सुधारित तंत्रातून पीक उत्पादनात वाढ

राजकुमार चौगुले
रविवार, 6 ऑगस्ट 2017

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील डॉ. यशवंत मोरे यांनी वडिलोपार्जित चार एकर शेती किफायतशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. ऊस शेतीबरोबरीने घरापुरती कडधान्ये, भाजीपाला लागवडीवर त्यांचा भर आहे. युवक आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना बरोबर घेत गावामध्ये कृषी तंत्रज्ञान प्रसारावरही डॉ. मोरे यांनी भर दिला आहे.

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील डॉ. यशवंत मोरे यांनी वडिलोपार्जित चार एकर शेती किफायतशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. ऊस शेतीबरोबरीने घरापुरती कडधान्ये, भाजीपाला लागवडीवर त्यांचा भर आहे. युवक आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना बरोबर घेत गावामध्ये कृषी तंत्रज्ञान प्रसारावरही डॉ. मोरे यांनी भर दिला आहे.

इचलकरंजी शहरात डॉ. यशवंत बाबूराव मोरे यांचा दवाखाना आहे. याशिवाय ते शहरातील सेवा भारती या संस्थेच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पहातात. सन १९९० मध्ये डॉ. मोरे यांनी वैद्यकीय व्यवसायासाठी त्यांचे मूळ गाव रांगोळी सोडून इचलकरंजी येथे स्थायिक झाले. सुरवातीला एकत्र कुटुंब होतं, यामुळे शेतीकडे फारसे लक्ष नव्हते; परंतु विभक्त झाल्यानंतर शेतीची जबाबदारी त्यांच्यावर पडली. डॉ. यशवंत मोरे आणि त्यांचे बंधू डॉ. भरत मोरे यांची एकूण चार एकर शेती आहे. परंतु डॉ. भरत मोरे परदेशात असल्याने चार एकर क्षेत्राची जबाबदारी डॉ. यशवंत मोरे यांच्याकडे आहे. 

सुधारित पद्धतीने ऊस  लागवडीवर भर : 
डॉ. यशवंत मोरे यांचे वडील परिसरात प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जात. त्यामुळे पहिल्यापासूनच सुधारित तंत्राने शेती नियोजनाचे गणित पक्के होते. कुटुंब विभक्त झाल्यानंतर सन २००५ पासून डॉ. मोरे यांनी शेती नियोजनात लक्ष देण्यास सुरवात केली. या वेळी साडेतीन फुटावर सरी सोडून ऊस लागवड केली जात होती. परंतु डॉ. मोरे यांनी लागवडीची पारंपरिक पद्धत बदलली. साडेचार फुटाच्या सरीत ऊस लागवड करण्यास सुरवात केली. को-८६०३२, फुले-२६५ या जातींच्या लागवडीवर त्यांचा भर आहे. पट्टा पद्धतीमुळे पॉवर टिलरने आंतरमशागत आणि उसाला भर देणे सोपे झाले. यामुळे मजूर आणि भांगलणीचा खर्च काही प्रमाणात कमी झाला, वेळही वाचला. 

 पारंपरिक पद्धतीने डॉ. मोरे यांना एकरी तीस टनापर्यंतच उत्पादन मिळायचे. पण साडेचार फुटाची सरी आणि  योग्य पीक व्यवस्थापनातून त्यांनी टप्प्याटप्प्याने ऊस उत्पादन वाढीचे ध्येय साध्य केले. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्याने त्यांनी ऊस बेणे निवड, लागवड तंत्र आणि खत व्यवस्थापन ठेवले. त्यामुळे गेल्या काही वर्षात ते एकरी तीस टनांच्यावरून ते साठ टनांपर्यंत पोचले. खोडव्याचेही त्यांना ४० टन उत्पादन मिळते. शेतीच्या नियोजनासाठी एक कायमस्वरूपी मजूर आहे. गरजेनुसार लागवड, भांगलणीसाठी मजूर घेतले जातात.

पीकनियोजनाबाबत डॉ.मोरे म्हणाले की, शेती नदीकाठी असल्याने ऊस लागवडीचेच नियोजन असते. साधारणपणे तीन एकर क्षेत्रावर ऊस लागवड असते. खरिपात एक एकरावर सोयाबीन लागवड करतो. याचबरोबरीने काही सऱ्यांवर मूग, उडिदाची लागवड केली जाते. सोयाबीनचे सरासरी एकरी १५ क्विंटल उत्पादन मिळते. घरापुरते मूग, उडिदाचे उत्पादन मिळते. याचबरोबरीने शेताच्या कडेने वरणा, उसातील काही सऱ्यांमध्ये कोथिंबीर, वांगी, भेंडी, मेथी लागवड करतो. त्यामुळे घरापुरता काही प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होतो. परिसरातील पाच-सहा शेतकऱ्यांनी मिळून  पंचगंगा नदीवरून पाइपलाइन केली आहे. 

