सचिवासह सर्व फरारी

सचिवासह सर्व फरारी

बार्शी बाजार समितीतील कांदा अनुदान लाटण्याचे प्रकरण
सर्वच बाजार समित्यांची चौकशी करण्याची मागणी
सोलापुरातील शेतकरी संघटना झाल्या आक्रमक

सोलापूर - शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून कांदा अनुदान येण्याच्या आतच ते परस्पर लाटण्याच्या प्रकारानंतर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवासह दोन कर्मचारी आणि अन्य सात व्यापाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पण हा गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच सर्व संशयित आरोपी फरारी झाले आहेत. आता पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. 
 

दरम्यान, बार्शीतील या प्रकारानंतर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून, जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांतही असे प्रकार झालेत का, याची चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी, बळिराजा आणि शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनांनी केली आहे. 

जुलै २०१६ ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत बाजार समितीच्या आवारात विक्रीस आलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल १०० रुपये व जास्तीत जास्त २०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. पण हे अनुदान शेतकऱ्यांना मिळण्याच्या आतच शेतकऱ्यांच्या कांदा विक्री पट्टीवर परस्पर खाडाखोड, विक्री पट्टीवर व्यापारी व शेतकऱ्यांच्या सह्या नसणे, चुकीचे सात-बारा उतारे दाखल करणे यांसारखे प्रकार करून १ कोटी ९ लाख ३२ हजार रुपयांचे अनुदान लाटण्याचा प्रकार बार्शी बाजार समितीत उघडकीस आला आहे. बार्शी बाजार समितीचे प्रशासक जिजाबा गावडे यांनी स्वतःच या प्रकरणात बाजार समितीचे सचिव किसन ओव्हळ, विभागप्रमुख सचिन माने आणि आठ जणांवर अनुदान लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बाजार समितीवर अवघ्या सव्वा महिन्यापूर्वीच प्रशासक नेमूनही त्यांचा धाक सचिवांना आणि बाजार समितीच्या प्रशासनाला राहिलेला नाही. हे दुर्दैवी आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी तर व्हायला पाहिजेच. पण जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांच्या प्रस्तावांचीही चौकशी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले, बळिराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे महामूद पटेल यांनी केली आहे.

संशयितांचा शोध सुरू 
या संपूर्ण घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रतिभा ठाकूर या करत आहेत. या प्रकारानंतर बाजार समितीच्या दफ्तर तपासणीसह सर्व संशयितांचा शोध आम्ही घेत आहोत. अजून ते आमच्या हाती लागले नाहीत. पण लवकरच ते सापडतील, तशी यंत्रणा आम्ही लावलेली आहे, असे ठाकूर यांनी ‘ॲग्रोवन’ला सांगितले. 
 

सहकारमंत्री, पणनमंत्र्यांना भेटणार
प्रशासकाच्या कारवाईनंतरही बाजार समित्या असे निर्ढावल्यासारखे काम करत असतील, तर काय? यावर उपाययोजना झालीच पाहिजे, जिल्हा उपनिबंधकांना भेटून आम्ही सर्वच बाजार समित्यांच्या चौकशीची मागणी करणार आहोत. पण सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाही प्रत्यक्ष भेटून कारवाईची मागणी करणार आहोत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले यांनी ‘ॲग्रोवन’ला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com