मुल्ला यांच्याकडे पिकतो वर्षभर दर्जेदार मुळा 

jakir-mulla
jakir-mulla

वर्षभर मागणी असलेल्या, कमी जोखीम व देखभाल असलेल्या मुळा पिकाची निवड मिरज (जि. सांगली) येथील जाकिर इब्राहिम मुल्ला यांनी सार्थ ठरवली आहे. दहा वर्षांचा या पिकात गाढा अनुभव तयार झाला आहे. दोन महिन्यांचे हे पीक वर्षभरात सुमारे पाच वेळा घेऊन त्यातून अर्थकारण त्यांनी उंचावले आहे. सोबतीला कमी कालावधीच्या पालेभाज्यांनीही त्यांना मोठा आर्थिक आधार दिला आहे.  

सांगली शहरापासून हाकेच्या अंतरावर वसलेलं मिरज शहर आणि तालुक्याचं ठिकाणही. ऊस, द्राक्ष, पानमळे यांसह भाजीपाला पिकवण्यामध्ये तालुक्याची ओळख आहे. मिरजपासून काही अंतरावर टाकळी रस्त्यावर मुल्ला मळा लागतो. जाकिर इब्राहिम मुल्ला यांची येथे शेती आहे. त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. आर्थिक परिस्थिती तशी मध्यमच. मुल्ला यांना लहानपणापासूनच शेतीची आवड. त्यांचं सहा भावांचं एकत्र कुटुंब होतं. त्या वेळी जनावरे सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ती अगदी लिलया सांभाळली. पुढे वाटण्या झाल्या. दोन एकर शेती वाट्याला आली.

एकीचे बळ  
सन १९९८-१९९९ च्या दरम्यान द्राक्ष बाग लावली. प्रपंचाचा गाडा सुखात चालला होता. पाच वर्षे बाग सुरळीत चालली. परंतु वातावरणातील बदल, रोग, वाढता खर्च यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली. पुढचा पर्याय दिसेना. बंधू अफसर भाजीपाला घेत होते. बाजारपेठांचा त्यांचा चांगला अभ्यास असल्याने त्यांनी या पिकात उतरण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नियोजन सुरू केले. आज शेतीच्या वाटण्या झाल्या असल्या तरी भावांची एकी टिकून आहे. कुणावरही संकट आले तरी एकीच्या बळावर त्यावर मात करतो. सुख-दुःखाच्या वेळी एकत्र असतो असे मुल्ला सांगतात.  

व्यापारी येतात बांधावर  
शेत ‘रोड टच’ आणि मिरज शहराच्या जवळ आहे. हे दोन घटक मुल्ला यांना फायदेशीर ठरले आहेत. अनेक व्यापारी या शेतापासूनच पुढे जातात, त्यामुळे मुळा काढणी त्यांच्या दृष्टीस पडते. आता विक्री ही समस्या उरलेली नाही. थेट बांधावर व्यापारी येतात. खरेदीबाबत चर्चा करतात. मिरज, सांगली, कोल्हापूर व इचलकरंजी हे बाजाराचे चार पर्याय उपलब्ध आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुळ्याचा दर्जा पाहिल्यानंतर आम्हाला द्यायला जमेल का, असे व्यापारी विचारतात. मग किती नग हवे आहेत असे विचारून ऑर्डर पूर्ण केली जाते. फोनद्वारेही ऑर्डर्स मिळू लागल्या आहेत. 

यंदाची स्थिती 
यंदा सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. अजूनही तो थांबायचं नाव घेत नाही. मुळा शेतीचे नुकसान होईल असे वाटत होते. परंतु न खचता शेतात साचलेले पाणी वेळीच बाहेर काढून देत राहिल्याने पीक वाचले. पिकाला थोडाफार फटका बसला; पण दर कमी झाले नाहीत. दरवेळच्या पेक्षा दीडपट ते दुप्पट दर काहीवेळेस मिळाल्याचे मुल्ला यांनी सांगितले. 

