सोलापुरात कांदा १५०० रुपये क्विंटलपर्यंत

सुदर्शन सुतार
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांदा दरात सुधारणा झाली. कांद्याला सर्वाधिक १५०० रुपये क्विंटलपर्यंतचा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांदा दरात सुधारणा झाली. कांद्याला सर्वाधिक १५०० रुपये क्विंटलपर्यंतचा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कांद्याची आवक कमीच आहे. शिवाय दरही कमी आहेत. त्यामुळे बाजार काहीसा अस्थिर झाला होता. या सप्ताहात मात्र कांद्याचा बाजार वधारला. कांद्याची आवक स्थानिक भागाशिवाय बाहेरील जिल्ह्यातून आहे. कांदा दरात झालेली सुधारणा ही कांद्याला मागणी वाढल्याचा परिणाम असल्याचे सांगितले जाते. सोलापूरच्या स्थानिक व्यापाऱ्यांसह मुंबई आणि हैदराबाद येथूनही कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. बाहेरील बाजारातून होत असलेल्या उठावामुळे ही तेजी राहिल्याचे सांगण्यात आले. प्रतिक्विंटल सुमारे २०० ते ३०० रुपयांच्या फरकाने दरातील तेजी राहिली. कांद्याला २०० ते १५०० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. 

त्याशिवाय टोमॅटो, ढोबळी मिरची, दोडक्‍याच्या दरातील तेजी या सप्ताहातही कायम राहिली. टोमॅटोची रोज साधारण ५०० ते ७००, ढोबळी मिरचीची ५००, दोडक्‍याची १०० क्विंटल अशी आवक राहिली. या सप्ताहात त्यांनाही मागणी चांगली राहिल्याने संपूर्ण सप्ताहभर तेजी टिकून राहिली. टोमॅटोला प्रतिदहा किलोसाठी १५० ते ४०० रुपये,  ढोबळी मिरची २०० ते २७० रुपये आणि वांग्याला २५० ते ४०० रुपये असा दर राहिला.

काकडी, गाजरालाही या सप्ताहात काहीशी मागणी वाढली. त्यांचे दरही काहीसे स्थिर होते. काकडीला १५० ते ३०० आणि गाजराला १५० ते २०० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. पालेभाज्यांमध्ये मेथी, कोथिंबीर आणि शेपूचे दर तेजीत पण टिकून होते. भाज्यांची आवकही पुन्हा स्थानिक भागातूनच सर्वाधिक झाली. मेथीला प्रति शंभर पेंढ्यांसाठी ४०० ते ५००, कोथिंबिरीला ३०० ते ४०० आणि शेपूला २०० ते ३०० रुपये असा दर मिळाला.

Web Title: agrowon news onion solapur