पशुपालक कंपन्या राज्यात स्थापन होणार

गणेश कोरे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

पुणे : पशुधनाच्या सामूहिक संवर्धनातून मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकरी कंपन्यांच्या धर्तीवर प्रत्येक गावात पशुपालक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १०० गावांमध्ये कंपनी स्थापन्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या कंपन्यांच्या यशस्वितेनंतर प्रत्येक गावात कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. शेळी-मेंढी महामंडळाच्या वतीने या कंपन्या स्थापन करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात एक काेटी रुपयांची तरतूद महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. पशुधनामधील गायी, म्हशी, शेळी, मेंढी, कुक्कुट आणि मत्स्य आदी विविध क्षेत्रांत कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत.

पुणे : पशुधनाच्या सामूहिक संवर्धनातून मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकरी कंपन्यांच्या धर्तीवर प्रत्येक गावात पशुपालक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १०० गावांमध्ये कंपनी स्थापन्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या कंपन्यांच्या यशस्वितेनंतर प्रत्येक गावात कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. शेळी-मेंढी महामंडळाच्या वतीने या कंपन्या स्थापन करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात एक काेटी रुपयांची तरतूद महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. पशुधनामधील गायी, म्हशी, शेळी, मेंढी, कुक्कुट आणि मत्स्य आदी विविध क्षेत्रांत कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. कंपनी स्थापनेतून गावातील विविध पशुधन एकत्र करून सामूहिकरीत्या व्यवसाय विकास, व्यवस्थापन, प्रक्रिया, विपणन आदी विविध क्षेत्रांतून मूल्यवर्धन आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शेळी-मेंढी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय परकाळे यांनी सांगितले. 

कंपनी स्थापनेसाठी राज्य शासनाने पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली हाेती. या समितीने चंद्रपूर, रत्नागिरी, जालना, सातारा, वर्धा, नगर आणि अमरावती या सात जिल्ह्यांतील १२६ गावांमध्ये सर्वेक्षण केले. सर्वेक्षणामध्ये गावांतील पशुधनाची संख्या, रस्ते, पाणी, वीज, जवळची बाजारपेठ, वाहतुकीचे पर्याय आदींचा समावेश हाेता. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचादेखील अभ्यास केला. यामध्ये कंपनी उभारताना येणाऱ्या अडचणी, कामकाज सुरूच न झालेल्या कंपनीच्या समस्या, बंद पडलेल्यांची कारणे, यशस्वी झालेल्या सध्या कार्यरत असणाऱ्या कंपन्या आदींचा अभ्यास करण्यात आला. या सर्व सर्वेक्षणाचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. शासनाने या अहवालाचा अभ्यास करून पशुपालक कंपन्या प्रत्येक गावात स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या कंपन्या शेळी मेंढी महामंडळ स्थापन करणार असून, प्रत्येक कंपनीचा व्यवसाय विकास आराखडा बनविण्यात येणार आहे. या कंपन्यांना वित्तीय संस्थांकडून वित्तपुरवठ्यासाठीदेखील शासन पाठपुरावा करणार आहे. 

लाेकप्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांना पत्रे 
आमच्या गावात पशुपालक कंपनी स्थापन करावी, अशा मागणीची पत्रे ४० लाेकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना पाठविली आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध आमदार, खासदारांचा समावेश आहे. या मागणीमुळे आमदार आणि खासदार आदर्श ग्राम याेजनेतील सहभागी गावांमध्ये पहिल्या टप्प्यात कंपनी स्थापनेचा निर्णय घेतला असल्याचे शेळी-मेंढी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले. 

Web Title: agrowon news cattle wealth farmer