कमी खर्चातील पिकांतून मिळतेय शाश्‍वत उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

कोकणातील लाखी बाग पॅटर्नप्रमाणेच एकरी लाख रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचा पीक पॅटर्न नांदेड जिल्ह्यामध्ये विकसित झाला आहे. किनवट तालुक्यातील आप्पाराव पेठ, गोंडजेवली तांडा, आमलापूर व मलकजाम या तेलंगण राज्याच्या सीमेनजीकच्या आदिवासीबहुल गावामध्ये वर्षात कमी खर्चातील तीन पिके घेत एकरी एक लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवले जाते.  

कोकणातील लाखी बाग पॅटर्नप्रमाणेच एकरी लाख रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचा पीक पॅटर्न नांदेड जिल्ह्यामध्ये विकसित झाला आहे. किनवट तालुक्यातील आप्पाराव पेठ, गोंडजेवली तांडा, आमलापूर व मलकजाम या तेलंगण राज्याच्या सीमेनजीकच्या आदिवासीबहुल गावामध्ये वर्षात कमी खर्चातील तीन पिके घेत एकरी एक लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवले जाते.  

नांदेड जिल्ह्यापासून १५० कि.मी. अंतरावर असलेल्या आप्पाराव पेठ, गोंडजेवली तांडा, आमलापूर व मलकजाम (ता. किनवट) या गावामध्ये कमी उत्पादन खर्च असलेल्या पिकांची लागवड होत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये खरिपात सोयाबीन, रब्बीमध्ये धने आणि उन्हाळ्यात तीळ किंवा मूग किंवा मका या पिकांची लागवड केली जाते. त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने हा पॅटर्न परिसरात चांगला रुजला आहे. 

सुवर्णा प्रकल्पामुळे आली संपन्नता 

तेलंगण व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर सुवर्णा मध्यम प्रकल्प असून, त्याचे बॅकवॉटर किनवट तालुक्यात पसरले आहे. या प्रकल्पाच्या कालव्यांचा लाभ तेलंगणमधील गावांना होत असला, तरी बॅकवॉटरमुळे किनवट तालुक्यातील ८-१० गावांना फायदा होतो. अगदी उन्हाळ्यातही भात, मका, मूग, तीळ, भाजीपाल्याची लागवड सर्वत्र दिसून येते. 

पूर्वी या परिसरात कापूस लागवड होत होती; मात्र वाढलेल्या लागवड खर्चामुळे या पिकाखालील क्षेत्र घटले आहे. 

जवळपास ऊस कारखाना नसल्याने तोड योग्य वेळा मिळत नाही. परिणामी ऊस लागवडही रुजली नाही. केळी दरातील चढउतारामुळे केळी लागवडही फारशी दिसत नाही. 

विशिष्ट भूगर्भीय रचनेमुळे या परिसरामध्ये अगदी ४० ते ८० फुटांवरही भूजल उपलब्ध होते. त्याखाली २५० फुटांपर्यंत बोअर घेतले असता पाणी आढळत नाही. उन्हाळ्यामध्ये असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळ्यातील मका, तीळ किंवा मूग यांचे क्षेत्र शेतकरी ठरवतात. 

असा आहे पॅटर्न 

साडेतीन महिन्यांचे सोयाबीन, त्यानंतर दोन महिन्यांचे धणे व त्यानंतर तीन महिन्यांचा तीळ अशी ८ ते ९ महिन्यांत तीन पिके घेतली जातात. 

या वर्षी आप्पाराव पेठ ४०० एकर, आमलापूर ३०० एकर, मलकजाम ६० एकर, गोंडजेवली तांडा १०० एकर असा ८६० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी तीळ उभा आहे. 

पावसाच्या आगमनानुसार जुन-जुलैमध्ये सोयाबीनची पेरणी केली जाते. सोयाबीननंतर धणे पीक घ्यायचे असल्याने आंतरपीक घेतले जात नाही. एकरी ८ ते ९ क्विंटल उत्पादन मिळून, सुमारे २५ ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळते. सोयाबीन काढणी मजुराकरवी किंवा तेलंगण येथून येणाऱ्या हार्वेस्टरद्वारे केली जाते. 

