दुधाची थेट विक्री अन्‌ प्रक्रियेतून ‘समृद्धी’

सूर्यकांत नेटके
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

विविध नोकरीचे अनुभव विपुल कुलकर्णी (जामखेड, जि. नगर) यांनी घेतले. पण जीवनात स्थैर्य येईना. अखेर पूर्ण क्षमतेने दुग्ध व्यवसाय सुरू केला. भाडेतत्त्वावर जागा घेतली. सध्या ६३ गाईंचे संगोपन करताना पाचशे लिटर दुधाची थेट विक्री ते करतात. एवढ्यावर न थांबता प्रक्रिया पदार्थही तयार करतात. आज त्यांचा ‘समृद्धी’ ब्रॅंड पंचक्रोशीत नावारूपाला आला आहे. जीवनात समाधानही मिळाले आहे.

नगर जिल्ह्यात जामखेड या तालुका ठिकाणापासून सुमारे पंधरा किलोमीटरवर कुसडगाव हे विपुल कुलकर्णी यांचे गाव. वडील रोजगारासाठी जामखेडला आले अन्‌ कुटूंब तेथेच स्थायीक झालं. विपुल व वैभव हे दोघे भाऊ. वैभव खाजगी संस्थेत काम करतात. विपुल यांनी बीए पर्यंत शिक्षण घेतले. वडील एका कुरियर संस्थेत नोकरी करीत. विपुल यांनीही त्यांच्यासोबत दहा वर्षे हा अनुभव घेतला. त्यात प्रगतीची चिन्हे दिसेनात. मग एका "डेअरी फार्म'' वर व्यवस्थापक म्हणून तीन वर्षे काम केले. पण पगार काही अपेक्षेप्रमाणे मिळेना. 

स्वतःच्या उद्योगासाठी दिशा  
आपण इतरांकडे इतक्या चांगल्या प्रकारे काम करतो मग स्वतःचाच उद्योग सुरू केला तर? आणखी खूप पुढे जाऊ असा विचार विपुल यांच्या डोक्यात आला. डेअरी व्यवसायातील अनुभव हाताशी होताच. तीन वर्षांपूर्वी १३ संकरीत गाईंची (एचएफ) खरेदी केली. उत्तम व्यवस्थापनातून दर दिवसाला चांगले दूध संकलन होऊ लागले. सहा महिन्यांनतंर पुन्हा ११ गाई आणल्या. स्थानिक बाजारातून  गाईंची खरेदी केली. आत्मविश्वासपूर्वक व्यवसायाचे विस्तारीकरण  केले. 

विपुल यांचा आजचा दुग्धव्यवसाय 
सध्या गाईंची संख्या- ६३ (सर्व एचएफ-संकरीत)
दररोजचे दूध संकलन- ४७५ ते ५०० लिटर (वर्षभराची सरासरी) 
नातेवाइकांकडून म्हशीचे सुमारे २५० ते ३०० लिटर दूध घेतात. 
सर्व दुधाची थेट विक्री - त्यासाठी जामखेड येथे विक्री केंद्र
सुमारे ५० लिटर गाईच्या तर १० लिटर म्हशीच्या दुधावर प्रक्रिया.
खवा, लस्सी, ताक, दही व मागणीनुसार श्रीखंड आदी पदार्थांची निर्मिती
सकाळी सहाला सुरू झालेले विक्री केंद्र रात्रीपर्यंत सुरू असते. उत्पादनांचा दर्जा टिकवल्याने ग्राहकांकडून पदार्थांना चांगली मागणी.  

थेट विक्री व उत्पादनांतून नफा 
व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरवातीला वर्षभर संस्थेला दूध दिले. मात्र नफ्याचे प्रमाण वाढवायचे तर थेट विक्रीला पर्याय नाही हे अोळखले. त्यातूनच जामखेडमध्ये थेट विक्री सुरू केली. यात स्थिरता आल्यानंतर अजून नफा वाढवण्यासाठी प्रक्रिया पदार्थ तयार करण्यास सुरवात केली. उत्पादनांत चांगला दर्जा ठेवल्याने ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेला. 

