कमी खर्चात शेड, उत्कृष्ट रेशीम शेती

माणिक रासवे
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

बोरगव्हाण (ता. पाथरी, जि. परभणी) येथील उच्चशिक्षित अल्पभूधारक तरुण शेतकरी राधेश्‍याम खुडे यांनी पिकांपेक्षा रेशीम शेतीवरच भर देत त्यातून आर्थिक सक्षमता मिळवली आहे. कमी खर्चात शेडची उभारणी, उत्कृष्ट व्यवस्थापन व सोप्या तंत्राचा वापर करीत उन्हाळ्यातही उत्पादन यशस्वी केले आहे.

परभणी जिल्ह्यात पाथरी-सेलू राज्य रस्त्यावर बोरगव्हाण गाव आहे. झरी येथील लघुतलावामुळे गावशिवारातील विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी असते. गावातील शेतकरी केळी, ऊस, भाजीपाला पिकांसोबतच सोयाबीन, तूर, कापूस आदींचे उत्पादन घेतात.

खुडेंची शेती 
गावातील राधेश्याम महादेवराव खुडे यांची शेती आहे. पुणे येथील संस्थेतून इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर २००८ मध्ये खासगी कंपनीत त्यांनी नोकरी केली. परंतु नोकरीत ते फारसे रमले नाहीत. गावी नाॅयलाॅन दोर निर्मितीचा उद्योग सुरू करण्याच्या विचाराने ते परत आले. परंतु पुरेशा भांडवलाअभावी ते जमले नाही. त्यामुळे २०१० मध्ये शेती करण्याचा निश्चय केला. आठ भावांमध्ये राधेशाम सर्वांत धाकटे. सिंचनासाठी विहिर, बोअरची व्यवस्था आहे. केळी, ऊस, कापूस, सोयाबीन ही पिके घेतली जायची. राधेश्याम यांच्या वाट्याला तीन एकर जमीन आली. पारंपरिक पीक पद्धतीतून किफायशीर उत्पन्न मिळत नव्हते. गावातील प्रभाकर धोत्रे भाजीपाला शेतीसोबत रेशीम उद्योग करायचे. त्यांच्यापासून प्रेरणा घेत राधेश्याम यांनी रेशीम शेतीत उतरण्याचे ठरवले. एवढ्यावरच न थांबता जालना जिल्ह्यातील यशस्वी रेशीम उत्पादकांच्या शेतीला भेटी देत अनुभव जाणून घेतले.आज सुमारे तीन वर्षांच्या अनुभवातून राधेश्याम जाणकार रेशीम उत्पादक बनले आहेत. 

गावातील शेतकऱ्यांचे प्रेरक  
गावातील सुमारे २० ते २२ शेतकरी खुडे यांच्या प्रेरणेतून रेशीम शेतीकडे वळाले आहेत. खुडे पाथरी तसेच सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतात. त्यातूनच दोन्ही तालुक्यांत रेशीम शेती जोम धरू लागली आहे. जिल्हा रेशीम विकास अधिकारी ए. व्ही. वाकुरे, पी. एस. देशपांडे यांचे मार्गदर्शन खुडे यांना मिळते. 

शेडची वैशिष्ट्ये कमी खर्चात संगोपनगृह- 
उन्हाळ्यात देखील कोषउत्पादन घेता यावे दृष्टीने नागपूर येथून व्हाईट कोटेड पत्रे आणून शेडवर टाकले. चारही बाजूंनी शेडनेटचे कापड. जमिनीवर सिमेंट कॉंक्रीटची गच्ची. 

रॅक
कल्पकतेने बांबू, लाकूड यांच्या साहाय्याने जुन्या साड्यांचा वापर करून पाच फूट रुंद व ४५ फूट लांबीचे पाच मजली रॅक. त्यासाठी सुमारे सात हजार रुपये खर्च झाला. रॅक उभारणीसाठी लोखंडी अॅंगलचा वापर केला असता तर ४० ते ४५ हजार रुपये खर्च आला असता. 

