पीकपद्धती बदलली शेती नफ्याची झाली  

प्रदीप अजमेरा 
बुधवार, 12 जुलै 2017

पारंपरिकतेला चिकटून न बसता हुशारीने वेळीच पीकपद्धतीची आखणी केल्यास शेतीतील नुकसान कमी होते, नफा वाढू शकतो. वडीगोद्री (जि. जालना) येथील राजेंद्र अर्जुन खटके यांनी सुयोग्य विचारांतूनच न परवडणाऱ्या कापूस आणि ऊस पिकांपासून फारकत घेतली. गेल्या चार वर्षांपासून सोयाबीन- हरभरा हीच त्यांची हुकमी पीकपद्धती झाली आहे. मजुरी तसेच उत्पादन खर्च त्यातून कमी करण्यात त्यांना यश मिळाले आहे. 

औरंगाबाद - बीड महामार्गावर वडीगोद्री हे मोठे गाव आहे. गावापासूनच केवळ दोन किलोमीटरवर राजेंद्र खटके यांची अंतरवली सराटीच्या हद्दीत १८ एकर शेती आहे. राजेंद्र यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर वडिलांच्या हाताखाली शेतीला सुरवात केली. बंधू विष्णुदास यांच्यासह त्यांची १८ एकर शेती आहे. त्यात पूर्वी कापूस आणि ऊस ही पारंपरिक पिके होती. उसाला जास्त पाणी लागते आणि कापसाचा खर्च हा उत्पादनाच्या तुलनेत परवडत नाही. या समस्येला राजेंद्र वैतागले होते. 
मात्र यावर नामी उपाय काढला पाहिजे व पद्धतीत बदल केला पाहिजे ही जिद्द मनी बाळगली. त्यादृष्टीने पावले टाकताना १५ एकर कापसाचे क्षेत्र कमी करत ते यंदा केवळ तीन एकरांवर आणले.  ऊसही पूर्णतः बंद केला. 

सोयाबीन- हरभरा पीकपद्धती  
सोयाबीन - हरभरा पीकपध्दतीचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. दरवर्षी सुमारे सात एकर जे एस २२५ वाणाचे सोयाबीन असते. त्याची काढणी झाल्यानंतर जमिनीची मशागत व रब्बी हंगामात हरभऱ्याची शास्त्रीय पद्धतीने पेरणी केली जाते. हे शिवार कोरडवाहू आहे. मात्र योग्य व्यवस्थापनातून दोन्ही पिकांत एकरी चांगले उत्पादन मिळू लागले, खर्चही कमी होऊ लागला तशी याच पीकपध्दतीत सातत्य ठेवले. 

किफायतशीर उत्पादन 
मागील रब्बीत हरभऱ्याचे सहा एकरांत ६२ क्विंटल उत्पादन मिळाले. त्यास क्विंटलला ५९०० रुपये दर मिळाला. तर सोयाबीनचे सात एकरांत १०५ क्विंटल उत्पादन मिळाले. शिवारापासून २० किलोमीटर अंतरावर पात्रुड येथे आॅईल मिल व डाळमिल असल्याने व्यापाऱ्यांनी जागेवरच दर दिला. सोयाबीनला मागील वर्षाचा अपवाद वगळता क्विंटलला किमान ३००० रुपये दर मिळाला आहे. कपाशी व ऊसापेक्षा निश्चित ही पीक पद्धती फायदेशीर वाटल्याचे राजेंद्र म्हणाले. 

व्यवस्थापनातील बाबी 
जमीन मध्यम ते भारी काळी, कसदार स्वरूपाची आहे. पाऊस पडला तरी जास्त वेळ पाणी धरून ठेवत नाही. त्यामुळे पिकाची वाढ खूप चांगली होते. पेरणीपूर्वी बियाण्यास रासायनिक तसेच जैविक प्रक्रिया हमखास केली जाते. तसेच कंपोस्ट खतही पेरणीपूर्वी दिले जाते. 
पाण्यासाठी ५२ फूट खोलीची विहीर अाहे. त्यातून दुष्काळात आठ दिवसांतून एकदा उपसा व्हायचा.
मागील वर्षापासून विहिरीस १० ते १२ फूट खोल पाणी असते. चार बोअरपैकी एक फेल गेली. उर्वरित बोअरला मात्र दीड इंचापर्यंत पाणी असते. बोअरचे पाणी विहिरीत घेऊन तेथून सिंचन केले जाते. 
ठिबक पाच एकरांवर केले आहे. अर्थात हे तेही केवळ मोसंबी पिकासाठी. विहिरीच्या थोड्या पाण्यावर मोसंबी सर्व प्रकारचे प्रयत्न करून जगविली आहे. दोन शेततळी मंजूर झाली अाहेत. 

