लेट रब्बीत ज्वारीचे पीक ठरले यशस्वी

गोपाल हागे
मंगळवार, 12 जून 2018

बुलडाणा जिल्ह्यात कळंबेश्वर येथील परशुराम बोऱ्हाडे यांनी यंदाच्या वर्षी या भागात फारसे कुणी करीत नसलेल्या ज्वारीचा पट्टा पद्धतीचा प्रयोग यंदाच्या ‘लेट’ रब्बीत केला. एकरी साडे १४ क्विंटल या हिशेबाने सहा एकरांत सुमारे ८७ क्विंटल धान्याचे उत्पादन मिळवले. दोन दिवसांत ७० क्विंटलची थेट विक्री केली. शिवाय एकूण क्षेत्रातून सुमारे ७२ हजार रुपयांचा कडबा विकला. अागामी काळात विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हा पर्याय दिशादर्शक राहू शकताे असेच या प्रयोगातून दिसून आले. 

विदर्भात खरिपाचे पीक काढल्यानंतर बहुतांश शेतकरी रब्बीत गहू, हरभरा यांची लागवड करतात. त्यातही ज्यांच्याकडे सोयाबीन अधिक तूर अशी पद्धती अाहे अशांची राने रब्बीत तशीच पडून राहतात. मेहकर तालुक्यात (जि. बुलडाणा) खरिपात सोयाबीन अाणि रब्बीत हरभरा ही प्रमुख पिके घेतली जातात. शेतकऱ्यांना या पिकांची उत्पादकता चांगली मिळते. मात्र अनेकदा खर्च व दर यांचे गणित परवडत नाही. यामुळे शेतकरी पर्यायी पिकांच्या शोधात असतात. 

बोऱ्हाडे यांचा प्रयोग  
तालुक्यातील कळंबेश्वर येथील परशुराम त्र्यंबक बोऱ्हाडे यांची २५ एकर शेती आहे. अमरावती जिल्ह्यातील अमृतराव देशमुख यांनी पट्टा पद्धतीने केलेले विविध पिकांचे प्रयोग त्यांच्या पाहण्यात आले. त्यांनीच बोऱ्हाडे यांना ज्वारीचा प्रयोग करण्यास सुचवले. या भागात ज्वारी हे पीक फारसे कोणी करीत नाही. मात्र अभ्यास व जोखीम घेत बोऱ्हाडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. 

ज्वारी व्यवस्थापनातील ठळक बाबी  
 तूर व सोयाबीन एकत्रित घेतलेल्या शेतात दोन्ही पिकांच्या काढणीनंतर जानेवारी (एक ते सात या काळात) ज्वारीची सहा एकरांत लागवड. 
 पहिल्यांदाच प्रयोग करीत असल्याने बियाण्याची उगवण किती होईल याबाबत साशंकता होती. त्यामुळे एकरी साडेचार किलो बियाणे वापरले. 
 पट्टा पद्धतीचा वापर. प्रत्येक चार अोळींनंतर एक दोन फुटी पट्टा.
 ज्वारी पूर्ण व चांगली उगवली. दोनदा विरळणी करावी लागली.  
 पाणी व्यवस्थापन.
 जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत वातावरणातील गारवा पाहता १५ दिवसांतून एकदा स्प्रिंकलरद्वारे पाणी.
 मार्चनंतर पाण्याची गरज वाढत गेल्याने भर उन्हाळ्यात अाठव्या ते दहाव्या दिवशी पाटपाण्याने सिंचन.  
 रासायनिक खतांचा वापर जवळपास नाही. शेणखत एकरी दोन ट्रॉली असा वापर.
 एकरी खर्च सुमारे सात हजार रुपये आला.  
 साधारण एप्रिल महिन्यात काढणी. 
 याच शेतात सोयाबीनचे एकीर १० ते ११ क्विंटल उत्पादन. 

उत्पादन  
एकरी १४.५० क्विंटल याप्रमाणे सहा एकरांत सुमारे ८७ क्विंटल ‘मोत्या’सारखी ज्वारी मिळाली.     
यांत्रिक कौशल्यामुळे पीक वाचले 
साधारणतः उन्हाळ्यात पक्ष्यांना खाण्यासाठी तुलनेने अन्न कमी असते. त्यातच ज्वारीसारखे पीक घेतले तर त्यावरील पक्षी उठवण्यासाठी मजुरांची गरज पडते. सध्या मजुरांची सर्वत्र टंचाई जाणवते. अशा परिस्थितीत बोऱ्हाडे यांनी आपल्यातील बुद्धिचातुर्याचा वापर केला. त्यांनी वाऱ्याच्या साह्याने चालणारी स्वयंचलित ‘फटकडी’ बनवून ज्वारीच्या शेतात लावली. यात पंख्याच्या पात्याला सायकलच्या पॅडेलचे ॲक्सेल जोडले. दोन नटबोल्ट जोडून खाली स्टीलची प्लेट लावली. हवेचा जोर जसजसा वाढत जायचा तसतसे हे ॲक्सेल जोराने फिरते. नटबोल्ट स्टीलच्या प्लेटवर अादळल्याने जोराचा अावाज होतो. यामुळे पक्षी विचलित होऊन त्यांचे शेताकडे फिरकणे बंद झाले. बोऱ्हाडे यांनी केलेला हा सुलभ प्रयोग पाहण्यासाठी विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. 

दोन दिवसांत ७० क्विंटल ज्वारी खपली  
कृषी विभागाने शेतकऱ्यांना ‘मार्केटिंग’मध्ये उतरवित ‘शेतकरी ते ग्राहक’ अशी साखळी तयार केली. त्याचाच भाग म्हणून तालुका कृषी अधिकारी विजय सरोदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यंदाच्या हंगामात ‘शेतकरी ते ग्राहक’ अशा पद्धतीने मेहकर शहरात कलिंगड विक्रीचा प्रयोग केला. त्याच पद्धतीने बोऱ्हाडे यांना ज्वारी विकण्याबाबत त्यांनी सल्ला दिला. त्यासाठी २० व ४० किलो वजनाच्या बॅग्ज तयार करून मेहकरमध्ये स्टॉल लावण्यात अाला. या ठिकाणी दोन दिवसांत सुमारे ७० क्विंटलपर्यंत ज्वारीची विक्री करण्यात ते यशस्वी झाले. या स्टाॅलला बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी भेट दिली. त्यांनीही बोऱ्हाडे यांच्या शेतीची व मार्केटिंगच्या चातुर्याची प्रसंशा केली.  

चाऱ्यापासूनही उत्पन्न 
धान्याबरोबरच सहा एकरांत जो काही पेंढी कडबा मिळाला त्याच्या विक्रीतून  ७२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवण्यातही बोऱ्हाडे यशस्वी झाले. व्यापाऱ्यांना शेकडा सातशे रुपये दराने त्याची विक्री केली. सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्थेलाही चारा देण्यात आला. बोऱ्हाडे बळिराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. 

शेतकऱ्यांना पर्यायी म्हणून ज्वारी चांगले पीक ठरू शकते. सध्या दैनंदिन खाण्यात ज्वारीचा वापर वाढत अाहे. त्याला उत्पादन खर्चही कमी येतो. स्वतः ‘मार्केटिंग’ केले तर दोन पैसे अधिक मिळतात हेदेखील बोऱ्हाडे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. 
- विजय सरोदे, तालुका कृषी अधिकारी मेहकर

परशुराम बोऱ्हाडे, ९९२११८०१११

Web Title: agrowon story Jowar crop proved successful