विदर्भाच्या काही भागांत माॅन्सूनची प्रगती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

पुणे - विदर्भाच्या बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूरपर्यंत दाखल झालेल्या माॅन्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. बुधवारी (ता.२१) विदर्भातील गडचिरोलीच्या काही भागात, तर पूर्व भागातील छत्तीसगड, झारखंड, बिहार, उडिसामध्ये माॅन्सून पुढे सरकला आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भाच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

पुणे - विदर्भाच्या बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूरपर्यंत दाखल झालेल्या माॅन्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. बुधवारी (ता.२१) विदर्भातील गडचिरोलीच्या काही भागात, तर पूर्व भागातील छत्तीसगड, झारखंड, बिहार, उडिसामध्ये माॅन्सून पुढे सरकला आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भाच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

सध्या कोकणात अनुकूल स्थिती तयार होत असल्याने माॅन्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत माॅन्सून राज्यभर व्यापण्याचा अंदाज आहे. गेल्या आठवड्यात माॅन्सूनने गुजरातमधील वलसाड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, विदर्भातील बुलडाणा, यवतमाळपर्यंत दाखल झाला होता. मात्र, पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती नसल्याने त्याची वाटचाल धिम्यागतीने होती. तसेच छत्तीसगड, विदर्भ आणि उडिसा, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागातही अनुकूल स्थिती तयार होत आहे. त्यामुळे माॅन्सून छत्तीसगडमधील रायपूर, झारखंडमधील दाल्तोनगंज आणि बिहारमधील सुपाऊल पुढे सरकला.

उत्तर भारतातील राजस्थानच्या वायव्य भाग ते बंगाल उपसागर वायव्य भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे  क्षेत्र वायव्येकडून अंदमानाच्या वायव्ये भागाकडे सरकत आहे. हे क्षेत्र हरियाना, उत्तर भाग, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचा भाग व्यापण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर आहे. तसेच हिमालय, पश्चिम बंगाल ते बंगालचा उपसागर या दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती बिहार आणि उडिसाच्या भागाकडे सरकत असून ती समुद्रसपाटीपासन 2.1 आणि 3.1 किलोमीटर उंचीवर आहे.

राजस्थानच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. तसेच बांग्लादेशाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे माॅन्सून हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे. महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते केरळच्या या दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती केरळकडून कर्नाटकाकडे सरकत आहे. त्यामुळे देशातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण असून तापमानात घट झाली आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. 

राज्यात काही ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता 
विदर्भात दाखल झालेला मॉन्सून गडचिरोलीच्या उत्तर भागापर्यत दाखल झाला. त्यामुळे गडचिरोलीमध्ये बुधवारी (ता. २१) जोरदार पाऊस झाला.  येत्या रविवार (ता. २५) पर्यत कोकणातील बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आज (गुरुवारी) कोकणातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. 
सध्या विदर्भात दाखल झालेला मॉन्सून हळूहळू पुढे सरकत आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम  स्वरूपाचा पाऊस पडत आहे. परंतु, कोकणात मॉन्सूनला पुढे सरकण्यासाठी आवश्‍यक असलेली अनुकूल स्थिती तयार होत असल्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 

राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात किंचित घट झाली आहे. आज कोकणातील दक्षिण भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. मंगळवारी (ता. २०) सायंकाळी कोकण, गोव्यात मुसळधार  पाऊस पडला. कोकणातील बहुतांशी ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

Web Title: agro news monsoon in vidarbha