फळबागेचे फुलले स्वप्न...

अभिजित डाके
Sunday, 21 January 2018

‘माळरानात मळा फुलला पाहिजे` हे वडिलांचे वाक्‍य संतोष सूर्यवंशी यांना स्वस्थ बसू देत नव्हते. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सूर्यवंशी यांनी मदुराई (तमिळनाडू) येथे सराफा व्यवसाय सांभाळत कचरेवाडी (ता. तासगाव, जि. सांगली) येथील वडिलोपार्जित जमिनीत भावाच्या साहाय्याने फळबाग फुलविली. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी शेती विकासाची दिशा पकडली आहे.

‘माळरानात मळा फुलला पाहिजे` हे वडिलांचे वाक्‍य संतोष सूर्यवंशी यांना स्वस्थ बसू देत नव्हते. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सूर्यवंशी यांनी मदुराई (तमिळनाडू) येथे सराफा व्यवसाय सांभाळत कचरेवाडी (ता. तासगाव, जि. सांगली) येथील वडिलोपार्जित जमिनीत भावाच्या साहाय्याने फळबाग फुलविली. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी शेती विकासाची दिशा पकडली आहे.

तासगाव तालुक्‍यातील डोंगरावर वसलेले कचरेवाडी (जि. सांगली) हे गाव. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीसाठी मर्यादा. वडिलोपार्जित अडीच एकर शेती. जिरायतीमुळे कुटुंब चालवणे कठीण. वडील विटा येथे यंत्रमागावर कामावर जायचे, तर कधी दुसऱ्या शेतात मजुरी करायचे. आर्थिक परिस्थिती नसल्याने शिक्षण मधूनच सोडावे लागले. परंतु चांगली शेती करायची हे वडिलांचे ध्येय होते. मुळात शेतीला पुरेल ऐवढे पाणी नव्हते. ज्वारी, भुईमूग यापैकी एकच पीक हाती यायचे. कुटुंब आर्थिक सक्षम करण्यासाठी काय करायचे, असा प्रश्‍न होता. माझ्या लक्षात आलं, आमच्या भागातील काही तरुण मुले तमिळनाडूतील मदुराई येथे सोने-चांदी व्यवसायात कामासाठी आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मी १९९९ मध्ये मदुराईला नोकरी निमित्ताने गेलो आणि हळूहळू तेथेच सराफा व्यवसायात जम बसविला. मात्र माळरानात मळा फुलला पाहिजे असं माझे वडील सातत्याने मला आणि बंधू धनाजी यांना सांगायचे. ते स्वप्न आम्ही पूर्ण केलं...हा प्रवास संतोष जोतीराम सूर्यवंशी सांगत होते.

फळबागेला झाली सुरवात  
द्राक्ष लागवडीबाबत संतोष सूर्यवंशी म्हणाले की, खानापूर तालुक्‍यातील हिवरे येथे माझे आत्तेभाऊ कृष्णदेव शिंदे हे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतात. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी द्राक्ष लागवडीपासून ते विक्रीपर्यंत मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविल्याने हुरूप वाढला. याेग्य  जातीची निवड, जमीन मशागत, रोप लागवड, कलमीकरण आणि बाग व्यवस्थापनाची माहिती घेत गेलो. लागवडीसाठी सुपर सोनाक्का जात निवडली. माझा भाऊ धनाजी दैनंदिन बागेचे व्यवस्थापन पाहू लागला. दर दीड महिन्यातून एकदा पंधरा दिवस मी मदुराई येथून गावी येऊ लागलो. सध्या द्राक्ष बाग ३२ गुंठे क्षेत्रावर आहे. दोन ओळीतील अंतर सात फूट आणि दोन रोपातील अंतर पाच फूट ठेवले. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने बागेचे पाणी, खत व्यवस्थापन, वेळेवर कीड, रोग नियंत्रण केले जाते. गेल्या वर्षी ३२ गुंठ्यांतून नऊ टन उत्पादन मिळाले. चार किलोच्या पेटीस१०० ते १५० रुपये असा दर मिळाला. यंदाच्या हंगामात दहा टन द्राक्षाची विक्री झाली आहे. प्रति चार किलोच्या पेटीस २०० रुपये दर मिळाला. अजून तीन टन द्राक्षाचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षी २६ गुंठे क्षेत्रावर नवीन द्राक्ष बागेची लागवड केली आहे.

शाश्वत पाण्याची केली सोय 
शेती नियोजनाबाबत संतोष सूर्यवंशी म्हणाले की, शेती चांगली करायची असेल तर पाण्याची शाश्‍वत सोय असली पाहिजे. २००८ मध्ये एक विहीर घेतली. याला पाणी चांगले लागले. हे पाणी वर्षभरातच पुरणार नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर सन २०१२ ला जवाहर योजनेतून आणखी एक विहीर घेतली. या विहिरीला चांगले पाणी लागले. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न सुटला. आमची मुळची अडीच एकर शेती. अजून शेतीचे क्षेत्र असावे अशी इच्छा होती. गेल्या पाच वर्षात जमलेल्या पैशातून सात एकर माळ जमीन टप्प्याटप्प्याने विकत घेतली. गेल्या दोन वर्षात लागवडीखाली आणली. तोपर्यंत अडीच एकरात खरीप व रब्बी हंगामातील पिकांची लागवड करायचो. पाण्याचा प्रश्‍न सुटला असल्यामुळे दोन पैसे अधिक देणारे पीक घेतले पाहिजे असे सातत्याने मनात येत होते. पण शेतात कोणते पीक घ्यायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला. सख्खा भाऊ धनाजी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा करून द्राक्ष लागवडीचे नियोजन केले. 

