लाखो हेक्टरवरील पिके ‘तग’ धरून; दुबार पेरणीचे संकट गडद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

अकोला - पावसाने मोठी उघाड घेतल्याने उगवणारा प्रत्येक दिवस शेतकऱ्यांची परीक्षा घेणारा ठरत अाहे. वऱ्हाडात जुलैच्या पहिल्या अाठवड्यापर्यंत सुमारे ११ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून वाशीम जिल्ह्याने यात अाघाडी घेतली अाहे. या जिल्ह्यात ८४ टक्के पेरण्या अाटोपल्या असून हजारो हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट अोढवले अाहे. 

अकोला - पावसाने मोठी उघाड घेतल्याने उगवणारा प्रत्येक दिवस शेतकऱ्यांची परीक्षा घेणारा ठरत अाहे. वऱ्हाडात जुलैच्या पहिल्या अाठवड्यापर्यंत सुमारे ११ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून वाशीम जिल्ह्याने यात अाघाडी घेतली अाहे. या जिल्ह्यात ८४ टक्के पेरण्या अाटोपल्या असून हजारो हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट अोढवले अाहे. 

या विभागात १६ व १७ जून रोजी झालेल्या पावसामुळे सार्वत्रिक पेरण्यांनी वेग घेतला होता. यानंतर अधून-मधून हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस पडला. या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. यात बुलडाणा व वाशीम जिल्हा अग्रेसर राहला. अकोल्यामध्ये सुरवातीपासून पावसाचे प्रमाण कमी तसेच खंडीत स्वरुपातील असल्याने पेरण्या झालेल्या नाहीत. बुलडाणा जिल्ह्यात सात लाख ४८ हजार सरासरी क्षेत्रापैकी पाच लाख ३२ हजार हेक्टरवर पेरणी झाली. वाशीमध्ये चार लाख १४ हजार हेक्टरपैकी तीन लाख ४० हजार हेक्टर तर अकोला जिल्ह्यांत चार लाख ८४ हजार हेक्टरपैकी दोन लाख १९ हजार हेक्टरवर लागवड झाली. बुलडाण्यात ७१ टक्के, वाशीम ८२ व अकोला ४५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या. 

अाता गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अाजवर ‘तग’ धरून असलेली पिके दुपारच्या वेळी सुकत अाहेत. काही शेतकऱ्यांनी पिकाची उगवणच न झाल्याने पेरणी मोडून दुबार पेरणी केली. अाता ही दुबार पेरणीसुद्धा अडचणीत सापडलेली अाहे.  

जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. अकोट तालुक्यातील परिस्थिती अधिक गंभीर अाहे. तिकडे तितक्या पेरण्यासुद्धा झालेल्या नाहीत. पेरण्याबाबतची माहिती अाज अपडेट करतो व नंतर देतो.
- राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

वाशीम जिल्ह्यातील खरीप पेरण्या पावसाअभावी अडचणीत अाहेत. दोन तीन दिवसांत पाऊस झाला तर ठिक होईल. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची माहिती संकलन करण्याबाबत सांगितले अाहे.
- दत्तात्रेय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम
 

 ५० टक्क्यांवर पेरण्या धोक्यात
पाऊस नसल्याने दुबार पेरण्यांचे संकट वाढले अाहे. दोन दिवसात पाऊस न झाल्यास वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये किमान लागवड झालेले ५० टक्के क्षेत्र उलटू शकते. असे झाल्यास कोट्यवधींचा फटका शेतकऱ्यांना बसणार अाहे. एकरी पाच हजार रुपये लागवड खर्च गृहीत धरला तरी पाच लाख हेक्टरसाठी किमान २५० कोटी रुपये पाण्यात जाऊ शकतात. हंगाम लांबत चालल्याने पिकांच्या उत्पादकेवरही विपरीत परिणाम संभवत  अाहे.

Web Title: agrowon news agriculture akola