भर उन्हाळ्यात यशस्वी उत्पादन 
उन्हाळ्यात रेशीम उत्पादकांना उच्च तापमानामुळे कोषउत्पादन बॅच घेणे शक्य होत नाही. मात्र खुडे यांनी ते तंत्राच्या आधारे यशस्वी केले. यात त्यांनी सुलभ तंत्र वापरले. एकहजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवून त्याला ठिबकचे ड्रीपर्स लावले. ते शेडनेटच्या कापडावर सोडले. 

थेंब थेंब पडत राहून शेडमध्ये अोलावा तयार झाला.  
ड्रीपर- ताशी दोन लिटर. 
यामुळे काय झाले? 
शेडबाहेरील तापमान- ४२ ते ४३ अंश से.
शेडच्या आतील तापमान- २८ अंशापर्यंत. 
यात मिळालेले उत्पादन- २५० अंडीपुंज- १९८ किलो कोष
रामनगरला या कोषांना किलोला ५१० रूपये दर मिळाला. उन्हाळ्यातील हे उत्पन्न तसे बोनसच म्हणायला हवे. 

यशस्वी उत्पादन
उत्कृष्ट व्यवस्थापनातून प्रति १०० अंडीपुंजांपासून ८० ते ९० किलो 
उत्पादन घेतात. 
सन २०१५-१६ दुष्काळामुळे पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे 
उत्पादन घटले. 
मागील वर्षी गावातील रेशीम उत्पादकांना तुती लागवडीसाठी बेणे विक्री केली. त्यामुळे रेशीम कीटक संगोपनासाठी पाला कमी पडला. एकूण ६१० क्विंटल कोष उत्पादन घेता आले.

व्यवस्थापनातील ठळक बाबी 
उत्तम प्रतीचा तुतीचा पाला दिला जातो.
संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण, आर्द्रता आणि तापमान या बाबी दर्जेदार रेशीम कोष उत्पादनासाठी  महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.
चाॅकी अवस्थेत  कीटकांची विशेष काळजी घेतली जाते. सप्टेंबर ते आॅक्टोबर या कालावधीत चांगले कोष उत्पादन मिळते. 
सिंचनासाठी पाणी असल्यामुळे वर्षाला किमान पाच बॅचेस उत्पादन घेणे शक्य होते. 
कोषकाढणी खुडे स्वतः करतातच. शिवाय पत्नी व दोन पुतणेही राबतात. मजुरांची मदतही घ्यावी लागते. कोष काढणीसाठी दोनहजार रूपये खर्च येतो.

हिवाळ्यातील नियोजन 
हिवाळ्यात हीटर लावून संगोपनगृहाचे तापमान रेशीम कीटकांच्या वाढीयोग्य ठेवले जाते. एरवी एका बॅचच्या उत्पादनासाठी सुमारे २७ दिवस लागतात. हिवाळ्यात मात्र ४० ते ४५ दिवसांपर्यंत उत्पादनासाठी थांबावे लागते. एका बॅच संपल्यानंतर संगोपनगृहाचे चांगले निर्जंतुकीकरण करावे लागते. त्यासाठी ८ ते १० दिवसांच्या खंडानंतर नवीन अंडीपुंज आणून पुढील बॅच सुरू करावी लागते.

बाजारपेठ 
कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध रामनगर बाजारपेठेत कोष विक्रीसाठी नेण्यात येतात. त्यासाठी बोरगव्हाण पासून ६० किलोमीटरवरील परळी वैजनाथ (जि. बीड) येथे जावे लागते. या स्टेशनवर नांदेड-बेंगळूर रेल्वे अर्धा तास थांबते. त्यामुळे रेशीम कोषांची पोती व्यवस्थित गाडीत चढविता येतात. बाजारपेठेत कोष नेण्यासाठी ३,५०० रुपये वाहतूक खर्च येतो.अलीकडील काळात मिळालेले दर- प्रतिकिलो ३०० ते ४०० रु. कमाल- ५०० रु. 

राधेश्‍याम खुडे, ८८८८९३१७९३

Web Title: agrowon news agriculture