शेतीकामातही सहभाग 
डॉ. मोरे हे सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत तर सायंकाळी पाच ते नऊपर्यंत दवाखान्यात व्यस्त असतात. मधल्या वेळेत ते मजुरांशी संपर्क साधून शेतीच्या कामकाजाची माहिती घेतात. रविवार किंवा अन्य सुटीच्या दिवशी मात्र शेताकडे जावून मजुरांच्या बरोबरीने शेतीचे पुढील आठवड्यातील नियोजन करतात. डॉ. मोरे यांच्या पत्नी सौ. शोभा यांनाही शेतीची आवड आहे. त्यामुळे त्याही स्वतः शेतीकडे जाऊन पीक व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतात. ऊस लागवडीमधील एक- दोन सरीमध्ये घरच्यासाठी भाजीपाला, पालेभाज्यांची त्या लागवड करतात. यामुळे त्यांचा शेतीशी सातत्याने संपर्क असतो. डॉ. मोरे यांच्या गैरहजरीत शेतीच्या कामाची जबाबदारी सौ. शोभा यांच्यावर असते. ज्या वेळी शेतावर पीक मळणीचे काम असते, त्या वेळी जादा मजूर न घेता स्वतः डॉ. मोरे आणि त्यांच्या पत्नी सौ. शोभा या मजुरांच्या सहाय्याने मळणीचे काम उरकतात. पीक पेरणी, मळणीच्या वेळी  शेतात स्वतः हजर रहाण्याचा प्रयत्न मोरे दांपत्याचा असतो.

नवरात्रोत्सवात कृषी तंत्रज्ञानाचा जागर 
रांगोळी गावातील एका नवरात्र मंडळाचे डॉ. मोरे हे संस्थापक अध्यक्ष आहे. प्रत्येक वर्षी सांस्कृतिक उपक्रमाच्या बरोबरीने गावातील युवक आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सहकार्याने  मंडळाच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान परिसरातील शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी पीक व्यवस्थापनाविषयी चर्चासत्राचे आयोजन  करण्यासाठी डॉ. मोरे पुढाकार घेतात. यामुळे गावातील शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान रूजविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. याचबरोबरीने दरवर्षी मंडळ तसेच सहकारी डॉक्टरांच्या मदतीने गावामध्ये रक्तगट तपासणी, आरोग्य शिबिरांचेदेखील ते आयोजन करतात. 

 शेतकऱ्यांचा सल्ला मोलाचा 
डॉ. मोरे हे इचलकरंजी शहरात रहावयास असले तरी त्यांचा सातत्याने गावाशी संपर्क असतो. ज्या वेळी शेती वाट्याला आली त्या वेळी ती परिसरातील शेतकऱ्याच्याबरोबरीने वाटणीने करावी, असा त्यांच्या मनात  विचार आला, परंतु वाटणीने शेती केल्यास अपेक्षित आर्थिक फायदा मिळणार नाही असा विचार करून स्वत: देखरेख करीत शेती करायची असे ठरविले. याचा त्यांना फायदा झाला.
 डॉ. मोरे यांचे वैद्यकीय मित्रांबरोबर परिसरातील प्रयोगशील शेतकरी मित्रही आहेत. ऊस व इतर पिकांच्या व्यवस्थापनासाठी त्यांना शेतकरी मित्रांचा सल्ला उपयोगी ठरतो. गरजेनुसार गावातील प्रयोगशील शेतकरी त्यांना खत वापर, कीड, रोग नियंत्रणाबाबत सल्ला देतात. नवीन जाती, खते आणि  कीडनाशकांच्या वापराबाबत  ते परिसरातील निविष्ठा विक्रेत्याकडूनही मार्गदर्शन घेतात. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बरोबरीने चर्चा करून ते पीक नियोजनात बदल करतात. डॉ. मोरे यांनी यंदाच्यावर्षी कूपनलिका खोदली. अद्याप वीजजोडणी मिळालेली नाही. यानंतर उसाला ठिबक सिंचन करण्याचा त्यांचा  विचार आहे. याशिवाय सात गुंठे पडिक क्षेत्रात येत्या वर्षात बांबू लागवडीचे नियोजन केले आहे. 

शेतीचे समाधान वेगळेच...
डॉ. यशवंत मोरे दिवसभर रुग्णालयात व्यस्त असतात. परंतु शेतीकडे फेरी मारुन आल्यास दगदगीमुळे आलेला कंटाळा उत्साहात बदलत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बरोबरीने सातत्याने शेतीबाबत चर्चा केल्याने त्यांना नवनवीन माहिती मिळते. त्यांच्या पत्नी सौ. शोभा या त्यांच्याबरोबरीने शेती प्रगतीबाबत चर्चा करतात.  या चर्चेतून वर्षभरातील पीक लागवडीचे नियोजन केले जाते. हे समाधान वेगळे असल्याचे मोरे दांपत्य सांगतात. शेतीचा खर्च हा शेतातील उत्पन्नातूनच भागवण्यावर डॉ. मोरे यांचा प्रयत्न असतो. कधी अडचणीच्या वेळी व्यवसायाची रक्कम शेतीसाठी खर्ची घालावी लागते, परंतु योग्य पीक आणि आर्थिक नियोजन असेल तर शेतीत तोटा होत नसल्याचे डॉ. मोरे सांगतात.

Web Title: agrowon news crop