सोयाबीन काढणीनंतर जमिनीच्या प्रकारानुसार एक किंवा दोन रोटाव्हेटर व त्यानंतर ५-६ दिवसांनी १ किंवा २ मोगडा मारला जातो. यानंतर जमिनीला पाणी देण्यासाठी १ ते २ मीटरवर पाण्याचे पाट पाडून वाफे तयार केले जातात. त्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एकरी ३ किलो धणे विखरून, हलका वखर मारला जातो. शिफारशीप्रमाणे खते देऊन सिंचन केले जाते. ४ ते ५ पाणीपाळ्या दिल्या जातात. धण्याची काढणी डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होते. धणे पक्व होण्यासाठी ६५ ते ७० दिवस लागतात. धणे काढल्यानंतर त्याचा ढीग रचून ताडपत्रीने रात्रभर झाकल्यामुळे धण्यास लाल रंग येतो. काड उन्हात पसरून ५-६ दिवस ऊन दिले जाते. मजुरांच्या सहाय्याने मळणी केली जाते. अलीकडे हार्वेस्टरने काढणी व मळणी होऊ लागली आहे. त्यासाठी एकरी हजार रुपये खर्च होतो. धण्याचे एकरी ५ ते ६ क्विटल उत्पादन येते. धण्यासाठी धर्माबाद ही बाजारपेठ ९० कि.मी. अंतरावर आहे. सरासरी ६००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळतो. खर्च वजा जाता एकरी सुमारे ३० ते ३६ हजार रुपये मिळतात.

धणे काढणीनंतर मशागत करून, वखराच्या शेवटच्या पाळीवेळी रासायनिक खते जमिनीत मिसळले जातात. त्यानंतर वाफे तयार करून, तिळाची पेरणी हाताने शिंपडून जानेवारी- फेब्रुवारी महिन्यामध्ये केली जाते. एकरी ३ किलो बियाणे लागते. धणे व तिळाचे घरचेच बियाणे राखून ठेवलेले असते. लागवडीनंतर काढणीपर्यंत ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या दिल्या जातात. तिळाचे एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन येते. येथून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील निर्मल येथील व्यापारी गावात येऊन तिळाची खरेदी करतात. सरासरी ७००० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे दर मिळतो. एकरातून २८ ते ३५ हजार रुपये उत्पन्न मिळते. पूर्वी हाच दर प्रतिक्विंटल १३ हजार रुपये इतका असल्याचे शेतकरी सांगतात. 

एकाच शेतात सलग दोन वर्षे धणे व तीळ पीक घेतल्यानंतर शेत बदलले जाते. त्याच जागी पिकांची लागवड केल्यास उत्पादनामध्ये घट होते. 

उन्हाळी मका वाढतोय...

या भागात उन्हाळी मक्याचे क्षेत्रही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या या भागात १५० एकरवर उन्हाळी मका उभा आहे. सुमारे १०० एकर क्षेत्रावर उन्हाळी भात हे पीकही उभे आहे. 

सोयाबीन काढणीनंतर मशागत करून दीड फुटाच्या सऱ्या पाडल्या जातात. सरीमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संकरित मका टोकण केली जाते. एकरी ८ किलो बियाणे लागते.  मक्याला ७ ते ८ पाण्याच्या पाळ्या दिल्या जातात. एकरी ३५ ते ४० क्विंटल मका उत्पादन मिळते. निर्मल जिल्ह्यातील व्यापारी येथून मका खरेदी करतात. सध्या मक्याचा दर प्रतिक्विंटल १४०० रुपये असा आहे. 

आम्ही कमी खर्चाच्या हंगामी पिकांचे नियोजन करत आहाेत. पाण्याच्या उपलब्धतेमुळे त्यातून वर्षाकाठी एकरी लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. या वर्षी माझ्याकडे ३ एकर उन्हाळी मूग व ३ एकर उन्हाळी तीळ आहे. दरवर्षी मला मुगाचे एकरी ५ क्विंटल, धण्याचे एकरी ७ क्विंटल व तिळाचे एकरी ४ क्विंटल उत्पादन मिळते. या वर्षी मी साडेतीन एकरावर उन्हाळी मकाही घेतली आहे.   - भोजारेड्डी नुतूल, आप्पाराव पेठ, ९४२१७६९४९०

माझी एकूण साडेतीन एकर शेती आहे. गेल्या ९ वर्षांपासून सोयाबीन, धणे व नंतर तीळ अशी पिके घेत आहे. यामध्ये धोका कमी असून, उत्पन्नही चांगले येते. या वर्षी ५० गुंठ्यांवर सोयाबीन, धणे व तिळाचे पीक तीन हंगामात घेतले आहे. - श्रीधर रेड्डी लोकावार, आप्पाराव पेठ, ९७६७०७६९५९

माझ्याकडे ८ एकर शेती असून, ४ एकर क्षेत्रामध्ये खरीप हंगामात सोयाबीन घेतले. उन्हाळ्यात बोअरचे पाणी कमी होत असल्यामुळे मी रब्बीमध्ये २ एकर धणे व उन्हाळ्यामध्ये २ एकर तीळ उत्पादन घेतले. दोन एकरामधून १५ क्विंटल धने उत्पादन मिळाले असून, तिळाचे १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. - मारोती विठ्ठलराव जाधव, आमलापूर, ९४०५६९०४८२

Web Title: agrowon farmer Sustainable income