माॅन्सून दोन दिवसांत दिल्लीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

पुणे - माॅन्सून वेगाने उत्तर भारताकडे सरकत आहे. राजस्थानच्या दक्षिण भागात सोमवारी (ता. २७) दाखल झालेला माॅन्सून येत्या दोन दिवसांत दिल्ली, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीरच्या भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

पुणे - माॅन्सून वेगाने उत्तर भारताकडे सरकत आहे. राजस्थानच्या दक्षिण भागात सोमवारी (ता. २७) दाखल झालेला माॅन्सून येत्या दोन दिवसांत दिल्ली, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीरच्या भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

सध्या अनुकूल स्थितीमुळे मॅान्सूनने राजस्थानच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे. मंगळवारी (ता. २७) माॅन्सून उत्तरेकडील बारमेर, चित्तोरगड, गुना, सटना, सिद्दी, पटनापर्यंत दाखल झाला. त्यामुळे आज (ता २९) आणि उद्या (ता ३०) कोकण, गोवा, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाना, 
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, सौराष्ट्र, कच्छ, विदर्भ, लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

ईशान्य भारतातील ओडिशा आणि झारखंड परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीवर आहे. तर राजस्थानच्या पश्चिम भाग ते बंगाल उपसागराचा पूर्व भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. क्षेत्र बंगालकडून राजस्थानच्या दिशेने सरकत असून, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड हा भाग या क्षेत्राने व्यापणार आहे. सुमद्रसपाटीपासून हे क्षेत्र दीड किलोमीटर उंचीवर आहे. गुजरात ते केरळदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर सौराष्ट्र व कच्छ आणि अरबी समुद्र या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. 

गेल्या ४८ तासांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, अंदमान व  निकोबारच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला. तर झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात विदर्भ, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय त्रिपुरा, तेलंगाणा, आंध्र प्रदेश येथे मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

Web Title: agro news monsoon delhi in two days