फवारणी यंत्राच्या कल्पक निर्मितीतून वेळ, पैसे, श्रम यात केली बचत

फवारणी यंत्राच्या कल्पक निर्मितीतून वेळ, पैसे, श्रम यात केली बचत

सातारा हा आले, हळद यांच्याबरोबरच ऊस, भाजीपाला आदी पिकांसाठीही प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील काले (ता. कऱ्हाड) हे तसे बागायत गाव. त्यामुळेच गावात ऊस पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. गावातील विकास पांडूरंग पाटील हा तरुण शेतकरी. एम.ए बीएडपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. आई- वडिलांचा पेशा शिक्षकी असल्याने विकास यांनाही शिक्षकच होण्याची इच्छा होती. मात्र प्रयत्न करूनही नोकरी मिळत नव्हती. अखेर नोकरी शोधण्यात अधिक वेळ घालवण्यापेक्षा घरची शेतीच आपण चांगल्या प्रकारे सांभाळू असे त्यांना वाटू लागली. शेतीची आवडही होतीच. 

विकास सांभाळतात सारी शेती  
विकास आज घरची सहा एकर शेती सांभाळतात. शिवाय दोन एकर शेती त्यांनी कसायलादेखील घेतली आहे. शिक्षण सुरू असतानादेखील विकास वडिलांना मदत करायचेच. वडिलांच्या निधनानंतर घरची जबाबदारीदेखील विकास यांच्या खांद्यावर होती. ऊस हे पाटील यांचे मुख्य पीक.आजकाल सर्वच पिकांत तंत्रज्ञान उपलब्ध आहे, मात्र मजूरबळ उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे.शिवाय मजुरीखर्च वाढला असल्याने शेती उत्पादनातील बराच खर्च त्यावरच खर्च होतो. मात्र दुसरा पर्यायही नव्हता. 

गरज ठरली शोधाची जननी  
अलीकडील काळात उसात तणनाशकाचा वापर वाढला आहे. त्याचे कारणही भांगलणीला मजूरबळ नसणे हेच आहे. बरं, फवारणी स्वतः करावी म्हटले तर क्षेत्र जास्त असल्याने श्रम जास्त व्हायचे. खांदा न पाठ दुखी मागे लागायची. एके ठिकाणी विकास यांनी सायकलच्या कॅरियरवर पंप ठेऊन फवारणी सुरू असल्याचे पाहिले. या पद्धतीत काही त्रुटी जाणवल्या. त्यात दोन व्यक्तींची मदत लागायची. पण हा प्रयोग पाहाताना डोक्यात कुठेतरी ‘ट्यूब’ पेटली की अशा प्रकारचे सुधारित यंत्र आपण का बनवू नये?   

यंत्रनिर्मितीला मिळाली चालना  
विकास यांनी आपल्या कल्पनेवर खूप विचार केला. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेतल्या. त्यातून मग सायकल कोळप्यावर आधारित यंत्र बनवायचे ठरविले. डोक्‍यात आलेली कल्पना या क्षेत्रातील मित्र महेश सुतार यांना सांगितली. त्यांनी मित्राच्या कल्पनांनुसार यंत्राची निर्मिती करण्यास सुरवात केली. हे यंत्र बहुद्देशीय उपयोगाचे असावे, हलके आणि सहज वापरता यावे या गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष देण्यात        आले. 

