शेतकऱ्यांप्रती दृष्टिकोन केव्हा बदलणार?

Farmer
Farmer

पुणे : स्वातंत्र्यानंतर स्वकीय सत्तेत येऊनही सरकार, नोकरशाही आणि समाजाचा शेतकऱ्यांप्रती दृष्टिकोन बदलण्यास अपयश आल्यामुळे 125 वर्षांपूर्वीची महात्मा फुले कालीन परिस्थिती तशीच राहिल्याचा सूर शेतकरी, शेतकरी नेते आणि अभ्यासकांच्या मतांतून व्यक्त झाला आहे. 

सव्वाशे वर्षांपूर्वी इंग्रज राजवटीत महात्मा जोतिराव फुले यांनी मांडलेले प्रश्‍नांची धग आजही कायम आहे. किंबहुना सद्यःस्थितीत शेतकरी आत्महत्यांनी याप्रश्‍नांचे गांभीर्य अधिक वाढविले आहे. महात्मा फुले यांनी इंग्रजकाळात शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचे प्रतिनिधित्व केले होते. शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी पुस्तकातून त्यांनी सरकार, नोकरशाही, सामाजिक वर्ग यांचा शेतकऱ्यांप्रती असलेल्या दृष्टिकोनावर प्रखर हल्ला चढविला होता. 

शेती आणि शेतकऱ्यांसंबंधी विषयात शेतकऱ्यांच्या प्रतिनिधित्वाचा आग्रह धरला होता. शेतकऱ्यांना बिनव्याजी पतपुरवठा, कर सवलत, सिंचनासाठी व्यवस्था, बाजार व्यवस्थेत संरक्षण, कृषी शिक्षणाची आवश्‍यकता आदी विषय समकालीन व्यवस्थेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. सरकार, नोकरशाही, सावकारी आणि बाजार व्यवस्थेत शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्याचे मुद्दे वारंवार उपस्थित केले होते. 

महात्मा जोतिराव फुले यांची आज (ता. 11) जयंती आहे. यानिमित्त फुले यांच्या शेती आणि शेतकऱ्यांविषयीच्या विचारांचा धोंडाळा घेतला असता विविध क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेली मते. 

'महात्मा फुले यांनी बहुजनांची मुलं शासन-प्रशासन व्यवस्थेत आली, तर परिस्थितीत बदल होईल, असे मत मांडले होते. परंतु तसे होताना दिसत नाही. शेतकऱ्यांची मुलं कृषी विद्यापीठातून कलेक्‍टर, डेप्युटी कलेक्‍टर होऊ लागली. परंतु, ती आज प्रशासकीय सेवेत असताना शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटत नसतील, तर महात्मा फुले यांनी त्या वेळी मांडलेल्या विचारांचा हा पराभव मानावा लागेल.'' 
- पाशा पटेल, शेतकरी नेते. 

''स्वातंत्र्य मिळाले, परंतु शेतकऱ्यांच्या दारापर्यंत स्वातंत्र्याचे फायदे पोचले नाहीत. महात्मा फुले यांच्या काळात शत्रू स्पष्टपणे समोर दिसत होता, त्याच्या विरोधात बोलता संघर्ष करता येत होता. दुर्दैवाने आजचा शत्रू हा शेतकऱ्यांच्या कुटुंबातील आहे. निवडणुकीतून ते निवडून जातात. परंतु, निवडून गेल्यानंतर कारभार मात्र इंग्रजांच्या ढाकेचा करताहेत. आज जो काही बदल आहे, तो मूठभर लोकांतच झाला आहे. बहुसंख्य कष्ट उपसणाऱ्या शेतकऱ्यांच्या दारात या बदलाची आणि विकासाची फळे पोचलेली नाहीत, हे वास्तव आहे.'' 
- अजित नवले, सरचिटणीस, किसान सभा, महाराष्ट्र राज्य. 

''शेतकऱ्यांचे प्रश्‍न खूप काळापासून आहे, तसेच आहेत. इतर उत्पादने आणि शेती उत्पादन यात लोक फरक करतात. शेती उत्पादन हे जणू काही उत्पादन नाहीच, असे त्यास वागविले जाते. सरकार दरबारी, ग्राहकांच्या स्तरावर तेच आहे. शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे महत्त्व हे अजून समाजाला कळलेले नाही, त्यांनी शेतकऱ्यांस गृहीत धरलेले आहे. समाजाची ही प्रवृत्ती पहिल्यापासूनची आहे आणि त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. काळानुरूप या समस्यांची अभिव्यक्ती वेगवेगळी होईल, तेव्हाची रचना काय आहे, कोठले सरकार आहे. यावरून फरक पडेल. महात्मा फुले यांचा एक समज असा होता, की यामागे काही जातीयकारण आहे, परंतु आत्ताच्या काळात तसे नाही. पुष्कळ वेळा आपण पाहतो, वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून शेती समुदायातून लोक पुढे जातात आणि सरकार स्थापन करतात. एकूण समाजाचा दृष्टिकोन पूर्वीप्रमाणेच आहे. फुले यांच्या मांडणीनंतरही समाजाचा शेतकऱ्यांकडे बघण्याच्या दृष्टिकोनातही काही फरक पडलेला नाही.'' 
- सदानंद मोरे, ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत, पुणे. 

''फुले काळातील परिस्थिती आज तशीच आहे. मात्र, यास जबाबदारही शेतकरीच आहे. त्याने त्याच्या प्रश्‍नांचा अभ्यास केलेला नाही, म्हणून तो अपयशी आहे. शेती परवडण्यासाठी काय केले पाहिजे, हे प्रत्यक्ष ज्ञान यशस्वी शेतकऱ्यांकडेच मिळेल. शेतकऱ्यांनी आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याकडील स्रोतांचा अभ्यास करावा आणि या स्रोतांचे मूल्यवर्धन केल्यास तो यशस्वी होईल.'' 
- डॉ. दत्तात्रेय वने, कृषिभूषण शेतकरी, मानोरी, ता. राहुरी, जि. नगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com