रब्बी मक्याची हमीभावाने खरेदी करा

वृत्तसंस्था
Monday, 9 April 2018

शेतकऱ्याने हमीभावाच्या खाली मका विक्री करू नये. सरकार मक्याचा प्रत्येक दाणा खरेदी करेल. मार्कफेडने राज्यभरात खरेदी केंद्रे उघडली. सरकार मक्याला १४२५ रुपये हमीभाव देत आहे. 
- के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगणा

हैदराबाद - खरिपाप्रमाणे राज्यात उत्पादित होणाऱ्या रब्बी मका पिकाचीही हमीभावने खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. बजारात मक्याचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने खरेदी करण्याचे निर्देश तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले. तेलंगणा राज्य पणन मंडळाने (मार्कफेड) खरेदीत उतरावे, असेही ते म्हणाले. 

राज्यात रब्बी हंगामात मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या मका काढणीचा हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांनी बाजारात माल विक्रिसाठी आणण्यास सुरवात केली आहे. बाजारात मक्याची आवक वाढल्याबरोबरच व्यापाऱ्यांनी दर पाडले. सध्या मक्याचे दर हमीभावाच्या खूपच कमी आहेत.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नसल्यामुळे पीक तोट्याचे बनले आहे. व्यापारी आणि मध्यस्थ शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने मका खरेदी करून आपला खिसा भरत आहेत. मात्र शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे मार्कफेडचे अध्यक्ष लोका बापूरेड्डी आणि व्यवस्थापकीय संचालक जगन मोहन यांनी मुख्यमंत्री राव यांची भेट घेऊन सरकारने मका हमीभावाने खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. तसेच मका खरेदीसाठी सरकारने निधीची तरतूद करावी, अशीही मागणी केली. 

मार्कफेडच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री राव यांनी मका खरेदीला मान्यता दिली. मार्कफेडने राज्यात सरकारसाठी कमा खरेदी करावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच राज्याच्या वित्त विभागाला मार्कफेडमार्फत खेरदी होणाऱ्या मक्याची देणी देण्याची शाश्वती घेण्याचे निर्देश दिले. सोबत पणनमंत्री टी हरीश राव यांना राज्यभरात हमीभावाने मका खरेदी करण्यासाठी खेरदी केंद्रे सुरू करण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री राव म्हणाले, की राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याने हमीभावाच्या खाली मका विक्री करू नये. सरकार मक्याचा प्रत्येक दाणा खरेदी करेल. मध्यस्थ किंवा व्यापाऱ्यांना कमी दराने न देता सरकारी खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्री करावी. सरकार मक्याला १४२५ रुपये हमीभाव देत आहे.

मार्कफेडने राज्यभरात खरेदी केंद्रे उघडले. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने मका विक्री करून स्वत:चा तोटा करून घेऊ नये. मार्कफेडने विपणन अधिकारी शेतकऱ्यांचा पूर्ण मका खरेदी करण्याचे नियोजन करतील. शेतकऱ्यांना मका विक्रीत कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर माल विकावा.

शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही
बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला मका बाजारात कमी भावात विकला. हा तोटा भरून न निघण्यासारखा आहे. सरकारने हमीभावने मका खरेदी करावी ही मागणी शेतकऱ्यांनी करायला पाहिजे होती. सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खरेदी सुरू केली असती. परंतु आता सरकार शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही नुकसान होऊ देणार नाही,’’ असे आश्वासन मुख्यमंत्री राव यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news rabbi Maize minimum price purchasing