
लांबलेल्या पावसामुळे आंबा उत्पादन उशिरा मिळणार, हे निश्चित झाले आहे; मात्र त्यातही वातावरणातील बदलांचा परिणाम उत्पादकांना सोसावा लागत आहे.
भूर्दंड ! आंब्याच्या फुलोऱ्यावर 'यांचा' हल्ला
रत्नागिरी - गुलाबी थंडीची चाहूल लागल्यानंतर आंबा बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते; मात्र गेल्या आठ दिवसांमध्ये अधूनमधून निर्माण होत असलेल्या ढगाळ वातावरणाने आंबा कलमांच्या फुलोऱ्यावर कीडरोग दिसू लागले आहेत. रत्नागिरी तालुक्यात लष्करी अळींचा हल्ला झाला आहे. ही अळी मोहोरातील रस शोषून घेते आणि कैरी कुरतडून खराब करते. त्यावर नियंत्रणासाठी फवारण्यांवर फवारण्या कराव्या लागत आहेत.
लांबलेल्या पावसामुळे आंबा उत्पादन उशिरा मिळणार, हे निश्चित झाले आहे; मात्र त्यातही वातावरणातील बदलांचा परिणाम उत्पादकांना सोसावा लागत आहे. दीड महिना उशिराने डिसेंबर महिन्याच्या शेवटी थंडीचे आगमन झाले. त्यानंतर पालवलेली आंबा कलमे मोहोरु लागली होती. ते प्रमाण वीस टक्क्यांपर्यंत होते.
हेही वाचा - उदय सामंत म्हणाले, कणकवलीबाबत आमचं ठरलंय
उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता
ऑक्टोबरला जी पालवी आली होती, ती कमी - जास्त थंडीमुळे जून होण्यास उशिर होत आहे. अधुनमधून वातावरण बदलत असून दमट हवेमुळे कीड, तुडतुडा, थ्रिप्ससह लष्करी अळींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरु झाला आहे. त्याबरोबर उंटअळीही दिसून येत आहे. लष्करी अळी अनेक ठिकाणी दिसू लागल्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लष्करी अळींसह तुडतुडा आणि अन्य कीडरोगांमुळे खर्च वाढत असून त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कीड नियंत्रणासाठी सगळ्या झाडांवर फवारणी करावी लागते.
पालवीला येणार फेब्रुवारीत मोहोर
जिल्ह्यातील बागांमध्ये शेंगदाण्याएवढी कैरी, काळा वाटाण्याएवढी कैरी तर सुपारीएवढ्या कैरीचे 20 टक्के प्रमाणे आहे. काही ठिकाणी फुलोरा असून बहुतांश ठिकाणी अजूनही पालवी दिसते. पालवीमधील 25 टक्के कलमांना फेब्रुवारीत मोहोर येईल. नव्याने आलेल्या पालवीतून मिळणारे उत्पादन एप्रिल, मे महिन्यात मिळेल.
हेही वाचा - मुलीकडचे म्हणून कोंडगावकरांकडे दुर्लक्ष नको
फळगळ होण्याची शक्यता
यंदा मार्चला आंबा नगण्य राहणार आहे. त्यामुळे उत्पन्नात घट निश्चित आहे. मार्च महिन्यात थंडी वाढली तर पुनर्मोहोराच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्यातून लागलेलं फळ गळून पडण्याची भीती आहे.
- राजेंद्र कदम, आंबा बागायतदार
मोहोरातील रस शोषून घेते, कैरीला चावते, कुरतडते..
ही अळी फुलोऱ्यातील मोहोरावर आढळून येत आहे. ती मोहोरातील रस शोषून घेते, कैरीला चावते, कुरतडते. त्यामुळे मोहोरासह कैरी खराब होते. सुरवातीला आलेल्या मोहोरांची दांडीच फक्त शिल्लक राहते. परिणामामुळे फवारणीचा खर्च वाढत आहे. नियमितपणे पंधरा दिवसांनी बागायतदार औषध फवारणी करतात. पण कीडरोगांमुळे 7 ते 8 दिवसांनी फवारणी करावी लागत आहे. सर्वसाधारणपणे एका फवारणीला हेक्टरी 25 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.