सीड प्लॉटधारकांनाही बोंड अळीचा फटका

प्रतिनिधी
गुरुवार, 18 जानेवारी 2018

अकोला  - कापूस उत्पादनासोबतच सीड प्लॉट निर्मितीसाठी काही शेतकरी दरवर्षी पुढाकार घेतात. कापूस उत्पादन पट्ट्यात विविध बियाणे कंपन्या शेतकऱ्यांशी करार करून बियाणे निर्मिती करीत असतात. या वर्षात सीड प्लॉटिंग करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झेलावे लागले आहे. त्यासोबतच शासनाकडून बोंड अळीसाठी जाहीर नुकसानभरपाईमध्ये सीड प्लॉटचा समावेश करायचा की नाही, याचा संभ्रम तयार झालेला अाहे.

अकोला  - कापूस उत्पादनासोबतच सीड प्लॉट निर्मितीसाठी काही शेतकरी दरवर्षी पुढाकार घेतात. कापूस उत्पादन पट्ट्यात विविध बियाणे कंपन्या शेतकऱ्यांशी करार करून बियाणे निर्मिती करीत असतात. या वर्षात सीड प्लॉटिंग करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झेलावे लागले आहे. त्यासोबतच शासनाकडून बोंड अळीसाठी जाहीर नुकसानभरपाईमध्ये सीड प्लॉटचा समावेश करायचा की नाही, याचा संभ्रम तयार झालेला अाहे.

दरवर्षी बुलडाणा, अकोला जिल्ह्यांत कापूस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांकडून सीड प्लॉट दिले जातात. यासाठी शेतकऱ्यांना एक विशिष्ट दर ठरवून दिला जातो. सरासरी १५ ते १९ हजार रुपये क्विंटलने हा कापूस बियाणे कंपन्या विकत घेतात. एकरी ३ ते ५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. तर एकरी उत्पादन खर्च हा १५ हजारांपर्यंत राहतो. सीड प्लॉट हा फायदेशीर असल्याने शेतकरी त्याकडे अाकृष्ट होत अाहेत.

प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार या तालुक्यांमध्ये सीड प्लॉट कापूस लागवड क्षेत्राच्या ७ ते १० टक्के अाहेत. यावर्षी या प्लॉटची स्थिती चांगली होती. या हंगामात पावसाचा खंड पडला त्यावेळी शेतकऱ्यांनी धावपळ करीत पिकाला पाणी दिले. व्यवस्थित संकरण व इतर व्यवस्थापन करण्यात अाले. परंतु साध्या कपाशी क्षेत्राप्रमाणेच बोंड अळीचा या सीड प्लॉटला तडाखा बसला आहे. दरवर्षीच्या तुलनेत सीड प्लॉटमधील उत्पादन ५० टक्क्यांच्या अात अाले अाहे. दरवर्षी लागतो तितकाच खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. मात्र उत्पादन घटले. शिवाय निघालेल्या कापसाच्या दर्जावरही परिणाम झाला. परिणामी करार केलेले दर काही कंपन्यांकडून कमी-अधिक केले जात अाहेत. 

बियाण्याला फटका बसण्याची चिन्हे
हंगामात लागणारे कापूस बियाणे पुरविण्यासाठी कंपन्या सीड प्लॉट घेत असतात. यंदा प्लॉटमधील उत्पादन ५० टक्क्यांच्या अात अाल्याने साहजिकच बियाणे निर्मितीसाठी लागणाऱ्या कपाशीची (सरकी) तूट पडण्याची चिन्हे अाहेत. अाधीच या मोसमात कपाशीच्या बियाण्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले जात असल्याने बोंड अळीच्या तडाख्यात सापडलेल्या कपाशीपासून बियाणे कसे तयार होईल हाही पेच अाहे.

यावर्षी चार एकरांत कापूस प्लाॅट लागवड अाहे. एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन होत असते. यंदा दोन ते अडीच क्विंटलपर्यंत उतारा येत अाहे. एकरी खर्च १५ हजारपर्यंत झालेला अाहे. बोंड अळीने सीड प्लॉटचे मोठे नुकसान केले अाहे. शासनाने जाहीर केलेल्या बोंड अळी सर्वेक्षणात सीड प्लॉटच्या समावेशाबाबत स्पष्ट धोरण नसल्याने पंचनामा करणाऱ्यांनी क्षेत्र वगळले होते. गेल्या अाठवड्यात साखरखेर्डा येथे कृषी मंत्री अाले असता त्यांना हा मुद्दा सांगितल्यानंतर मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सीड प्लॉटचा सर्व्हे करण्याबाबत निर्देश दिले अाहेत. 
-विनोद बेंडमाळी, शेतकरी, साखरखेर्डा, जि. बुलडाणा

Web Title: agrowon news akola cotton