मोसंबीदेखील उत्पन्नाचा स्त्रोत 
मध्यम स्वरूपाच्या जमिनीत न्यूसेलर मोसंबीच्या ८५० कलमांची पाच एकरांत सात वर्षांंपूर्वी १६ बाय १६ फूट अंतरावर लागवड केली. त्यात पहिली तीन वर्षे सोयाबीन व हरभरा हीच पिके घेतली. त्यामुळे जमिनीत नत्राचे प्रमाण वाढून मोसंबीची वाढ अत्यंत चांगली झाली. आज मोसंबी झाडाचे वय व वाढ पाहून अनेकांनी प्रसंशा केली आहे. मोसंबी लावल्यानंतर दोन वर्षांने दुष्काळ पडला. विहिरीचे पाणी कमी पडले. आठ दिवसांतून एकदाच ठिबकने पाणी देता यायचे. आसपासच्या मोसंबी उत्पादकांनी बाग तोडून टाकायला सुरवात केली. मात्र सर्व उपायांचा अवलंब करून झाडे वाचविली. त्या वेळी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय आच्छादनाचा वापर केला. झाडाची वाळलेली पानेही आच्छादन म्हणून उपयोगात आणली. कृषी विभागाचे मार्गदर्शन कमी आले. आज मोसंबीला मोठ्या प्रमाणात फळे लगडली आहेत.

मागील वर्षी सुमारे २४० झांडापासून दोन ते तीन टन उत्पादन मिळाले. झाडे वाचली हाच आनंद सर्वात मोठा होता. व्यावसायिक उत्पादन येत्या काळापासून सुरू होईल. यंदा प्रति झाड सुमारे १०० किलो उत्पादन आंबे बहराचे निघेल अशी अपेक्षा आहे

कंपोस्ट खतांवर जोर
दरवर्षी सुमारे ४० ट्रॉली कंपोस्ट खत लागते. पैकी निम्मे मोसंबीसाठी तर उर्वरित अन्य पिकांना दिले जाते सुमारे १५ ट्रॉली खत घरचेच असते. सुमारे तीनहजार रुपये प्रति ट्रॉली दराने विकतही घेतले जाते. 

घरचेच सदस्य शेतात राबतात 
राजेंद्र, पत्नी सौ नंदा तसेच भाऊ, भावजय असे सर्वजण शेतात राबतात. त्यामुळे बाहेरील मजुरांची फारच कमी आवश्यकता भासते. त्यातून मजुरीवरील फार मोठा खर्च वाचला आहे. 
(लेखक अंबड, जि. जालना येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.) 
 : राजेंद्र खटके, ९७६३८३३३७२ 

यांत्रिकीकरणावर भर
राजेंद्र यांनी यांत्रिकीकरणाच वापर करताना वेळ, श्रम व मजुरी याच बचत केली आहे. कपाशीसाठी खास बैलचलित खत पेरणी यंत्र स्वकल्पनेतून बनवून घेतले आहे. त्यासाठी पाठीवरील पंपाच्या टाकीचा वापर खतासाठी केला आहे. चार बाय एक फुटावर त्यांची कपाशी असते. त्याला अनुकूल असा यांत्रिकी पद्धतीचा खत वापर होतो. 

चार नोझलचे फवारणी यंत्र 
बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तयार केलेले एक चाकी सायकल फवारणी यंत्र राजेंद्र वापरतात. या यंत्राला चार नोझल्स आहेत. कोणत्याही पिकात त्याचा वापर होतो. बूमची उंची जमिनीपासून सहा फूट आहे. ती गरजेनुसार कमीदेखील होते.   

शेतीची वैशिष्ट्ये 
शेतातील काडीकचरा न जळता त्याचे कंपोस्ट खत तयार केले जाते. गरजेनुसार ते विकतही आणले जाते. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी झाला आहे. 
बांधावर जांभूळ, आंबा, लिंबू, पेरू, जांभूळ, रामफळ, सीताफळ व नारळ यांची प्रत्येकी २ ते ३ झाडे आहेत. त्यापासून विक्रीयोग्य उत्पादन मिळत नसले तरी घरची गरज व पाहुणे, मित्रमंडळी यांना वानोळा देता येतो याचे समाधान आहे.

समविचाराचे व समवयस्क शेतकऱ्यांनी एकत्र येऊन राष्ट्रसंत शेतकरी कंपनीची स्थापना नुकतीच केली आहे. राजेंद्र त्याचे संचालक आहेत. कंपनीमार्फत यंदा कोरडवाहू शेतीसाठी शंभर एकरांवर सीताफळ लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. 
क्रॉपसॅप व हॉर्टसॅप या योजनांमुळे किडी-रोगांची ओळख व नियंत्रणाचे कमी खर्चाचे उपाय समजले. 

त्याचा उपयोग करून फवारणीवरील खर्चही बराच कमी केला. हे उपाय कंपनीतील अन्य शेतकऱ्यांनाही सांगितले. त्यांचेही संभाव्य नुकसानही वाचले. कृषी विभागाचे साईनाथ बागडे ,शांता श्रीगंदेवार, विनोद कड, कीड नियंत्रक वैभव घोडके यांची प्रत्येक पातळीवर मदत झाली आहे.  पीक प्रात्यक्षिकातून उत्पादन वाढीचे तंत्र समजले. प्रगतिशील शेतकरी सुरेश काळे व राजेंद्र पालकर तसेच मित्र राजेंद्र छल्लारे यांचीही खूप मदत शेतीच्या विकासात झाली.

Web Title: agrowon news agriculture