लिंबूवर्गीय फळबागेची लागवड

डॉ. एस. पी. चव्हाण, आर. एस. बोराडे, एस. व्ही. जाधव 
गुरुवार, 15 जून 2017

लिंबूवर्गीय फळबागेची 
लागवड करताना योग्य जमीन निवडणे आवश्यक असते. योग्य जमिनीमध्ये योग्य आकाराचे खड्डे करून, ते शेणखत व सेंद्रिय खतांनी भरून घ्यावेत.

लिंबूवर्गीय फळबागेची 
लागवड करताना योग्य जमीन निवडणे आवश्यक असते. योग्य जमिनीमध्ये योग्य आकाराचे खड्डे करून, ते शेणखत व सेंद्रिय खतांनी भरून घ्यावेत.

जमिनीची निवड 
लागवडीसाठी हलक्या ते मध्यम स्वरूपाची उत्तम निचऱ्याची एक मीटर खोलीपर्यंत सुपीक माती असलेली जमीन निवडावी. 
पाण्याची पातळी जमिनीच्या पृष्ठभागापासून २.५ ते ३ मीटर खोलीपेक्षा अधिक असावी.
जमिनीचा सामू ६ ते ८ च्या दरम्यान असावा. क्षारांचे प्रमाण ०.१ पेक्षा कमी आणि चुन्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.
अति हलकी व ३० सेंमी खोलीनंतर कडक मुरूम असलेली, चोपण, चिबड, कमी निचऱ्याची आणि चनुखडीयुक्त जमीन निवडू नये. अति आम्ल (सामू ६ पेक्षा कमी) आणि अति विम्ल (सामू ८ च्यावर) अशा जमिनीत मोसंबीची लागवड करू नये. 

जात व कलमांची निवड 
मोसंबी ः न्युसेलर, सातगुडी, काटोल गोल्ड, फुले मोसंबी
संत्रा ः नागपूर संत्रा, एन ४ (सीडलेस)
लिंबू ः देशी, प्रमालिनी, विक्रम, फुले सरबती, साई सरबती
लागवड 
मशागत  

बागेची लागवड करण्यापूर्वी चढ उतार असलेल्या जमिनीचे सपाटीकरण करून घ्यावे. त्यात सुरवातीची एक दोन वर्षे हिरवळीची खते घ्यावी. शेणखत टाकावे. 

खड्डे खोदणे 
खड्ड्याचा आकार ६० बाय ६० बाय ६० सेंमी असावा. हलक्या जमिनीत खड्ड्याचा आकार १ बाय १ बाय १ मीटर ठेवावा. खड्डे खोदताना वरील थरातील सुपीक माती वेगळी बाजूला ठेवावी. शक्यतो उन्हाळ्यापूर्वी खड्डे करावेत. 

खड्डे भरणे 
लागवडीपूर्वी खड्डे भरताना १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत अधिक २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक काळी माती अधिक ५ किलो निबोंळी पावडर अधिक २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा अधिक २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर अधिक २५ ग्रॅम रायझोबियम मिसळावे. खड्डे भरताना जमिनीपेक्षा १५ सेंमी उंच अशा काठीमध्ये रोवून घ्यावी. 

कलमांची निवड 
कलमे सरकारी किंवा नोंदणीकृत रोपवाटिकेतून खरेदी करावीत.
रंगपूर खुंटावरील कलमांना प्राधान्य द्यावे.
कलमे सरळ व जोमदार वाढलेली, ६० ते ९० सेंमी उंचीची, चार ते सहा रोगमुक्त पानांची असावीत. 
डोळा भरलेला भाग जमिनीपासून २० ते ३० सेंमी उंच असावा.
कलम व खुंटाचा भाग एकरूप असावा. 
डोळ्यापासून वाढलेल्या फांदीमध्ये चांगला टणकपणा आलेला असावा. 
कलम काढताना जारवा (कार्यक्षम लहान मुळ्या) तुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी. 
 डॉ. चव्हाण एस. पी. ९१५८३३३३९९
(विषय विशेषज्ञ, उद्यान विद्या, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

लागवडीच्या वेळी घ्यावयाची काळजी 
 लागवड शक्यतो सकाळी लवकर करावी. कलम लावताना मुळ्या दुमडणार नाहीत, याकडे लक्ष 
द्यावे.  
लागवडीनंतर कलमाभोवती माती चांगली दाबून घ्यावी. मुळाभोवतीची माती पोकळ राहू देऊ नये, अन्यथा कलमे सुकण्याची शक्यता असते.  कलमास पश्चिम दिशेला एक ते दीड मीटर बांबूच्या काठीचा आधार द्यावा. 
कलमे लावण्यापूर्वी खालून जवळपास एक तृतीयांश ते अर्ध्यापर्यंत भागावरील पाने काढावीत. 
कलमांच्या डोळ्याची दिशा वाऱ्याच्या दिशेस ठेवावी. 
पाऊस नसल्यास हलके पाणी द्यावे. 

Web Title: agrowon news Citrus fruit plantation