कोरफडीपासून मूल्यवर्धित पदार्थनिर्मिती

डॉ. रवींद्र नाईक, डॉ. आर. टी. पाटील
सोमवार, 10 जुलै 2017

औषधी गुणधर्मानेयुक्त अशा कोरफडीपासून प्रक्रियेनंतर विविध उत्पादने तयार करता येतात. त्यातील प्राथमिक टप्प्यावरील प्रक्रिया शेतीवरच करणे शक्य असून, त्यासाठी आवश्यक यंत्रे आणि मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीविषयी माहिती घेऊ.

कोरफडीमध्ये पिवळा चिकट द्रव आणि पारदर्शन जेल असे दोन द्रव पदार्थ असतात. पिवळा चिकट द्रव प्रामुख्याने अॅलोईन. अॅलाय इमोडीन आणि फिनॉल्स या घटकांनी बनलेला असतो. पारदर्शक जेल हा पॅरेनसिमल पेशीपासून बनतो. या जेलमध्ये ९७ ते ९८ टक्के पाणी असून, वाळवल्यानंतर पॉलीसॅकराईड घटक ६० टक्क्यांपेक्षा अधिक असतात. हा जेल रंगहीन, वासहीन असून, त्यात हायड्रोकोलाईड आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक घटक असतात.  

कोरफडीच्या गरामध्ये सामान्यतः ९८.५ टक्के पाणी असून, जेलमध्ये ९९.५ टक्के पाणी असते. उर्वरित ०.५ ते १ टक्के घनपदार्थामध्ये पाण्यात किंवा मेदामध्ये विद्राव्य अशी जीवनसत्त्वे, मूलद्रव्ये, विकरे, पॉलिसॅकराईड, फिनॉलिक व सेंद्रिय आम्ले असतात. एकाच वेळी अनेक घटकांना सामावून घेण्याच्या या क्षमतेमुळे कोरफडीच्या गर किंवा जेलला अनेक औषधी गुणधर्म प्राप्त होतात. 

कोरफडीचे आरोग्यासाठी फायदे- 
औषधे त्वचेच्या अंतर्गत भागात पोचवते. 
मधूमेहविरोधी गुणधर्म.
प्रतिकारकशक्ती वाढवते.
दाह कमी करते. 
जखमा बऱ्या करते.
कर्करोगविरोधी गुणधर्म 
त्वचेच्या आरोग्यासाठी उपुयक्त.
सूक्ष्मजीव (जिवाणू, विषाणू आणि बुरशी) विरोधी गुणधर्म.
पोटातून औषधांसोबत घेतल्यास औषधांचे उत्तम शोषण होते. 

कोरफड गरामधील २२ पैकी २० अमिनो आम्ले आणि आठ पैकी सात आवश्यक अमिनो आम्ले मानवी शरीरासाठी आवश्यक मानली जातात. कोरफड रस हा आरोग्यासाठी उपयुक्त घटकाने परिपूर्ण मानला जातो.   

पारंपरिक औषधे, अन्न, पेये आणि प्रसाधन उद्योगांमध्ये कोरपडीचा वापर होतो. त्या अर्थाने कोरफड हे औद्योगिक पीक आहे. त्यात भाजलेल्या व अन्य जखमा बऱ्या करण्याचे, तसेच कर्करोग विरोधी गुणधर्म आढळले आहेत. 

पेये - चहा, दूध, आइस्क्रिम आणि अन्य.

प्रसाधने - विविध मलम, साबण, शाम्पू आणि चेहरा स्वच्छ करणारे घटक. 

काढणीपश्चात तंत्रज्ञान - 
कोरफड प्रक्रियेचे तीन टप्पे पडतात.
प्राथमिक प्रक्रियेमध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचा समावेश होतो. कोरफडीची पाने काढल्यानंतर दोन ते चार तासांमध्ये त्वरीत स्वच्छ करावीत.त्यामुळे काढणीच्या बॅचेस कमी वजनाच्या (प्रामुख्याने एक टनापेक्षा कमी) ठेवाव्यात. प्रक्रिया केंद्र हे शक्यतो कोरफड शेताजवळ असावे.  

द्वितीय प्रक्रियेमध्ये पानांवरील साल  कापून त्यातून गर वेगळा केला जातो.    ही प्रक्रिया माणसांच्या साह्याने किंवा यंत्राने केली जाते. त्यापासून जेल बनवता येते. 
अंतिम प्रक्रियेमध्ये उपलब्ध जेल किंवा गरापासून मूल्यवर्धित पदार्थ किंवा औषधांची निर्मिती मोडते. 