गोठा व्यवस्थापनातील बाबी  
कुलकर्णी यांनी व्यवसायासाठी जामखेडमध्ये साडेसात एकर शेती भाडेतत्त्वावर घेतली आहे. वर्षाला एकरी बारा हजार रुपयाचे भाडे ते देतात. तेथे गाईंसाठी पाच लाख रुपये खर्च करून अर्ध्या एकरवर शेड उभारणी केली आहे. वासरांसाठी स्वतंत्र जागा आहे. गाईंना मुक्त संचार करता यावा म्हणून शेडजवळच जागा केली आहे. व्यवसाय सुरू करण्याआधी संगमनेर, राहुरी, राहाता येथे शंभरांपेक्षा अधिक गाई असलेल्या डेअरी फार्मची त्यांनी पाहणी करून त्यातील बारकावे घेतले. 

शेणखताला मागणी
गोठ्यातील शेण व मुत्राचे एका जागी संकलन केले जाते. भाडेतत्वावरील अडीच एकरात चाऱ्यासाठी ऊस लागवड केली आहे. शेण व गोमूत्र थेट उसाला देण्याची व्यवस्था केली आहे. वर्षभरात सुमारे १०० ट्रॉली शेणखत मिळते. अलीकडे शेणखताला मागणी वाढली आहे. त्यामुळे दोनहजार रुपये प्रति ट्रॉली दराने ते विकले जाते. त्यातून पहिल्या वर्षी सव्वा लाख तर दुसऱ्या वर्षी पावणेदोन लाख रुपये मिळाले. 

चारा उत्पादक करतात संपर्क
विपुल यांचा डेअरी फार्म सध्या जोरात आहे. त्यांना दर दिवसाला साधारण अडीच टन ऊस तर तीन टन मका गतो. हा सगळा चारा ते विकत घेतात. कुट्टी यंत्राचा वापर करून तो जनावरांना देतात. सुरवातीला चाऱ्याचा शोध घ्यावा लागायचा. आता चारा उत्पादकच थेट संपर्क करतात. शिवाय पाऊस व अन्य अडचणीच्या वेळी वापरात यावा म्हणून परिसरातून कडब्याची खरेदी केली जाते. 

दुष्काळात विकतचे पाणी
जामखेड तालुक्‍यात कायम दुष्काळी स्थिती असते. कुलकर्णी यांच्या डेअरी फार्मवर शेतमालकाने पाण्याची सोय केली आहे. मात्र मागील दोन-तीन वर्षात गंभीर दुष्काळ पडला. अशा परिस्थितीत दोन महिने दररोज दीड हजार रुपयांचे पाणी विकत घेऊन ते विपुल यांनी जनावरांना दिले. त्यातून उमेदीने सुरू केलेला दुग्ध व्यवसाय टिकवला. 

‘समृद्धी'' ने वाढवला लौकीक
आज खवा, पनीर निर्मितीची तसेच पॅकेजिंगचे यंत्र घेतले आहे. पदार्थ निर्मिंतीसाठी दोघा भावांसहीत घरच्या दोन्ही लक्ष्मींचाही मोठा सहभाग असतो. दूध व उत्पादनांचा "समृद्धी'' ब्रॅन्ड विकसित केला आहे. सध्या पंचक्रोशीत तो प्रसिद्ध झाला आहे. लग्न, सण तसेच कार्यक्रमांसाठी पदार्थांचे बुकिंग होते. येत्या काळात ग्राहकांच्या मागणीनुसार देशी गीर गाई खरेदी करून त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न आहे. 

साध्य केलेल्या बाबी 
व्यवसायासाठी विपुल यांनी बॅंकेकडून तेरा लाखांचे कर्ज घेतले. व्यवसायातील उत्पन्नातून ते केवळ अडीच वर्षात फेडले. पुन्हा १८ लाखांचे कर्ज घेतले आहे.
जिल्हा परिषदेतर्फे आदर्श गोपालक म्हणून गौरव अन्यत्र व्यवस्थापक म्हणून नोकरी करणाऱ्या विपुल यांच्या डेअरी फार्मवर सध्या पाच-सहा कामगार कामास आहेत.
व्यवसाय सुरू केल्यानंतर दोन वर्षांचा पशुवैद्यकीय डिप्लोमाही केला.

Web Title: agrowon milk