टोमॅटोतील तेजी टिकाऊ

दीपक चव्हाण
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

मागील तीन वर्षांत देशांतर्गत टोमॅटोखालील क्षेत्र आणि उत्पादनात वाढ होत आहे. २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये सुमारे ७.७ लाख हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड झाली होती. या दोन्ही वर्षांत अनुक्रमे १८७ व १८९ लाख टन उत्पादन मिळाले. २०१६-१७ मध्ये परिस्थिती बदलली. टोमॅटोची ८ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली, तर उत्पादन १९६ लाख टनांपर्यंत पोचले. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या दुसऱ्या फलोत्पादन अनुमानात ही आकडेवारी दिली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र, प. बंगाल, बिहार, गुजरात ही प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्ये आहेत. देशातील निम्म्याहून अधिक उत्पादन या राज्यांतून येते.

मागील तीन वर्षांत देशांतर्गत टोमॅटोखालील क्षेत्र आणि उत्पादनात वाढ होत आहे. २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये सुमारे ७.७ लाख हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड झाली होती. या दोन्ही वर्षांत अनुक्रमे १८७ व १८९ लाख टन उत्पादन मिळाले. २०१६-१७ मध्ये परिस्थिती बदलली. टोमॅटोची ८ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली, तर उत्पादन १९६ लाख टनांपर्यंत पोचले. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या दुसऱ्या फलोत्पादन अनुमानात ही आकडेवारी दिली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र, प. बंगाल, बिहार, गुजरात ही प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्ये आहेत. देशातील निम्म्याहून अधिक उत्पादन या राज्यांतून येते. यातील महाराष्ट्र आणि गुजरात ही वर्षभर टोमॅटो पिकवणारी राज्ये आहेत. अन्य राज्यांत हंगामी उत्पादन होते. 

गेल्या दिवाळीनंतर नैसर्गिक अनुकूलतेमुळे झालेली उत्पादनवाढ, महाराष्ट्रातील अडतबंदीमुळे ठप्प झालेला बाजार, नोटाबंदीनंतर खपात झालेली लक्षणीय घट आणि पाकिस्तान व बांगलादेशातील सीमाबंदी अशा अडथळ्यांच्या शर्यतीत टोमॅटोचा बाजार पार विस्कटून गेला. याखेरीज, मे व जून महिन्यात तीव्र उन्हाळा, भुरी व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव यामुळे ठिकठिकाणचे टोमॅटोचे प्लॉट खराब झाले. रोगाचा प्रादुर्भाव असताना बाजारात मंदी होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाकडे फारसे लक्ष दिले नाही. एक जुलैपासून टोमॅटोचा बाजार तेजीत येण्यास वरील मूलभूत परिस्थिती कारणीभूत आहे. शिवाय, जूनमध्ये शेतकरी आंदोलनाच्या पंधरा दिवसांत देशांतर्गत आवक-जावक ठप्प झाली; आधीच मंदीत असलेल्या टोमॅटोला सपाटून मार बसला. सततच्या तोट्याला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो मोडून काढले. स्वाभाविकपणे या घडामोडींचा परिणाम जुलैपासून दिसू लागला आहे. 