जेल स्थिरीकरण तंत्र
कोरफड जेलच्या निर्जंतुकीकरणासाठी त्याला उष्णता देऊन ६५ अंश सेल्सिअस तापमानाला सुमारे १५ मिनिटांपर्यंत ठेवले जाते. त्यानंतर एकदम ५ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत थंड केले जाते. 

जेलच्या स्थिरीकरणासाठी सोडियम बेन्झोएट, पोटॅशिअम सोरबेट आणि सायट्रिक अॅसिड या सारखे प्रीझर्वेटिव्ह वापरले जातात. 

कोरफड गराला येणारा तीव्र गंध व जैविक क्रिया कमी करण्यासाठी एचटीएसटी प्रक्रिया (उष्णता ८५ ते ९५ अंश सेल्सिअस, एक ते दोन मिनिटे) फायदेशीर ठरते. पाश्चरायझेशननंतर रस एकदम १० ते १५ सेकंदामथ्ये ५ अंश सेल्सिअसपर्यंत थंड केला जातो.  

कोरफडीचे मूल्यवर्धित पदार्थ 
कच्च्या कोरफड रसामध्ये विविध अॅन्थ्रोक्विनोन घटक आणि अशुद्धी असल्यामुळे त्याचा सरळ वापर औषधांमध्ये केला जात नाही. तुलनेने अधिक पारदर्शक, रंगहीन आणि अॅलोनरहिन रसाच्या निर्मितीसाठी सेंट्रल एरीड झोन रिसर्च स्टेशन (सीएझेडआरआय) संस्थेने प्रमाणित पद्धती विकसित केली आहे. 

तीव्र रस - कोरफडीचा तीव्र रस बनविण्याची प्रक्रिया सोपी आणि स्वस्त असली तरी त्यातील कार्यरत औषधी घटकांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्यापासून तीव्र स्वरूपातील द्रावण करण्याची आवश्यकता भासते. 

अॅलोईन वेगळे करणे - ही प्रक्रिया सामान्य तापमान करण्याजोगी व सोपी आहे. कोरफडीतली अॅलोईन वेगळे करण्यासाठी सेंद्रिय घटकांचा वापर केला जातो. हे सेंद्रिय घटक पुन्हा पुन्हा वापरता येतात. वेगळे केलेल्या अॅलोईनमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्याचा वेगवेगळ्या प्रमाणामध्ये विविध उपचारांमध्ये वापर केला जातो. 

क्रॅक क्रिम - पायामध्ये पडणाऱ्या भेगांवरील उपचारांसाठी किंवा कोरडी त्वचेमध्ये आर्द्रता आणण्यासाठी क्रिम उपयुक्त ठरते. त्यामुळे त्वचा मऊ पडते. तसेच त्वचेवरील भेगा व जखमा भरून येण्यास मदत होते. 

मॉश्चरायझर - हे सामान्य आणि तेलकट त्वचेसाठी उपयुक्त ठरते. त्वचा मऊ आणि चमकदार होते. त्वचेवर थंडीमुळे पडणारे काळे डाग कमी करते. 

जेल - उन्हाळ्यामध्ये मॉश्चरायझर म्हणून उपयुक्त आहे. डोक्यावरील केसांच्या मुळांशी नियमितपणे वापरल्यास नव्या केसाच्या वाढीसाठी मदत करते. 

कॅण्डी - यामध्ये कोरफडीतील पॉलिसॅकराईड घटकांचा २०० ते ३०० टक्के तीव्रतेपर्यंत वापर केला जातो. 
कोरफड शांपू, केसांसाठी क्रिम, लोणचे यांसारखे काही पदार्थ लघू उद्योगाच्या स्वरूपामध्ये तयार करता येतात. 

प्रक्रियेचे टप्पे
शेतातून काढलेली ताजी कोरफड
स्वच्छ धुऊन निथळून घेणे
कोरफडीची खालील बाजू आणि बाजूचे काटे काढून घ्यावेत
सालीमधून गर वेगळा करणे (यांत्रिक किंवा माणसांच्या साह्याने.) 
गर बारीक करणे
स्वच्छ करणे व गाळून घेणे
गरातील एकूण घन पदार्थांची तीव्रता ठरवणे
पाश्चरायझेशन
उष्णतेनंतर एकदम थंड करून एचडीपीईच्या ड्रममध्ये भरणे
शीत वातावरणामध्ये साठवण
स्प्रे ड्रायिंग आणि पॅकेजिंग
दर्जा नियंत्रण आणि साठवण

डॉ. पाटील,  ramabhau@gmail.com
डॉ. नाईक, ०९९९४४६४०६९
( डॉ. पाटील हे केंद्रीय काढणीपश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, लुधियाना येथे  माजी संचालक असून, डॉ. नाईक हे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग, प्रादेशिक केंद्र, कोइमतूर येथे कार्यरत आहेत. 

Web Title: agrowon news agriculture Aloe vera