माळरानावर फुलले डाळिंब 
सूर्यवंशी यांनी माळरानात कमी पाण्यात येणाऱ्या डाळिंब लागवडीचे नियोजन केले. याबाबत ते म्हणाले की, माझ्या बंधूंचे सासरे शशिकांत जाधव (नरसेवाडी) यांच्याकडून डाळिंब लागवड आणि व्यवस्थापनाची माहिती घेतली. ऑगस्ट २०१७ मध्ये आटपाडी येथून भगवा जातीची चांगली रोपे आणून २६ गुंठ्यांवर ८ फूट बाय ५ फूट अंतरावर लागवड केली. तीन वर्षानंतर झाडांची चांगली वाढ झाल्यानंतर व्यवस्थापन सोपे जावे यासाठी ओळीतील एक आड एक झाड काढून टाकणार आहे. शशिकांत जाधव यांच्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सचिन महाकाळ यांचे मार्गदर्शन मला मिळते.  

ऊस शेती 
 उपलब्ध पाण्यावर ३५ गुंठे क्षेत्रावर को-८६०३२ जातीची लागवड.
 माती परीक्षणानुसार खत मात्रा. साडेचार फूट सरी, दोन डोळ्याच्या बेण्याची निवड.
 ३५ गुंठ्यांत लागवडीचा उतारा ६५ टन, खोडव्याचे ४० टन उत्पादन. सध्या शेतातील निडवा गाळपास जाणार. 
 पाणी कमी असल्याने ऊस पिकाऐवजी भाजीपाला पीक लागवडीचे नियोजन.

असे असते नियोजन
संतोष सूर्यवंशी हे दीड महिन्यातून पंधरा दिवस गावी येतात. आल्यानंतर संपूर्ण शिवाराचा फेरफटका मारतात. त्यानंतर वडील जोतीराम व बंधू धनाजी यांच्याशी द्राक्ष, डाळिंब पिकाच्या नियोजनाची सविस्तर चर्चा करतात. यामध्ये उपलब्ध पाण्यानुसार पीक व्यवस्थापनाचा आराखडा केला जातो. त्यानंतर पुढील महिनाभर काय करायचे आहे, याचे नियोजन केले जाते. बागेतील वातावरण, माती परीक्षणानुसार नियोजन केले जाते. फोनद्वारे दररोज संपर्क करून व्यवस्थापनाची माहिती घेतली जाते.

प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला मोलाचा...
परिसरातील शेतकऱ्यांकडून द्राक्ष, डाळिंब, ऊस शेतीबाबत वेळोवेळी सल्ला.
परराज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटी. बाजारपेठेचाही अभ्यास.
बांधावर तमिळनाडूमधील बदामी, कालापडी या आंब्यांच्या २० कलमांची लागवड.
नारळ, चिक्कू, पेरू, काजू कलमांची बांधावर लागवड.
तीन एकरावर घरापुरते 
हरभरा, गहू उत्पादन.
जमीन सुपीकता वाढीसाठी 
सेंद्रिय खतावर भर.
येत्या काळात पशुपालन,
रेशीम शेतीचे नियोजन.

पशुपालनाची जोड
सहा म्हशी व एक देशी गाई. शेतीमध्ये पाच गुंठे चारा पिकांची लागवड.
सध्या तीन म्हशी दुधात, दोन्ही वेळचे वीस लिटर दूध. 
घरी वापरून उर्वरित दूध डेअरीत दिले जाते. 
सरासरी फॅटनुसार ४० रुपये प्रति लिटर असा दर.

ॲग्रोवनने दिली दिशा 
सूर्यवंशी यांना शेती विकासात ॲग्रोवनची मदत होते. याबाबत ते म्हणाले की, गावाकडे आलो की मित्राच्या दुकानामध्ये संग्रहित केलेल्या ॲग्रोवनचे वाचन करतो. ॲग्रोवनमधील लेख आणि यशोगाथा माझ्या शेतीच्या नियोजनासाठी मार्गदर्शक ठरतात. यामुळे शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.

परराज्यात शोधली बाजारपेठ 
 द्राक्ष विक्रीबाबत सूर्यवंशी म्हणाले की, द्राक्ष विक्री आणि दराची माहिती घेण्यासाठी तमिळनाडू येथील द्राक्ष व्यापाऱ्यांशी संपर्क केला. किंदरवाडी (ता. तासगाव) येथील माझे मित्र विठ्ठल सूर्यवंशी यांच्याशी झालेल्या चर्चेतून कळाले की, कोलकता आणि दिल्ली येथे अपेक्षित दर मिळतात. त्यामुळे तमिळनाडूपेक्षा कोलकता, दिल्ली या बाजारपेठेत द्राक्ष पाठविण्यास सुरवात केली. त्याचा चांगला फायदा होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news Santosh Suryavanshi story Horticulture