कॅलेंडर वर्ष २०१७ मध्ये एक जुलैनंतर प्रथमच सलगपणे तेजी दिसली आहे. सूत्रांच्या मते, सप्टेंबरपर्यंत तरी मंदीची कुठलीही शक्यता दिसत नाही. शिवाय, सध्याचे पाऊसमान पाहता डिसेंबरअखेरपर्यंत बाजार किफायती राहण्याची आशा आहे. नारायणगावातील साईराज टोमॅटो सप्लायर्सचे संचालक जालिंदर थोरवे यांच्या निरीक्षणानुसार सध्या राज्यातील टोमॅटो आवक रोडावली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात अतिपावसामुळे पीक अडचणीत आहे. कर्नाटकातील बेंगळूर विभागात पाऊस नसल्यामुळे व उष्णतेमुळे उत्पादनात घट आहे. त्यामुळे बाजारभाव किफायती आहे. नारायणगाव बाजारात ४० रु. किलो (८०० रु. प्रतिक्रेट) या पातळीला टोमॅटोचे दर आहेत. दक्षिण भारतातील प्रमुख बाजारात आवक घटली असून, स्थानिक बाजारपेठेपुरताच माल उपलब्ध आहे. नाशिक जिल्ह्यातील माल १५ ऑगस्टपासून बाजारात येण्यास सुरवात होईल; पण तुरळक प्रमाणात सध्या आवक सुर आहे; परंतु पुढेही आवक फार वाढण्याची चिन्हे नाहीत. टोमॅटो हे अतिखर्चाचे आणि कष्टाचे पीक आहे. गेल्या दीड वर्षात सातत्यपूर्ण तेजी आलीच नाही. सातत्याने तोटा सहन करून शेतकरी या पिकाला अक्षरश: विटले होते. अनेक शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली. सध्याच्या तेजीचे ते एक प्रमुख कारण आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मालास देशभरातून चांगली मागणी असते. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत ठिकठिकाणी काही प्रमाणात स्थानिक पीक उपलब्ध असते. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत पीक नियोजन महत्त्वाचे ठरते, असे थोरवे सांगतात.

२०१७-१८ मध्ये टोमॅटोखालील क्षेत्र आणि उत्पादन यात किती वाढ होते आणि पाऊसमान कसे राहते, यावर पुढील तेजी-मंदीचे गणित अवलंबून आहे. टोमॅटोतील सध्याची तेजी ही दीर्घ ते मध्यम अवधीची आहे, असे नाशिक येथील टोमॅटो रोपवाटिकाधारक शेतकरी जितेंद्र थोरात यांचे म्हणणे आहे. एक जूनपासून नाशिक जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने टोमॅटोची लागवड सुरू होती. जूनमध्ये अतिपावसामुळे रोपे खराब झाली. त्यामुळे थोडा हंगाम लांबला आहे आणि आजही रोपांना चांगली मागणी आहे. साधारपणे १५ ऑगस्टपासून आगाप टोमॅटोची तुरळक आवक सुरू होते. पुढे संक्रांतीपर्यंत आणि तेजीसह नैसर्गिक अनुकूलता असल्यास एप्रिलपर्यंत हंगाम चालतो. गेल्या वर्षी हंगामात ५० रु. क्रेटपर्यंत बाजार खाली आला होता. या वर्षी तशी परिस्थिती नाही. लागवड क्षेत्रात घट दिसत आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पुढेही बाजारभाव २०० ते ३०० रु. क्रेट या दरम्यान राहतील, असे थोरात यांचे मत आहे. रोप लागवडीपासून साधारपणे दीड ते दोन महिन्यांत टोमॅटोची काढणी सुरू होते. तेथून पुढे सहा महिन्यांपर्यंत शेतकरी टोमॅटोचा प्लॉट लांबवू शकतो. 

देशांतर्गत बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त होतो, तेव्हा शेजारी देशांतल्या मार्केटमध्ये माल पाठविण्याची संधी मिळाली पाहिजे. पाकिस्तान आणि बांगलादेशात भारतीय टोमॅटोसाठी मोठे मार्केट आहे; मात्र सततच्या सीमाबंदीमुळे निर्यात विस्कळित होत आहे. सध्या देशात उच्चांकी बाजार असल्यामुळे निर्यातीचा मुद्दा उपस्थित होत नाही; पण उच्चांकी तेजीमुळे पुढे लागवडीचे क्षेत्र वाढून पुरवठा वाढला तर शेजारी देशांना निर्यातीचा पर्याय उपलब्ध असला पाहिजे. शेजारी देशांनी स्थानिक लागवडीला प्रोत्साहन दिले, तर भारतीय टोमॅटोच्या मागणीवर कायमस्वरूपी परिणाम होण्याची शक्यता आहे. 

(लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)

Web Title: agrowon news deepak chavan article tomato