esakal | आरोग्यदायी,औषधी पालेभाजी : मेथी
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्यदायी,औषधी पालेभाजी : मेथी

मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात. ज्याचा आरोग्यावर खूप चांगला फायदा होतो. मेथीमध्ये थियामिन,  फॉलिक ॲसिड, रिबोफ्लाव्हिन, नियासिन, जीवनसत्त्वे अ, बी ६ आणि सी सारख्या जीवनसत्त्वे असतात.

आरोग्यदायी,औषधी पालेभाजी : मेथी

sakal_logo
By
सुग्रीव शिंदे, गीतेश चावरे

आपल्या  खाद्य संस्कृतीमध्ये मेथीचे दाणे आणि पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मेथीची पाने भाजी म्हणून आणि दाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली 

वाळवलेली मेथीची पाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात. मेथीचे बीज फारच कडू असते, त्यास भाजून त्यातील कडूपणा कमी करता येतो. 

Success story: शेळीपालनाने दिली आर्थिक प्रगतीची दिशा...

मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात. ज्याचा आरोग्यावर खूप चांगला फायदा होतो. मेथीमध्ये थियामिन,  फॉलिक ॲसिड, रिबोफ्लाव्हिन, नियासिन, जीवनसत्त्वे अ, बी ६ आणि सी सारख्या जीवनसत्त्वे असतात, तसेच तांबे, पोटॅशियम, कॅल्शिअम, लोह, सेलेनियम, जस्त, मॅंगनीज आणि मॅग्नेशिअम सारखी खनिजे आहेत.  मेथीचे दाणे जीवनसत्त्व के  चा  समृद्ध स्रोत आहे. जे आपल्या शरीरासाठी लाभदायक  ठरतात.

आरोग्यदायी फायदे

 • मेथी रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते. मेथीमध्ये असलेल्या स्टेरॉईड सेपोनिन्समुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराईडचे शोषण टाळले जाते.
 • हृदयविकाराचा धोका कमी होतो. मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या घटकांमुळे हृदयाचे आरोग्य नियंत्रित राहते.
 • रक्तातील साखर नियंत्रित राहते. मधुमेहींनी मेथीची पाने आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
 • पचनप्रक्रिया सुलभ होते. मेथीमध्ये फायबर व भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. पचनास मदत होते.
 • सकाळी उठल्यावर मेथीचा उकळलेला अर्क घेतल्यास पचनप्रक्रिया सुलभ होते. छातीत जळजळ होत असल्यास आराम मिळतो.
 • वजन कमी करण्यासाठी मेथीचा चांगला उपयोग होतो. मेथीमध्ये असलेल्या नैसर्गिक तंतुमय घटकांमुळे दाणे पोटात फुगतात व भूक कमी लागते.
 • ताप व घसा खवखवणे यावर गुणकारी. ताप असल्यास मेथी एक चमचा लिंबू व मधासोबत घेतल्यास लगेच आराम मिळतो. तसेच खोकला  असल्यास त्यावर देखील मेथी गुणकारी आहे.
 • स्तन्यपान करणाऱ्या महिलांमध्ये दुधाचे प्रमाण वाढते. मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन या घटकांमुळे आईच्या दुधाच्या प्रमाणात वाढ होते.
 • आहारात मेथीच्या भाजीचा वापर केल्याने शरीराला पुरेसे लोह  मिळते.
 • मेथीमधील तंतूमय घटकांमुळे अन्नातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे कोलन कॅन्सर टाळण्यास मदत होते.
 • त्वचेचा दाह अथवा चट्टे कमी होतात. मेथीमधील  जीवनसत्त्व  सी या एन्टिऑक्सिडंटमुळे त्वचेचा दाह कमी होतो.
 • त्वचा विकार कमी होतात. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स, पिंपल्स, सुरकुत्या कमी करण्यासाठी मेथीचा फेसपॅक लावल्यास चांगला फायदा होतो.
 • केसांच्या समस्या कमी होतात. मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात.

हेही वाचा : वाढत्या थंडीचे फळबागांवरील परिणाम

इतर वापर
मेथीची वाळलेली पाने नैसर्गिक कीटकनाशक म्हणून धान्य साठवणुकीत वापरतात. 

उत्तर आफ्रिकेच्या काही भागामध्ये, मेथीचे दाणे साखर आणि शुद्ध तेल यांच्या मिश्रणात वजन वाढविण्यासाठी खातात. 

अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये अद्यापही पशुवैद्यकीय औषधे म्हणून मेथीचा वापर केला जातो.

 सुग्रीव शिंदे, ८९७५३९९४९१
(अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

loading image