दुग्धव्यवसायातून साधली गाडेकरांनी भरभराट

Cow-Milk
Cow-Milk

शेळकेवाडी (अकलापूर) (ता. संगमनेर. जि. नगर) येथील गाडेकर कुटुंबाने सुमारे २२ वर्षांपूर्वी एका गायीपासून दुग्धव्यवसाय सुरू केला. चिकाटीने सुमारे ५५ गायींपर्यंत विस्तार केला आहे. दूध विक्री, शेणखत आदींच्या माध्यमातून वार्षिक उलाढाल तीस लाखांच्या पुढे नेली. व्यवसायाच्या जोरावर घरबांधकाम, वाहने, जमीन खरेदी, शेतीत सुधारणा, मुलांचे शिक्षण आदी प्रगती साधली. आपल्या सातत्यपूर्ण कामातून कुटुंबाने पंचक्रोशीत नाव मिळवले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील शेतकरी शेतीबरोबर दुग्धव्यवसायाला प्राधान्य देतात. शेळकेवाडी (अकलापूर) (ता. संगमनेर) येथील गाडेकर कुटुंबाचा व्यवसायही असाच चिकाटीतून भरभराटीस आला आहे. भाऊसाहेब, दत्तात्रय व अनिल या गाडेकर बंधूंचे एकत्रित कुटुंब आहे. अनिल दुग्ध व्यवसाय तर अन्य बंधू शेती व पोकलॅनचा व्यवसाय सांभाळतात.

दुग्धव्यवसायातील वाटचाल 
गाडेकर कुटुंबाची २५ एकर शेती आहे. बहुतांश सर्व क्षेत्र डाळिंबाचेच आहे. कुटुंबाने १९९२ पासून एका गायीपासून दुग्धव्यवसायास सुरुवात केली. गायींच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ केली. दहा वर्षांपूर्वी पाच लाख रुपये खर्च करून दोन गोठ्यांची (शेड) उभारणी केली. गायींची संख्या वाढत असल्याने यंदा पुन्हा तीन लाख रुपये खर्च करून नवे शेड उभारले आहे. 

व्यवसायातून झालेली प्रगती 
डाळिंबाची शेती आणि त्याला उत्तम व्यवस्थापनातून दुग्धव्यवसायाची दिलेली जोड यामुळे कुटुंबाला आर्थिक भरभराट करता आली आहे. साधारण दहा वर्षांपूर्वी आर्थिक अडचणींमुळे चार एकर जमीन काही लाख रुपयांना विकावी लागली होती. एकवीस लाख रुपये देऊन ती परत घेणे शक्य झाले आहे. शेतातून चारा आणण्यासाठी तसेच शेतीच्या कामांसाठी  चार ट्रॅक्टर्स, एक पीक अप, एक जीप, मित्राच्या भागीदारीत पोकलेन यंत्र घेता आले. याशिवाय सुंदर बंगला बांधता आला. मुलांना चांगले शिक्षण देता येत आहे. अनिल यांचा एक मुलगा  बीएस्सी ॲग्री तर दुसरा बी. टेक. ॲग्री करतो आहे.

गाडेकर यांच्याकडून शिकण्यासारखे

  • अत्यंत कमी खर्चात दुग्ध व्यवसाय सुरू करून तो चिकाटीने सुरू ठेवून त्यात भरभराट आणली.
  • डचणीच्या काळातही हार मानली नाही. त्यामुळे व्यवसाय टिकून राहिला.
  • सुरुवातीला अन्य संकलन केंद्राला दूध पुरवीत. आता स्वतःचेच संकलन केंद्र सुरू करून त्याअंतर्गत तालुका संघाला दूध पुरवठा होतो. 
  • या व्यवसायाच्या जोरावरच शेतीचा विकास केला. उपलब्ध शेणखताच्या वापरातून जमीन सुपीक केली. 
  • मजूरबळ कमी करण्यासाठी दूध काढणीसाठी यंत्राचा वापर 

सध्याचा दुग्धव्यवसाय दृष्टिक्षेपात 

  • व्यवसाय सुरू केला तेव्हा सुरुवातीला पंचवीस लीटर दूध उत्पादन व्हायचे. त्यात वाढ करून तीनशे लीटरपर्यंत नेण्याचा अनिल यांचा मानस होता.
  • आज लहान मोठी संकरित जनावरे धरून संख्या ५५ पर्यंत आहे. 
  • वर्षभराचा विचार करता प्रति दिन  दूध संकलन सुमारे ४५० ते कमाल ६०० लीटर 
  • दूध संघ तसेच खवा व्यावसायिकांना पुरवठा. 
  • आपल्या शेतीत पूर्णपणे डाळिंब असल्याने चाऱ्यासाठी पाच एकर शेती करारावर. त्यात मका, ऊस, गवतवर्गीय वाणाची लागवड
  • दरवर्षी एका एकराला करारानुसार पंचवीस हजार रुपये मोबदला देतात. 
  • गोठा व्यवस्थापनात चार परप्रांतीय तरुणांची नियुक्ती केली होती. लॉकडाऊनच्या काळात दोन मजूर गावी गेले असून सध्या दोन मजूर कार्यरत आहेत. शिवाय घरची तरुण पिढी या व्यवसायात राबते. 

शेणखताचा वापर - डाळिंब बागेत शेण व गोमूत्राच्या स्लरीचा उपयोग होतो. दर वर्षाला सुमारे पाच टन गांडूळखत तयार करण्यात येते. दरवर्षी सुमारे ७० ते अलीकडे शंभर ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्यातील पन्नास ट्रॉली शेणखताचा वापर आपल्या शेतीत होतो. उर्वरित वाळलेल्या खताची विक्री प्रति ट्रॉली पाच हजार रुपये तर ओल्या खताची विक्री अडीच हजार रुपये दराने मागणीनुसार होते. शेतकरी घरी येऊन खरेदी करतात. दरवर्षी दीड लाख रुपयांच्या पुढे उत्पन्न खतविक्रीतून होते. डाळिंबाला सेंद्रिय घटकांचा वापर केल्याने उत्पादन व गुणवत्तेतही वाढ झाली आहे. 

लॉकडाऊनचा फटका
कोरोना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका दुग्ध व्यावसायिकांना सोसावा लागला. सहाशे लीटरपैकी दोनशे लीटर दूध खवा व्यावसायिकांना ३५ रुपये प्रति लीटर दराने दिले जात होते. मात्र लॉकडाऊन काळात खव्याला मागणी नव्हती. आता पुन्हा खव्यासाठी विक्री होत असली तरी चार महिन्यांमध्ये मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. संघासाठीही दुधाचे दर कमी आल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.

कोणत्याही व्यवसायात सातत्य व चिकाटी महत्त्वाची आहे. अनेक अडचणींवर मात करत आम्ही अनेक  वर्षांपासून दुग्ध व्यवसाय जोपासला व वाढवला. त्यामुळे प्रगती करू शकलो.
- अनिल गाडेकर, ७९७२०८४९७८, ९८६०१५३२७९

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com