निर्यातक्षम उत्पादनातून प्रगतीची वाट!

निर्यातक्षम उत्पादनातून प्रगतीची वाट!

केवळ सातवीपर्यंतचे शिक्षण असले तरी खर्डी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील तानाजी हाके यांनी जिद्दीच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवरही मात केली. त्यांनी अभ्यासू वृत्तीने निर्यातीच्या निकषांचे काटेकोर पालन करीत डाळिंब, द्राक्षाचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांसाठी त्यांचे हे यश निश्‍चितच प्रेरणादायी आहे.

पंढरपूर-सांगोला रस्त्यावरील खर्डी हे गाव सीताराम महाराजांच्या समाधीमुळे सर्वदूर प्रसिद्ध आहे. दर दोन वर्षांनी दुष्काळी स्थितीचा सामना करत कशीबशी तग धरणारी येथील शेती. कोणत्याही कोरडवाहू शेतकऱ्याच्या मुलाप्रमाणेच आर्थिक परिस्थितीमुळे सातवीतून शाळा सोडावी लागलेले तानाजी हाके. कोणीही हार मानावी अशी विपरीत स्थिती. मात्र, तानाजी हाके यांनी कष्ट, धडपड आणि धाडसाने आपल्या शेतीचा कायापालट केला. शिक्षण सातवीपर्यंत असले तरी अभ्यासू वृत्तीने युरोपच्या बाजारपेठेचा प्रत्येक निकष जाणून घेतला. त्याचे काटेकोरपणे अवलंबन करीत आपले डाळिंब आणि द्राक्षे युरोपात पोचवली. 

परिसरातील शेतकऱ्यांमध्ये ‘युरो’ची भाषा रुजवली. ८ एकर डाळिंबापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ४० एकर डाळिंब, द्राक्षे आठ एकर आणि कलिंगड, खरबूजासह भाजीपाला तीन एकरपर्यंत पोचला आहे. आजही तानाजी हाके आपल्या आईवडील व दोन बंधूंसह संपूर्ण वेळ शेतात राबत असतात. एक भाऊ शिक्षक असून, एकत्रित कुटुंब शेतीसाठी पूरक ठरले आहे.  

डाळिंबाने नेले प्रगतीकडे 
२०१४ हे वर्ष खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट ठरले. आठ एकरात जवळपास ३ हजार डाळिंब झाडे होती. बागेच्या चौथ्या बहारातून ८० टन डाळिंब निघाले. संपूर्ण डाळिंबाची निर्यात युरोपला केली. निर्यातीच्या पहिल्याच प्रयत्नात चांगले उत्पन्न मिळविले. उत्साह वाढला. दुष्काळी स्थितीत बाग जगेल की नाही, या काळजीतही टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करत केलेल्या काटेकोर नियोजनाचे हे फळ होते. पुढे त्यांनी कधीच मागे पाहिले नाही. आज टप्प्या-टप्प्याने डाळिंबाचे क्षेत्र ५० एकरवर पोचले आहे. डाळिंबाबरोबर थॉमसन जातीच्या द्राक्षाची पंधरा एकर लागवडही त्यांनी केली. सातत्यपूर्ण दर्जेदार उत्पादन, निर्यात आणि अन्य शेतकऱ्यांना मदत करण्याची वृत्ती यामुळे तानाजी हाके हे खर्डी, कासेगाव, अनवली या भागातील शेतकऱ्यांसाठी आयडॉल ठरले आहेत. 

प्रतिकारशक्ती हेच तेलकट डागाला उत्तर
राज्यामध्ये तेलकट डाग रोगामुळे डाळिंब बागा काढून टाकाव्या लागत आहेत. त्यावर मात करण्यासाठी झाडाची प्रतिकारशक्ती वाढवण्यावर तानाजी हाके यांनी भर दिला. सेंद्रिय खतांचा वापर वाढवला. निर्यातीसाठी रासायनिक व सेंद्रिय घटकांचा सुवर्ण मध्य साधत रसायन अवशेषमुक्त डाळिंब उत्पादनावर भर दिला. निर्यातीसाठी युरोपमध्ये मान्य कीडनाशकांच्या फवारण्या व अन्य नियमांचे काटेकोर पालन करतात.

शेतीची वैशिष्ट्ये 
संपूर्ण शेतीत ठिबक सिंचन 
फळबागेत ऊस पाचट, तर वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर
एकात्मिक सेंद्रिय व रासायनिक शेती असली तरी सेंद्रिय घटकांवर अधिक भर. जैविक खतांचा वापर. 
२०१० ते २०१७ विषमुक्त (रेसिड्यू फ्री) निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन. २०१३ पासून द्राक्ष व भाजीपाल्याचे विषमुक्त निर्यातक्षम उत्पादन.
प्लॅस्टिक मल्चिंगवरील लागवडीतून काकडी एकरी ४० ते ४५ टन, खरबुज एकरी २८ ते ३० टन आणि कलिंगड एकरी ३० टनापर्यंत उत्पादन घेतात.  

पाणी कमतरतेवर मात 
विहीर, कूपनलिकेच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था असली तरी वाढणाऱ्या क्षेत्राबरोबर तीही तोकडी पडू लागली. त्यासाठी आठ कि.मी. अंतरावरील तपकिरी शेटफळ येथून पाइपलाइन केली. दोन कोटी लिटरचे शेततळे केले. पाण्याचा शाश्‍वत स्राेत तयार झाला. संपूर्ण क्षेत्र ठिबकवर आहे. ऊस पाचट विकत घेऊन प्रत्येक बागेत आच्छादन केले जाते. पाणी टिकून राहण्यासाठी मल्चिंगपूर्वी प्रत्येक ड्रिपरखाली २० ते ३० ग्रॅम पॉलीमर ठेवतात. ऊस पाचटाचे आठ-नऊ महिन्यानंतर खत होते. ३० ते ३५ टक्के पाण्याची बचत होते.

सरासरी उत्पादन  
डाळिंब (भगवा)  एकरी १५ ते १७ टन
द्राक्ष (थॉमसन सिडलेस) एकरी १० ते १५ टन
डाळिंबाला दर - प्रति किलो ९४  ते सर्वाधिक १२६ रुपये.

शेतकऱ्यांमध्ये प्रसार
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनाचा प्रसार करण्यासाठी शेतावर तीन वेळा चर्चासत्राचे आयोजन. 
आज परिसरातील सुमारे १५० शेतकऱ्यांना डाळिंबासाठी तांत्रिक मार्गदर्शन करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com