याने खंड दिल्याने होत्याचे नव्हते झाले. अशा वेळी शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. पीक वाचविण्याचा प्रयत्न करत असतानाच दीड लाख रुपयाच्या कर्जमाफीसाठी नुसती पायपीट करावी लागत आहे. पीक वाचवावे की कर्जमाफीसाठी खेटे घालावे हेच कळत नाही.
- वसंतराव मारोतराव यावले, उदापूर, ता. वरुड
 

सोयाबीनला पावसाअभावी फूल आणि शेंगधारणाच झाली नाही. परिणामी हा पूर्ण हंगामच नासला आहे. कृषी विभाग, कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शनाचा पत्ता नाही. निदान अशा वेळी तरी शासनाने पीक परिस्थितीची दखल घेत उपाययोजनांविषयक मार्गदर्शनाकरिता व्यापक कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.''
- किशोर बाबुलाल यावले, इसापूर, ता. वरुड

तालुकानिहाय कापूस, सोयाबीन लागवड (हेक्‍टर)

                    कापूस                 सोयाबीन
तालुका    सरासरी क्षेत्र    लागवड     सरासरी क्षेत्र    लागवड

धारणी    ४०६६    ८५९०    ३००५८      १४२५२
चिखलदरा    १६८४    ११६०    १२९४३    १२३४७
अमरावती    ६४५६    ९२१०    ३५२८१    ३७५७८
भातकुली    ५५२३    ८४९०    २८१०७    २९७५९
नांदगाव खंडेश्‍वर    १३९४६    ५०१६    ३९२७७    ४८९३४
अंजनगाव    १३७७२    १४८०२    १७०७४    १३४००
अचलपूर    १६४१९    १७९०५    १५०४५    १३८३५
चांदूर बाजार    १८४१५    १८२२३    २५४६७    १८८५४
धामनगावरेल्वे    २०३६१    २७७८८    २७४६३    १८४२२
चांदूर रेल्वे    १२९५०    ६७६२    २१५११    २४६९९
तिवसा    १४४४५    १५०००    २३३९०    २१२१७
मोर्शी    २२०३३    २१४८८    ११५३७    २८७२
वरुड    २२६३०    ३०२१६     ११५३७    २८७२
दर्यापूर    २०५६०    २२८०७     ८५३९    ११३१३

१ जून ते ७ सप्टेंबरपर्यंत 
झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
तालुका    सरासरी    झालेला पाऊस

अमरावती    ६४२.६    ३६३.३
भातकुली    ६१८.६    ३६१.९
नांदगाव खंडेश्‍वर    ६१८.६    ४०३.१
चांदूर रेल्वे    ६३६.८    ४७८.१
धामनगावरेल्वे    ६०३.८    ३९३.४
तिवसा    ६०३.८    ४५९.७
मोर्शी    ६६३.९    ४४४.९
वरुड    ७३४.७    ५७४.१
अचलपूर    ५९०.४    ३२५.०
चांदूर बाजार    ५७७.८    ३९८
दर्यापूर    ५३०.६    ३३९.८
अंजनगाव    ५२०.८    २६२.९
धारणी    १००४.५    ५८९.७
चिखलदरा    १२८७.६    ७८६.८

Web Title: agro news kharip loss by rain