मिडो ऑर्चर्ड पेरू बागेचे नियोजन

डॉ. भगवान कापसे 
शुक्रवार, 7 जुलै 2017

लागवड तंत्र 
मिडो ऑर्चर्ड पद्धतीने लागवड करण्यासाठी शिफारशीत अंतरावर चर काढून त्यामध्ये शेणखत, सिंगल सुपर फास्फेट तसेच जमिनीच्या वरच्या थरातील मातीच्या मिश्रणाने चर भरून त्यास शीग येऊ द्यावी. 
चांगला पाऊस पडल्यानंतर खत, माती भरलेल्या चरामध्ये १x२ मीटर किंवा १.५x२.५ मीटरवर कलमांची लागवड करावी. 
झाडाला सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करता यावा म्हणून उत्तर- दक्षिण कमी अंतर आणि पूर्व- पश्चिम जास्त अंतर ठेवावे.

पेरू लागवड करताना १x२ मीटर किंवा १.५x२.५ मीटर अंतर ठेवावे. झाडाला सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करता यावा म्हणून उत्तर- दक्षिण कमी अंतर आणि पूर्व- पश्चिम जास्त अंतर ठेवावे.

पेरूची लागवड साधारणपणे  ६x६ मीटरवर लागवड केली जाते. अलीकडे घन ते अतिघन पद्धतीने पेरू लागवडीचे प्रयोग यशस्वी झाले. कृषी महाविद्यालय, आनंद (गुजरात) येथे घेण्यात आलेल्या प्रयोगामध्ये  ६x२ मीटरची शिफारस करण्यात आली. लखनौ येथील राष्ट्रीय फळ संशोधन संस्थेमध्ये झालेल्या प्रयोगावरुन मिडो ऑर्चर्ड पद्धतीने १x२ मीटर ते १.५ x २.५ मीटरवर लागवडीची शिफारस करण्यात आली. त्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा १० ते २० पट झाडांची संख्या वाढविता येते. त्यापासून दुसऱ्याच वर्षी आर्थिकदृष्ट्या परवडणारे उत्पादन घेणे शक्य होते. उच्च प्रतीच्या फळांचे उत्पादन मिळते. 

जमीन 
लागवडीसाठी अति चोपण ते अति चुनखडीयुक्त तसेच निचरा न होणारी जमीन टाळावी. अति हलकी जमीन असल्यास त्यामध्ये काळी माती किंवा गाळाची माती काही प्रमाणात मिसळावी. अति भारी जमिनीत मात्र योग्य प्रमाणात चुनखडी नसलेला चांगल्या प्रतीचा मुरूम मिसळावा.

जाती 
अलाहाबाद सफेदा, सरदार, ललित, जी विलास या जाती निवडाव्यात. ललित ही जात लाल गराची आहे. 

पाणी नियोजन 
पावसाळा संपल्यानंतर कलमांना लगेच पाणी न देता थोडा ताण  पडू द्यावा.
प्रथम दोन वर्षांपर्यंत दररोज थोडे थोडे पाणी देण्यापेक्षा पाच ते सात दिवसांनी एकदाच जास्त पाणी द्यावे. त्यामुळे मुळे खोल जाऊन काटक बनतात.

आच्छादन 
बागेत दरवर्षी झाडाखालील संपूर्ण सावलीत उसाचे पाचट, वाळलेले गवत, सालीचे तण इत्यादी सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.

डॉ. भगवान कापसे ९४२२२९३४१९ (लेखक फळबाग तज्ज्ञ आहेत)

Web Title: agrown news guava Planting