मुळ्याचा दर्जा टिकावा यासाठी दर तीन महिन्यांनी २० गुंठ्यांत दोन ते तीन ट्रॉली शेणखताचा वापर करतो. गारपीट किंवा नैसर्गिक आपत्ती आली तरी कमी कालावधीचे हे पीक असल्याने फार मोठे नुकसान होत नाही. पुन्हा लागवड करून उत्पन्न घेण्यास सुरुवात होते. मला अन्य पालेभाज्यांनीही मोठा आर्थिक आधार दिला आहे. 
    जाकिर मुल्ला, ९७६६८८३८९९

पडत्या काळात  घरच्यांची साथ
पत्नी रुबिना, इरमनाज, मिदहत या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुली व फरहान हा लहान मुलगा असा मुल्ला यांचा परिवार आहे. द्राक्ष बागेत पत्नीची मदत व्हायची. आता भाचा जाविद आगादेखील शेतीत मदतीला धावून आला होता. सन २००३- २००४ पासून आम्ही भाजीपाला पिकांकडे वळलो असे मुल्ला सांगतात. आता अभ्यासू वृत्ती वाढवली. बाजारपेठांचा अभ्यास करून कोणत्या मालाला कशी मागणी आहे, त्याचं अर्थकारण काय आहे याची माहिती घेणं सुरू झालं. कमी खर्च, कमी देखभाल, व कमी जोखीमेत ताजा पैसा देणारे पीक म्हणून मुळ्याची निवड केली. प्रयोग केला. हळूहळू हे पीक आश्‍वासक ठरू लागलं. त्याने चांगला पैसा देण्यास सुरुवात केली. आज बघता बघता या पिकात सुमारे दहा वर्षांचा अनुभव तयार झाला आहे.

मुल्ला यांच्या मुळा शेतीची वैशिष्ट्ये
लागवड व्यवस्थापन
  दरवर्षी २० गुंठ्यांतच मुळा
  साधारण दोन महिन्यांचे पीक
  वर्षातून पाच वेळा तरी लागवड
  एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत अधिक तापमान असल्यास हे पीक घेण्यास अडचणी 
  आधीच्या प्लॉटमधील काढणी होण्याआधी दुसऱ्या प्लॉटमध्ये लागवडीचे नियोजन
  यामुळे बाजारपेठेत विक्रीचा खंड पडत नाही
  पिकाला चार ते पाच वेळा पाणी- पाटपाणी व वाफसा पद्धतीने
  पाणी जास्त झाल्यास मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता
  किडी-रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आठ दिवसांतून एकदा फवारणी 
  प्रति २० गुंठ्यांत सरासरी २० हजार ते २२ हजार मुळे मिळतात.

विक्री व्यवस्था 
  मिरज आणि सांगलीच्या बाजारपेठांसाठी सकाळी काढणी
  कोल्हापूर, इचलकरंजी बाजारपेठांसाठी सायंकाळी काढणी
  दररोज दोन हजार नगांपर्यंत विक्री 
  श्रावण महिन्यात अधिक मागणी 
  ५० आणि १०० मुळ्यांची गठडी बांधण्यात येते, त्यामुळे वाहतूक करण्यास सोपे होते. मालाचा दर्जाही टिकून राहतो. 

उत्पन्न 
  दर- प्रति नग ३ रुपये. काही काळात ४, ५ ते कमाल ७ रुपये. 
  काहीवेळा २ रुपयेदेखील. 
  नैसर्गिक आपत्तीत वा श्रावण महिन्यात कमाल दर ८ रुपयांपर्यंत 
  २० गुंठ्यांत निव्वळ नफा ३० हजार, ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत. 
  असे वर्षात चार हंगाम मिळाले तरी दोन लाख रुपये उत्पन्न.
  उत्पादन खर्च- किमान १० ते १२ हजार रु.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com