यंत्राची रचना व कार्यपद्धती  
या पंपाचा एक भाग चाक आहे. जे मुलांच्या सायकलचे वापरले आहे.
 तसेच यंत्राची मुख्य रचना एक इंची लोंखडी बारच्या आधारे केली आहे. आवश्यक त्या ठिकाणी ‘नट बोल्ट’ आहेत. 
सायकल कोळप्याती ही जणू प्रतिकृती आहे. 
 त्यावर बॅटरी अाॅपरेटेड फवारणी पंप ठेवता येते. तो खाली पडू नये यासाठी दोऱ्यांच्या साह्याने घट्ट बांंधला आहे. 
 पंपाच्या पुढील बाजूस आडव्या लोखंडी बारची रचना बूमसारखी असून त्यावर फवारणीचे दोन नोजल्स लावले आहेत. 
 विशेष म्हणजे पुढील बार हा ‘ॲडजस्टेबल’ आहे. त्यामुळे तीन ते सहा फुटी सरीपर्यंत गरजेनुसार फवारणी करणे शक्य होते. तसेच नोझल्सची उंचीही गरजेनुसार कमी जास्त करता    येते.  
एकरी खर्च वाचवला 

विकास यांना हे यंत्र बनविण्यासाठी सुमारे ३००० ते ३५०० रुपये खर्च आला आहे. आपल्या मुलीच्या नावावरून वसुंधरा बहुद्देशीय कृषी औजार असे नामकरण त्याचे केले आहे. खर्चातील बचत सांगताना विकास म्हणतात की एक पंप फवारून द्यायला आज ४० रुपये घेतात. एकरी १२ ते १३ पंप म्हटले तरी एकरी हा खर्च ५०० रुपयांच्या दरम्यान होतो. बरं, त्यासाठी पाणी आणणे, कीडनाशकाचे द्रावण तयार करणे ही कामे आपल्यालाच करावी लागतात. त्या तुलनेत वसुंधरा यंत्र केवळ एका व्यक्तीच्या आधारे काम करते. वेळ, श्रम व पैसे यात मोठी बचत करते. विकास यांनी मुख्यत्वे आपल्या ऊस पिकात त्याच वापर केला असली तरी अन्य कोणत्याही पिकात तो फायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परिसरातील दोन- तीन शेतकऱ्यांनी असे यंत्र बनवून त्याचा वापर सुरू आहे. तसेच राज्यातील काही शेतकऱ्यांनीही आपल्याला असे यंत्र बनवून देण्याची विनंतीही केली आहे असे विकास                                         सांगतात.  

वसुंधरा फवारणीचे यंत्राचे फायदे 
एकाचवेळी दोन सरींत फवारणी केली जात असल्याने कमी वेळेत, कमी श्रमात अधिक काम होते. 
या यंत्राचे कोणतेही वजन उचलावे लागत नसल्यामुळे खांदा व पाठ दुखी होत नाही. 
एकाच व्यक्तीद्वारे कामे होत असल्यामुळे मजुरीच्या खर्चात बचत होते. 
पंप चालू-बंद करण्याची यंत्रणा यंत्राच्या हॅंडलजवळच दिली असल्याने रसायन वाया जात नाही. 
मजूर समस्या कमी झाली असून, फवारणीच्या एकरी खर्चात सुमारे ५०० रुपयांची बचत झाली आहे. 

शेतकऱ्यांसाठी  गरजेनुसार निर्मिती  
येत्या काळात या यंत्रात अजून सुधारणा करणार असल्याचे विकास यांनी सांगितले. या यंत्रास मागील बाजूस कोळपे तसेच टोकणी यंत्र बसविणार आहे. यामुळे जमीन हलवण्याबरोबर टोकणीचे कामही होणार आहे. तसेच पंपाची बॅटरी ‘चार्ज’ करण्यासाठी कोळप्यावर ‘सोलर प्लेट’ बसवण्याचा विचार आहे. 

काही मुख्य वैशिष्ट्ये 
यंत्र, त्यावर ठेवलेला पंप, त्यातील द्रावण असे सगळे मिळून त्याचे वजन २२ किलोपर्यंत आहे. त्यामुळे चालवताना त्रास होत नाही. त्याचबरोबर आपले काम झाल्यानंतरही ते ‘फोल्ड’ करून ठेवता येते. दुचाकीला मागे बांधून कोठेही नेता येते.  
: विकास पाटील, ९९७५९७४१०२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com